सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४२६ ते १४५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1426-18
एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें ॥1426॥
ह्याप्रमाणे, वेदाचें मूलसूत्र व सर्वांना जेथे सारखाच अधिकार आहे असें हें पवित्र गीताशास्त्र देवांनीं प्रकट केले. 26 ॥
1427-18
येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा । हें म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगों ॥1427॥
गीता ही वेदांचेही मूळ आहे, हे तुम्ही कसें जाणले. असे जर कोणी म्हणेल तर त्याची प्रसिद्ध उपपति आम्ही सांगतों. 27
1428-18
तरी जयाच्या निःश्वासीं । जन्म झाले वेदराशी । तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं । बोलला स्वमुखें ॥1428॥
ती अशी- (केवळ) ज्याच्या श्वासोच्छवासापासून शब्दराशि (भांडार) जो वेद, तो जन्म पावला, असा जो सत्यप्रतिज्ञ भगवान, त्याने साक्षात् मुखावाटे सांगितलेले प्रतिज्ञा वचन तें हे, गीताशास्त्र होय. 28
1429-18
म्हणौनि वेदां मूळभूत । गीता म्हणों हें होय उचित । आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥1429॥
म्हणून, गीता हे, वेदांचेही मूळ आहे असें जें आम्ही म्हटलें तें योग्यच होय; ह्याला आणखीही एक उपपत्ति आहे. 29
1430-18
जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे । तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं ॥1430॥
जी वस्तु स्वरूपेकरून नष्ट न होतां तिचे स्थूल स्वरूप जेथे (पूर्वी व नंतर) सूक्ष्मरूपाने दडून असते, ती वस्तु या स्थूल आकाराचे बीज असे लौकिकांत म्हणतात. 1430

1431-18
तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु । गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा ॥1431॥
मग, कांडत्रयात्मक शब्दराशि जो वेदवृक्ष तो, बीजांत वृक्ष असावा, तसा गीतेमध्ये सूक्ष्मरूपाने आहे.31
1432-18
म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज । गमे आणि सहज । दिसतही आहे ॥1432॥
म्हणून श्रीमद्भगवद्गीता हें वेदांचे बीज होय असे मला वाटते, व कोणालाही तें सहज दिसण्यासारखे आहे.32
1433-18
जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग । भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें ॥1433॥
कर्म, उपासना व ज्ञान हे जे वेदाचे तीन भाग, त्यांचे गीतेमध्ये उत्तम रीतीने प्रतिपादन आहे; किंबहुना, त्यांनी रत्नालंकाराप्रमाणे तिचे सर्वांग शोभविले आहे. 33
1434-18
तियेचि कर्मादिकें तिन्ही । कांडें कोणकोणे स्थानीं । गीते आहाति तें नयनीं । दाखऊं आईक ॥1434॥
ती, कर्मादि तिन्हीं कांडे गीतेमध्ये कोठे कोठे आहेत ते तुला स्पष्ट सांगतों, श्रवण कर. 34
1435-18
तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो । द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥1435॥
पहिला अध्याय हा गीताशास्त्राची प्रवृत्ति कां व कशी झाली ह्याच्या प्रस्तावनेपर आहे, दुसऱ्यात सांख्यविचार (ज्ञान) प्रकट केला आहे. 35

1436-18
मोक्षदानीं स्वतंत्र । ज्ञानप्रधान हें शास्त्र । येतुलालें दुजीं सूत्र । उभारिलें ॥1436॥
हें गीता शास्त्र ज्ञानप्रधान आहे व ज्ञान हे, अन्यसाधननिरपेक्ष स्वतंत्रपणे मोक्ष देण्यास समर्थ आहे, अशी सूत्रभूत उभारणी दुस-यांत केली आहे. 36
1437-18
मग अज्ञानें बांधलेयां । मोक्षपदीं बैसावया । साधनारंभु तो तृतीया- । ध्यायीं बोलिला ॥1437॥
जे अज्ञ म्हणून बद्ध आहेत, त्यांना मोक्षप्राप्ति होणे तर आरंभाचे साधन कोणतें हे, तिसऱ्या अध्यायांत सांगितले. 37
1438-18
जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें । विहित परी अप्रमादें । अनुष्ठावें ॥1438॥
जे देहात्मबुद्धिमान् आहेत, त्यांनी काम्य व निषिद्ध कर्मे, सोडून विहित कर्माचरण बिनचूक (नियमितपणे) करावें. 38
1439-18
ऐसेनि सद्भावें कर्म करावें । हा तिजा अध्यावो जो देवें । निर्णय केला तें जाणावें । कर्मकांड येथ ॥1439॥
अशा भावनायुक्त अंतःकरणाने कर्म करावें असा देवांनीं तिसऱ्या अध्यायांत निर्णय केला आहे ते कर्मकांड समजावे. 39
1440-18
आणि तेंचि नित्यादिक । अज्ञानाचें आवश्यक । आचरतां मोंचक । केवीं होय पां ॥1440॥
त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या आचरणानें, ती अज्ञाननाशक कशी होतील,1440

1441-18
ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया । देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया । सांगितली ॥1441॥
अशी इच्छा होऊन बद्धांपैकी एखादा मुमुक्षतेच्या हद्दीपर्यंत आल्यास ती कर्मे,ब्रह्मार्पणबुद्धीने कशी करावी हेंही सांगितले. 41
1442-18
जे देहवाचामानसें । विहित निपजे जें जैसें । तें एक ईश्वरोद्देशें । कीजे म्हणितलें ॥1442॥
ते असें–कायावाचामने-करून जें विहित कर्म जसें घडेल तें सर्व ईश्वरप्राप्त्यर्थं करावें. 42
1443-18
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें । भजनकथनाचें खागें । आदरिलें शेषभागें । चतुर्थाचेनी ॥1443॥
ह्या कर्मयोगाने, भजनकीर्तनदिकांप्रमाणे ईश्वरोपासना कशी घडते हे, चौथ्याच्या अखेरीस सांगावयास आरंभिले आहे.43
1444-18
तें विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जंव आघवा । तंव कर्में ईशु भजावा । हें जें बोलिलें ॥1444॥
कर्मातें ईश्वर भजावा हें जें वर सांगितले आहे तेच निरूपण विश्वरूपदर्शनाच्या अकराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत आहे.44
1445-18
तें अष्टाध्यायीं उघड । जाण येथें देवताकांड । शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोलें ॥1445॥
चौथ्या अध्यायापासून तों अकराव्याच्या अखेरपर्यंतच्या आठ अध्यायांत तेंच देवताकांड (उपासनाकांड) आहे हें गीताशास्त्र पडदा न ठेवतां स्वतः सांगत आहे. 45

1446-18
आणि तेणेंचि ईशप्रसादें । श्रीगुरुसंप्रदायलब्धें । साच ज्ञान उद्बोधे । कोंवळें जें ॥1446॥
आणि ह्याच उपासनेने ईशप्रसाद व श्रीगुरुसंप्रदाय यांची प्राप्ति होऊन अंतःकरणांत खरें ज्ञान उद्भूत होतें (प्रकाशतें) व तें प्रथम कोंवळे असतें. 46
1447-18
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं । अथवा अमानित्वादिकीं । वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणूं ॥1447॥
तें कोंवळे ज्ञान बाराव्यांतील अद्वेष्टादि श्लोकांनी किंवा तेराव्यांतील अमानित्वादि श्लोलोकांनीं दृढ कसें करावें हें सांगितले आहे म्हणून बारावा ज्ञानकांडांतच आम्ही गणतों.47
1448-18
तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी । ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासीं ॥1448॥
बाराव्या अध्यायापासून तों पंधराव्याच्या अखेरपर्यंत ज्ञानाचे फल व त्याचा परिपाक ह्याचे निरूपण आहे. 48
1449-18
म्हणौनि चहूंही इहीं । ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं । ज्ञानकांड ये ठायीं । निरूपिजे ॥1449॥
म्हणून, ऊर्ध्वमूल ह्या पंधराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंतच्या चार अध्यायनीं ज्ञानकांड निरूपिलें आहे. 49
1450-18
एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी । गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे ॥1450॥
ह्याप्रकारें, कर्म, उपासना व ज्ञान ह्या वेदाच्या कांडत्रयाचे संक्षेपतः वर्णन करणारी गीता ही लघुश्रुतिच असून गद्याऐवजीं पद्यरूप रत्नालंकार तिने, धारण केले आहेत. 1450

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *