सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७७६ ते १८०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
,

1776-18
पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें । ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें ॥1776॥
पहा की, आपल्यासारखे माहेर मला प्राप्त झाल्यामुळे माझा ग्रंथविषयक बुद्धींतील आग्रह सुखातें सिद्धीस गेला. 76
1777-18
जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ । चिंतारत्‌नीं कुळाचळ । निर्मूं येती ॥1777॥
अहो, सर्व पृथ्वीगोल सुवर्णाचा करितां येईल, चिंतामणीचे पर्वत निर्माण करितां येतील, 77
1778-18
सातांही हो सागरांतें । सोपें भरितां अमृतें । दुवाड नोहे तारांतें । चंद्र करितां ॥1778॥
सप्तही सागर अमृतानें सहज भरितां येतील किंवा जितक्या चांदण्या आहेत त्यांचे चंद्र बनविणेही कठीण नाहीं. 78
1779-18
कल्पतरूचे आराम । लावितां नाहीं विषम । परी गीतार्थाचें वर्म । निवडूं न ये ॥1779॥
कल्पतरूंच्या बागा लावणे कठीण नाही; (हे सर्वं संभवेल) पण, गीतार्थाचे रहस्य समजणार नाही. 79
1780-18
तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱ्हाठिया भाखा । करी डोळेवरी लोकां । घेवों ये ऐसें जें ॥1780॥
मनुष्याने सर्व लोकांना उघडया डोळ्यांनी ग्रहण करितां येईल असा मराठी भाषेत लिहावा. 1780

1781-18
हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा । कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो कां ॥1781॥
हा एवढा मोठा ग्रंथसागर उतरून जाऊन पलीकडे जो कीर्तीविजयध्वज फडकत आहे81
1782-18
गीतार्थाचा आवारु । कलशेंसीं महामेरु । रचूनि माजीं श्रीगुरु- । लिंग जें पूजीं ॥1782॥
अशाप्रकारे गीतेच्या अर्थरूप मंदिराची रचना करून अखेरचा कळस किंवा शिखर म्हणून अठराव्या अध्यायाची योजना करून त्यांत श्रीगुरूरूपी शिवलिंग स्थापून त्याची मी पूजा करितो. 82
1783-18
गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय । तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥1783॥
गीता ही निष्कपट प्रेम करणारी माउली होय; तिची चुकामुक होऊन जो मी तान्ह्या मुलाप्रमाणे व्यर्थं भटकत होतो त्या मायलेकांची गांठ घालून दिलीत ही आपली कृपा होय.83
1784-18
तुम्हां सज्जनांचें केलें । आकळुनी जी मी बोलें । ज्ञानदेव म्हणे थेंकुलें । तैसें नोहें ॥1784॥
तुम्हां सज्जनांच्या कृपेने जसें गीतार्थाचे आकलन झाले, तसें मी बोललों असलो तरी ती कांहीं सामान्य कृति नव्हे. 84
1785-18
काय बहु बोलों सकळां । मेळविलों जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥1785॥
उपकार किती म्हणून सांगावे? आपल्या कृपेने ग्रंथ सिद्धीस जाऊन जो हा सोहळा मी पहात आहें, त्याने माझ्या जन्माचे साफल्य झाले आहे.85

1786-18
मियां जैसजैसिया आशा । केला तुमचा भरंवसा । ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलों सुखा ॥1786॥
तुम्हां सज्जनांवर पूर्ण भरंवसा ठेवून ज्या ज्या कृपेची मी आशा धरून राहिलों ती सर्व आपण सफल करून मला सुखी केले आहे 86
1787-18
मजलागीं ग्रंथाची स्वामी । दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही । तें पाहोनि हांसों आम्हीं । विश्वामित्रातेंही ॥1787॥
महाराज, मजलागीं म्हणजे माझ्याकडून ही ग्रंथरूपी दुसरी सृष्टि जी तुम्ही निर्माण केली, ती पाहून आम्हाला विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीचेही कौतुक वाटत नाही. 87
1788-18
जे असोनि त्रिशंकुदोषें । धातयाही आणावें वोसें । तें नासतें कीजे कीं ऐसें । निर्मावें नाहीं ॥1788॥
ती नश्वर सृष्टि त्रिशंकू राजाच्या उद्देशाने व ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याच्या हेतूने त्यांनी निर्माण केली; पण आपली कृति निर्हेतुक व शाश्वत आहे 88
1789-18
शंभू उपमन्युचेनि मोहें । क्षीरसागरूही केला आहे । येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ कीं ॥1789॥
शंकरांनीं भक्त उपमन्यूसाठीं क्षीरसागर उत्पन्न केला, पण तीही उपमा आपल्या कृपेला अपुरी पडते, कारण, त्या सागराच्या पोटांत विष आहे. 89
1790-18
अंधकारु निशाचरां । गिळितां सूर्यें चराचरां । धांवा केला तरी खरा । ताउनी कीं तो ॥1790॥
अंधकाररूपी राक्षस चराचराला त्रास देत असतां त्या चरचराचा धावा, सूर्याने ताऊन पुरविला (अंधकार नाशिला); पण त्यांत उष्णतेच ताप झाला. 1790

1791-18
तातलियाही जगाकारणें । चंद्रें वेंचिलें चांदणें । तया सदोषा केवीं म्हणे । सारिखें हें ॥1791॥
चंद्राने आपल्या चांदण्याला खर्ची घालून जगाचा ताप शान्त केला हे खरे, पण त्या कलंकयुक्त चंद्राची उपमा ह्या ग्रंथाला कशी द्यावी? 1791
1792-18
म्हणौनि तुम्हीं मज संतीं । ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं । उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥1792॥
म्हणून, तुम्हीं संतांनीं मजकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा असा जो ग्रंथ निर्मिला तो निरुपम होय. 92
1793-18
किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें । येथ माझें जी उरलें । पाईकपण ॥1793॥
किंबहुना, माझे हे गीताधर्म कीर्तन सिद्धीस गेलें हें केवळ आपल्या कृपेचें फल होय; मी आतां करण्यासारखे एकच काम मजकडे उरलें आहे; तें म्हणजे आपली सेवा हे होय. 93
1794-18
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥1794॥
आता, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर याने ह्या माझ्या वाग्यज्ञरूप सेवेने प्रसन्न होऊन मजवर हा प्रसाद करावा.94
1795-18
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥1795॥
खलजनांच्या दुष्ट बुद्धीला पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी व सर्व भूतांच्या ठिकाणी परस्परांबद्दल मित्रभाव नांदावा. 95

1796-18
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥1796॥
पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगांत धर्मरूप सूर्याच उदय असो व प्राणिमात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत. 96
1797-18
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥1797॥
ईश्वरनिष्टांचा समुदाय भूतलावर सकल मंगलांचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भेटो. 97
1798-18
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥1798॥
ती संतमंडळी म्हणजे चालते कल्पतरूचे बाग चेतन चिंतामणीचे गांव व अमृताचे बोलते समुद्रच होत. 98
1799-18
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥1799॥
निष्कलंक चंद्र, अतापदायी सूर्य, असे जे सज्जन ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असो. 99
1800-18
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥1800॥
किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन त्यांनी विश्वपालक जो आदिपुरुष त्याचे अखंड भजन करावें. 1800

,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *