सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , ,

126-6
यावरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥126॥
याप्रमाणे तो अर्जुन पुण्याने धन्य असून पवित्र आहे, या जगात भक्तिरूप बीज पेरण्यासाठी त्याची हृदयरुपी भूमी उत्तम आहे; आणि म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला आहे.
127-6
हो का आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥127॥
अथवा आत्मनिवेदनाच्या अलीकडची सख्य नावाची जी आठवी भक्ती मानली जाते, त्या ठिकाणची अर्जुन हा प्रमुख देवता आहे.
128-6
पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुने तो सहजें । पढिये हरी ॥128॥
जवळच असलेल्या प्रभूंचे वर्णन न करता भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे, इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो.
129-6
पाहां पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहून काय न वर्णिजे । पतिव्रता ॥129॥
पहा, असे बघ की, जी पतीची प्रेमभावाने सेवा करते आणि प्रियोत्तम हा जिला अतिशय मानतो, त्या पतीव्रतेचे पतीपेक्षाही अधिक केले जात नाही का??
130-6
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनाचिया दैवां । एकायतनु जाहला ॥130॥
त्याप्रमाणे देवापेक्षही अर्जुनाची विशेष स्तुती करावी, असे माझ्या मनाला भावते, कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे.


131-6
जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥131॥
ज्याच्या आवडीच्या अधीन होऊन निराकार परमात्मा (सगुण रूप घेऊन) आकाराला आला आहे, आणि तो परिपूर्ण असूनही त्याला अर्जुनाचा वेध लागला आहे.
132-6
तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनी आली ॥132॥
हे अर्जुनाचे वर्णन ऐकून श्रोते म्हणाले, ” आमचे काय भाग्य आहे, ते पाहा. उत्तमोत्तम शब्दांची रचना करून बोलण्याची शोभा वाढवली आहे. (काय बोलण्याचा रंग आहे). या बोलण्याच्या शैलीने नादब्रम्हालाही जिंकले आहे.
133-6
हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्यरंगाचें ॥133॥
अशी ही परिशुद्ध मराठी भाषा बोलली जाते, हे सुद्धा आश्चर्य नाही का?? या भाषेच्या रस- अलंकारांत विविध रंगाचे प्रकार उसळतात.
134-6
कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार । हेचि श्लोकार्थ -:कुमुदी तरी फार । साविया होती ॥134॥
या भाषारूपी आकाशात ज्ञानरूपी स्वच्छ टपोरे चांदणे पडले आहे. गूढ अशा अभिप्रायाचा गारवाही यामध्ये आहे. तसेच श्लोकांचा अर्थ हीच जणू कांही चांद्रविकासी कमळे सहजच प्रफुल्लित होत आहेत.
135-6
चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरी । तेथ डोलु आला ॥135॥
त्या बोलण्याची थोरवी श्रेष्ठ आहे. ब्रम्हविद्या ऐकणाऱ्याची इच्छा या भाषेच्या श्रवणाने तृप्त होत असते. “अशा या बोलांतून श्रोते अंतःकरणात प्रसन्न होऊन डोलू लागले.


136-6
तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥136॥
निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर माऊलीनी हे जाणले. मग ते श्रोत्यास म्हणाले, ” आता इकडे लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी प्रकाशमान दिवस उगवला आहे.
137-6
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवासी ॥137॥
देवकीने श्रीकृष्णाला आपल्या पदरात वाढविले, यशोदेने मोठ्या कष्टाने याचे लालन-पालन केले; आणि तो शेवटी पांडवांच्या उपयोगी पडला.
138-6
म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । कां अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥138॥
म्हणून खूप दिवस श्रीकृष्णाची सेवा करावी आणि योग्य वेळ पाहून उपदेश करण्यासंबंधी विनंती करावी, येवढेदेखील श्रम त्या भाग्येवंत अर्जुनाला पडले नाहीत.
139-6
हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ॥139॥
श्रोते म्हणाले, हे असू द्या. आता श्रीकृष्ण-अर्जुनाची कथा लवकर सांगावी. श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणाले, सांगतो, ऐका. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा ! आपण सांगितलेली संतांची लक्षणे माझ्या अंगी प्राप्त होत नाहीत.
140-6
एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥140॥
एरव्ही लक्षणांचा सारभूत विचार केला, तर मी त्या मानाने खरोखर अयोग्य, अपूर्ण आहे; परंतु हे भगवंता ! तुमच्या उपदेशानेच जर मला योग्यता आली, तर येऊ शकेल.


141-6
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल । काय जाहलें अभ्यासिजेल । सांगाल जे ॥141॥
महाराज, तुम्ही जर माझे हित करण्याकडे लक्ष द्याल, तर मी ब्रम्ह होईन, तुम्ही मला जो अभ्यास करावयास सांगाल, तो करणे मला अशक्य आहे का?
142-6
हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥142॥
आहो, देवा ! आपण कोणाची कथा सांगत आहात हे कळत नाही; परंतु ती ऐकल्यापासून तिची स्तुती करावी, असे वाटते. अशी श्रेष्ठ लक्षणे ज्याच्या अंतःकरणात प्रकट झाली असतील, त्याचे महत्व केवढे बरे असेल.
143-6
हें आंगे म्या होइजो का । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करुं म्हणती ॥143॥
हे देवा ! याप्रमाणे माझ्या अंगी योग्यता प्राप्त होईल, एवढे आपण करू शकाल काय?? त्या वेळी भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, तुला आम्ही अवश्य ब्रम्हरूप करू.
144-6
देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे ॥144॥
असे पहा की, जोपर्यंत संतोष प्राप्त होत नाही, तोपर्यंत चोहोकडे सुखाचा दुष्काळ असतो. एकदा का संतोष प्राप्त झाला, की मग सुखाला कुठे कमतरता आहे??
145-6
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैंसा भारें आतला पिके । दैवाचेनि ॥145॥
त्याप्रमाणे जो सर्वेश्वराचा पूर्णपणे सेवक बनला आहे, (येथे अर्जुन सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णाचा सेवक बनला आहे, हे आपण जाणले पाहिजे) तो सहजच ब्रम्हरूप होईल. परंतु अर्जुनाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण तो भाग्यरूपी पिकाच्या भाराने कसा भारावला आहे, ते पाहा.


146-6
जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे ॥146॥
इंद्रादिकांनी हजारो जन्म घेतले, तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे, ते पाहा. जो अर्जुनाने प्रश्न विचारण्यापूर्वीच अधीर होऊन प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रवृत्त होत आहे.
147-6
मग ऐका जें पांडवें । म्हणितले ब्रह्म म्यां होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ॥147॥
मग आता ऐका. अर्जुनाने मी ब्रम्ह व्हावे असे जे म्हटले, ते सर्व भगवान श्रीकृष्णांनी ऐकले.
148-6
तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुध्दीचिया ॥148॥
आणि त्याविषयी देवाने असे अनुमान काढले की, अर्जुनाला ब्रम्हस्वरूप होण्याचे डोहाळे लागले आहेत, याचे कारण त्याच्या बुद्धीच्या उदरात वैराग्यरूपी गर्भ राहिला आहे.
149-6
एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परि वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोंहभाव महुरें । मोडोनि आला ॥149॥
एरव्ही अर्जुनरूपी वृक्षला ब्रम्हप्राप्तीचे फळ येण्यासाठी अपुरे दिवस होते, तरीपण वैराग्यरूपी वसंत बहरून आल्यामुळे मी ब्रम्ह व्हावे, या इच्छेचा मोहराने तो फुलून आला आहे.
150-6
म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लागेल आतां । हो विरक्तु ऐसा अंनता । भरंवसा जाहला ॥150॥
म्हणून ब्रम्हप्राप्ती हे फळ येण्यास आता याला फार काळ लागणार नाही. कारण, हा आता विरक्त झाला आहे, अशी भगवंताची पूर्ण खात्री झाली आहे.

, , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading