सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी १७६ ते २०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , ,

176-1
तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥176॥
त्या ठिकाणी रथ थांबवून, अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेनें पाहू लागला. ॥76॥
177-1
मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख । तंव कृष्णमनीं नावेक । विस्मो जाहला ॥177॥
अर्जुन म्हणाला, हे देवा ! पाहा पाहा. हे सगळे रणांगणावर जमलेले आमचेच गोत्रज, भाहुबंध व गुरू आहेत. हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर अचंबा वाटला. ॥77॥
178-1
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हें मनीं धरलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ॥178॥
(श्रीकृष्ण ) विचार करू लागले, अर्जुनाच्या मनात काय आले, कोण जाणे; हे काहीतरी विलक्षणच असावे, ॥78॥
179-1
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु । परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥179॥
(श्रीकृष्ण) ते सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असल्यामुळे त्यांनी ते सहज जाणले; परंतु त्यावेळी ते (काहीं न बोलता) स्तब्ध राहिले. ॥79॥
180-1
तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥180॥
त्यावेळी अर्जुनाने रणांगणावर आपले चुलते,, आजोबा, गुरू, बंधू, मामा यांना पहिले. ॥180॥

181-1
इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजी ॥181॥
आपले इष्टमित्र, मुलेंबाळें हे सर्व त्या सैन्यांत आले आहेत, असें त्याने पहिले. ॥181॥
182-1
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर पौत्र धर्नुर्धरें । देखिले तेथ॥182॥
आपले जिवलग मित्र, सासरे,नातेवाईक आणि नातूदेखील त्या रणांगणात आलेले अर्जुनाने पहिले. ॥82॥
183-1
जयां उपकार होते केले । कीं आपदीं जे रक्षिले । हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥183॥
ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते आणि संकटकाळात ज्याचें रक्षण केले होते, त्या लहान मोठ्या सर्वांनाच अर्जुनाने पहिले. ॥83॥
184-1
ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं । हे अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥184॥
असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यांत लढाईस तयार झालेले आहे, त्यावेळी अर्जुनाने पहिले. ॥84॥
185-1
कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत
त्या सर्वांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि दुःखी-कष्टी होऊन तो असे बोलू लागला.

तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥185॥
त्या प्रसंगी (अर्जुनाच्या) मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ॥85॥

186-1
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें॥186॥
ज्या (स्त्रिया) उत्तम कुळातील असतात आणि गुणाने व रुपाने संपन्न असतात, त्यांना आपल्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या कोणत्याही स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही; ॥86॥
187-1
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥187॥
ज्या प्रमाणे कामाने आसक्त झालेला पुरुष आपल्या स्व-पत्नीला विसरून दुसऱ्या स्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन तिच्या नादी लागतो, ॥87॥
188-1
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥188॥
किंवा तपोबलाने रिद्धी म्हणजेच (ऐश्वर्य) प्राप्त झाले असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धी भ्रम पावते; आणि मग त्याला वैराग्य (मोक्ष) सिद्धीची आठवणही राहत नाही. ॥88॥
189-1
तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जे अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥189॥
त्याप्रमाणे अर्जुनाची त्या वेळी स्थिती झाली व त्याच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि त्याची वीरवृत्ती गेली. ॥89॥
190-1
देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय । तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥190॥
ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक मंत्राचा उच्चार करताना चुकला म्हणजे तो जसा भ्रमिष्ट होतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिमोहामुळे व्याकुळ झाला. ॥190॥

191-1
म्हणौनि असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥191॥
म्हणून अर्जुनाच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्यांचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चांद्रकिरणांचे शिंपण झाल्याने चांद्रकांतमाणि पाझरू लागतो, ॥191॥
192-1
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु । मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥192॥
त्याप्रमाणे पार्थ महाकरूणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन श्रीकृष्णाबरोबर बोलूं लागला. ॥192॥
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥1.28॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते॥1.29॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः॥1.30॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, ” हे श्रीकृष्णा ! युद्ध करण्यासाठी एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून ॥28॥
माझी सर्व गात्रे शिथिल पडू लागली आहेत. तसेच, तोंडाला कोरड पडू लागली आहे. माझ्या शरीराला कंप सुटून शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. ॥29॥
माझ्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडत आहे. माझ्या शरीराचा दाह होत आहे. माझे मन भ्रमित झाले आहे. त्यामुळे मी येथे उभा राहण्यासदेखील समर्थ नाही. ॥30॥
193-1
तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥193॥
अर्जुन म्हणाला, हे देवा ! माझे ऐका. मी हा सर्व समुदाय पहिला येथे मला माझे सर्व गोत्रज दिसत आहेत. ॥193॥
194-1
हें संग्रामीं उदित । जहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥194॥
हे सर्व जण लढाईला उत्सुक झाले आहेत, हे खरे; पण ते (यांच्याशी लढणे) आपल्याला कसे योग्य होईल? ॥194॥
195-1
येणें नांवेचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ॥195॥
यांच्याशी युद्ध करण्याच्या विचाराने मला कांही सुचत नाही. काय होते आहे, हे कळत नाही. माझे मलाच भान नाही. माझे मन आणि बुद्धी स्थिर नाही. ॥95॥

196-1
देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसीही ॥196॥
पाहा, माझा देह कापत आहे. तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आलेली आहे. ॥96॥
197-1
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥197॥
माझ्या सर्वांगावर रोमांच (काटा) उभा राहिला आहे, माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरवयाचा हात लुळा होऊन गेला आहे. ॥97॥
198-1
तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥198॥
हे धनुष्य हाती न धरल्याने गळून पडले; परंतु हातातून केंव्हा गळून पडून गेले, हेदेखील मला कळाले नाही, या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. ॥98॥

199-1
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥199॥
खरोखर माझे अंतःकरण वज्रापेक्षा कठीण आहे, कोणाला दाद न देणारे अतिखंबीर असे आहे; परंतु काय आश्चर्य, त्यापेक्षाही या आप्तेष्टांचा मोह आश्चर्यकारक आहे. ॥199॥
200-1
जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥200॥
ज्याने युद्धामध्ये शंकरांनाही जिंकले आणि निवातकवच नावाच्या राक्षसांचा ठावठिकानाही नाहीस केला, तो अर्जुन आप्तेष्ठांना पाहून एका क्षणामध्ये मोहाने ग्रासला गेला. ॥200॥

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *