सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा । । आत्मसंयमयोग: ।
अध्याय सहावा

1-6
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सागंती जो । योगरुप ॥1॥
मग संजय राजा धृतराष्ट्रस म्हणाला, जो अष्टांगयोगासंबंधी जो योगरूप अभिप्राय भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत, तो आता श्रवण करा.
2-6
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । की तेचि अवसरी पाहुणे । पातलों आम्ही ॥2॥
श्रीकृष्णांनी, नारायनांनी अर्जुनाकरिता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केला होता जणू ब्रम्हरसांचे पारणे केलें होते, त्याचवेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो.
3-6
कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥3॥
खरोखर दैव किती थोर आहे, हे कळत नाही. तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे आणि त्याची चव घेताच ते पाणी नसून अमृत आहे, असे कळावे.
4-6
तैसे आम्हां तुम्हां जाहले । जें आडमुठी तत्व फावलें । तंव धृतराष्ट्रे म्हणितलें । हें न पुसों तूंते ॥4॥
तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रम्हज्ञान आपणास प्राप्त झाले. त्यावेळी धृतराष्ट म्हणाला, “या ब्रम्हज्ञाना संबधी मी कांही विचारले नाही. तर मग तू का बरे सांगतोस??
(येथे मी पण आला आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, असो)
5-6
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥5॥
या बोलण्यामुळे धृतराष्ट्राचे अंतःकरणं कसे आहे, हे संजयला कळून आले. धृतराष्ट्र आपल्या पुत्रांची हकीकत ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. (मुलांविषयीच्या स्नेहाने धृतराष्ट्राचे मन या वेळी घेरलेले त्याच्या लक्षात आले) हे त्याला कळाले.


6-6
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं ये ॥6॥
हे लक्षात येताच संजय मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हे वयोवृद्ध धृदत्तराष्ट्र मोहामुळे कामातून गेला आहे. एरवी विचार करून पहिले, तर श्रीकृष्णांनी सांगितलेले विचार अतिशय चांगले आहेत.
7-6
परि तैं तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैसें पाहेल । तेवींचि येरु से घेईल । म्हणौनि बिहे ॥7॥
परंतु या सुखसंवादाची गोडी याला कशी लागणार?? कारण तो जन्मापासूनच आंधळा आहे, त्याला कसे उजाडेल? ही गोष्ट जर धृतराष्ट्रस तशी उघड सांगितली तर तो मनामध्ये द्वेष धरील, म्हणून संजय स्पष्ट बोलायला घाबरला.
8-6
परि आपण चित्तीं आपुलां । निकियापरि संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥8॥
परंतु संजय मात्र आपल्याला श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद अनायासे प्राप्त झाला म्हणून अतिशय संतुष्ट झाला.
9-6
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें । आतां आदरेंसी बोलणें । घडेल तया ॥9॥
त्या अलौकिक आनंदाच्या तृप्तीने आणि श्रीकृष्णाचा अभिप्राय अंतःकरणात दृढ झाल्यामुळे संजयकडून आता श्रद्धापूर्वक पुढील बोलणे घडेल.
10-6
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥10॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय.


11-6
तैसें गीतार्थाचें सार । जे विवेकसिंधूचे पार । नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥11॥
त्याप्रमाणे हा सहावा अध्याय म्हणजे भगवतगीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विवेकरूपी (विचाररूपी) सागराच्या पलीकडचा किनारा आहे. अथवा (श्रोत्यांना म्हणतात) हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले भांडारच होय.
12-6
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जे शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥12॥
जे मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन वेदलाही करता आले नाही, जेथून गीतारुपी वेलीचा अंकुराचे वाढीला लागलेले आहे,
13-6
तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥13॥
असा हा सहावा अध्याय सर्व रस-अलंकारांनी युक्त अशा भाषेत सांगितला जाईल. म्हणून श्रीत्यांनी एकाग्र चित्ताने तो श्रवण करावा.
14-6
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंके । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥14॥
असे हे माझे मराठी प्रतिपादन मराठी भाषेत आहे. परंतु गोडीच्या बाबतीत ते अमृतादेखील प्रतिज्ञेने जिंकू शकेल. अशा तर्हेची रस-अलंकार युक्त अमृतमधुर शब्दांची रचना करेन.
15-6
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥15॥
ज्या भावमधुर कोमल शब्दांच्या मनाने सप्तस्वरातून निर्माण होणारे स्वरदेखील कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या शब्दांच्या आकर्षणाने सुगंधाचे सामर्थ्यदेखील कमी भाषेल.


16-6
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥16॥
अशा रसमधुर्ययुक्त शब्दांच्या लोभाने कानांनादेखील जिभा निर्माण होतील. या अर्थपूर्ण शब्दांमुळे इंद्रियामध्ये परस्परांत भांडण लागेल.
17-6
सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥17॥
वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे; परंतु जिव्हा म्हणेल, हा शब्द माझा रसविषय आहे. तसेच नाकाला वाटेल की, ह्या शब्दांच्या माध्यमातून मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील, तर हा शब्द रस आणि सुगंध होईल.
18-6
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ॥18॥
आश्चर्य असे की, या काव्यशब्दांतील भावंचित्रांची मालिका पाहून डोळ्यांनाही तृप्ती लाभेल आणि डोळे म्हणतील, ही तर रूपाची खाणच उघडली आहे.
19-6
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें । बोलु भुजाहि आविष्करें । आलिंगावया ॥19॥
ज्या वेळी मधुर शब्द जुळून अमृतमय वाक्य मुखातून प्रगटेल, त्या वेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि बाहुदेखील त्या चैत्यन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरिता सरसावतील.
20-6
ऐशी इंद्रिये आपुललिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥20॥
याप्रमाणे सर्व इंद्रिय आपल्या विषयांच्या भावनेने या शब्दांना झोंबतील; परंतु ते शब्द सर्वांचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सूर्य आपल्या हजारो किरणांनी सर्व जगाला जागे करतो.


21-6
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥21॥
त्याप्रमाणे या भावमधुर शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे, असे जाणावे. या शब्दांचे चिंतन करून त्यातील अभिप्राय जाणणाऱ्यास यामध्ये चिंतामणीसारखे अलौकिक गुण दिसून येतील.
22-6
हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥22॥
हे असो. सारांश, ही शब्दरूपी उत्तम ताटे आहेत आणि त्यामध्ये मोक्षरूपी मिष्टान्न वाढलेली आहेत. निष्कमी लोकांना या ग्रंथरूपी मेजवणीची पर्वणी आहे.
23-6
आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि करुनी ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरुनि जेवी । तयासीचि फावे ॥23॥
या मेजवणीच्या उजेडासाठी नित्यनुतन अशी आत्मज्योतीची चिमणीसारखी दिवटी करून त्या प्रकाशात जो इंद्रियांना न कळत मेजवाणीचे सेवन करतो, त्यालाच मोक्षरूप आनंदाचा लाभ होतो.
24-6
येथ श्रवणाचेनि पांगे- । वीण श्रोतयां होआवें लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥24॥
शब्दाचे प्रयेक्ष ज्ञान होण्यासाठी श्रोतेंद्रियाची आवश्यकता असते, परंतु शब्दांचा जो अर्थ ब्रम्हरूप मोक्ष, त्याचा अनुभव होण्यासाठी मन अंतर्मुख करावे लागते.
25-6
आहाच बोलाचि वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगाघडिजे । मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचिमाजीं ॥25॥
वरवर असलेले शब्दाचे कवच फोडले पाहिजे आणि आत असलेल्या ब्रम्हस्वरूपाशी एकरूप झाले पाहिजे. म्हणजे शब्दश्रवणजन्य सुखासह ब्रम्हसुखात रंगून जात येते.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *