सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

151-18
नाव थडी न पवतां । न खांडिजे केळी न फळतां । कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ॥151॥
किंवा नाव नदीचे काठास पोहोचल्या खेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाही; किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्या शिवाय दिवा मालविता येत नाही. ॥151॥
152-18
तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी । तंव नोहावें यागादिकीं । उदासीन ॥152॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना विषयी दृढ निश्चय झाला नाही, तोपर्यंत यागादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. ॥152॥
153-18
तरी स्वाधिकारानुरुपें । तियें यज्ञदानें तपें । अनुष्ठावींचि साक्षेपें । अधिकेंवर ॥153॥
तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान व तप याचे यथाविधी वरचेवर आचरण केलेच पाहिजे. ॥153॥
154-18
जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागीं ॥154॥
जो चालण्याची त्वरा करतो, त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडे, तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते.॥154॥
155-18
अधिकें जंव जंव औषधी । सेवनेची मांडी बांधी । तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥155॥
एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो जो अधिकाधिक तयार होतो,तो तो तो रोगापासून मुक्त होत जातो ॥155॥

156-18
तैसीं कर्में हातोपातीं । जैं कीजती यथानिगुती । तैं रजतमें झडती । झाडा देऊनी ॥156॥
त्याप्रमाणे जो जो कर्मे विधिपूर्वक लवकर लवकर करावी, तो तो रज व तम हे गुण समूळ नाहीतसे होतात;॥156॥
157-18
कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे । तैं कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥157॥
अथवा सोन्यास एकामागून एक जेव्हा खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकसपणा जाऊन ते शुद्ध होते. ॥157॥
158-18
तैसें निष्ठा केलें कर्म । तें झाडी करूनि रजतम । सत्वशुद्धीचें धाम । डोळां दावी ॥158॥
तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता;ते रज व तम याचा नाश करून सत्तशुद्धीचे दर्शन करून देते. ॥158॥
159-18
म्हणौनियां धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया । तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में ॥159॥
म्हणून अर्जुना, सत्तशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. ॥159॥
160-18
तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे । एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मे.चि ॥160॥
तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्मांच्या योगे अंतर्भल नाहीसा होता. एवंच सत्कर्मे हीच चीत्तशुद्धीस तीर्ये होत ॥160॥

161-18
तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसीं । कीं अंधालागीं डोळ्यांसी । सूर्यु आला ॥161॥
तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा,पाण्याचा झरा साप डावा कींवा आंधळ्यांच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे,॥161॥
162-18
बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी ॥162॥
बुडणाऱ्यास तारण्याकरिता नदीनेच धावावे, पडणाराला जसे पृथ्विनेच झेलावे अथवा मारणारास मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्दावी,॥162॥
163-18
तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ॥163॥
त्याप्रमाणे कर्मापासून मुमुक्षुस होणारी पिडा कर्मानीच दूर करावी; अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युत्क्ती माहित आहे,तो वैद्द ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाचे रक्षणकरतो, ॥163॥
164-18
तैसीं एके हातवटिया । कर्में कीजती धनंजया । बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती ॥164॥
त्याप्रमाणे धनंजया,युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असून ही मुक्त करण्यास कारणीभूत होतात ॥164॥
165-18
आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी । जया कर्मातें किरीटी । कर्मचि रुसे ॥1 ॥165॥
तर अर्जुना, जिच्यायोगे कर्मापासूनच कर्माचा नाश होतो, ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो ॥165॥
एतान्यपि तु कर्माणि सण्‌गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥18.6॥

166-18
तरी महायागप्रमुखें । कर्मे निफजतांही अचुकें । कर्तेपणाचें न ठाके । फुंजणें आंगीं ॥166॥
तर पंचमहायज्ञादि प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तुत्वचा अभिमान बाळगीत नाही, ॥166॥
167-18
जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे । ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवीं ॥167॥
जो मोलाने (दुसऱ्याजवळून पैसे घेऊन )तीर्थयात्रा करतो, त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही; ॥167॥
168-18
कां मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥168॥
किंव्हा राजशिक्कयाच्या बळावर जो एकटा राजासही पकडून आणतो त्याला मी या राजस जिंकले, असा गर्व होत नाही;॥168॥
169-18
जो कासें लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ॥169॥
जो दुसऱ्यास कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो, त्याला मी पोहणारा आहे,असा गर्व होत नाही;किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यास राजाकरिता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, ॥169॥
170-18
तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें । कृत्यजातांचें मोहरें । सारीजती ॥170॥
त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगिता ज्या ज्या वेळी जी जी कर्मे करावयाची ती ती यथाविधी जी करितो; ॥170॥

171-18
केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हों नेदावा । मनोरथु ॥171॥
हे पांडवा, केलेल्या कर्माची जी फळ प्राप्ती व्हावयाची तिच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होवू देत नाही. ॥171॥
172-18
आधींचि फळीं आस तुटिया । कर्मे आरंभावीं धनंजया । परावें बाळ धाया । पाहिजे जैसें ॥172॥
हे धनंजया, प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा; ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून त्याच्या ठिकाणी प्रीती नित्यनैमित्तिक ठेवता नुसता संतोष मानवा. ॥172॥
173-18
पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्में ॥173॥
पिंपराच्या आशेने जसा कोणी पिंपळास पाणी घालत नाही तशी फळाची आशा सोडून कर्मे करावे. ॥173॥
174-18
सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे ॥174॥
गुराखी दुधाची आशा सोडून जसा गावातील गाई वळतो, तसे कर्मफलाविषयी निरिच्छ असावे. ॥174॥
175-18
ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपणा आपुलिया गांठी । लाहेची तो ॥175॥
या युक्तीने जो कर्मांचे आचरण करितो, त्याला आपल्याजवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. ॥175॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading