सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी १५१ ते १७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

151-4
विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥151॥
ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा प्रवेश होत नाही, जे द्वैत दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाही,
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम॥4.31॥

भावार्थ :- यज्ञाचा परिणाम ज्ञानरूपी अमृत, त्याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रम्हाला प्राप्त होतात. जो कोणाचाच यज्ञ करत नाही त्याला ऐहिक सुख मिळत नाही, मग त्याचा परलोक सुखदायक कसा होणार??
152-4
ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट । तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रे ॥152॥
असे जे अनदीसिद्ध, परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहीलेले ब्रम्ह असते, त्या ब्रम्हाचे ब्राम्हनिष्ठ लोक हे ‘अहं ब्रमास्मि ‘ मी ब्रम्ह आहे, या मंत्राचे सेवन करतात म्हणजे ब्राम्हशी एकरूप होतात.
153-4
ऐसे शेषामृते धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे ॥153॥
याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरुप अमृत प्राशन करून जे तृप्त होऊन अमर होतात, ते सहजच ब्राम्हत्व पावतात.
154-4
येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जें योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥
जन्माला येऊन ज्यांना संयमरुपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जे योग-यज्ञही करत नाहीत, त्या लोकांना विरक्ती माळ घालत नाही.
155-4
जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥155॥
हे अर्जुना ! ज्यांचे इहलोकामध्ये आचार, विचार, उच्चार सात्विक नाहीत, त्यांना परलोक मिळेल काय? म्हणून त्यांच्या विषयी बोलणे नको.
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे ॥4.32॥

भावार्थ :- असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत, असे तू जाण. असे जाणल्याने निष्काम कार्मयोगाच्या द्वारे तू संसारबंधनातून मुक्त होशील.


156-4
ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥
अशा प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, त्यांच्याबद्दल वेदांत उत्तम तऱ्हेने वर्णन केलेले आहे.
457-4
परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें । येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥157॥
परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे? ते सर्व यज्ञ शरीर, मन व इंद्रिय यांच्या क्रियांनी उत्पन्न होतात. ते सर्व यज्ञ फलाच्या इच्छेने केल्यास बंधन प्राप्त होते. ते सूत्र जाणले, की कर्मबंधन प्राप्त होणार नाही.
श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते॥4.33॥

भावार्थ :- हे अर्जुना, सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा “ज्ञानयज्ञ” हा श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात.
158-4
अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जयां नव्हाळियेचे फळ । स्वर्गसुख ॥158॥
हे अर्जुना, ज्याचा मूळ आधार वेद आहे आणि ज्यामध्ये अनेक कर्मे सांगितली आहेत, तसेच ज्यापासून केवळ स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते,
159-4
ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥159॥
ते द्रव्यादी यज्ञ आहे, परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपले जाते, त्याप्रमाणे सर्व यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत.
160-4
देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥160॥
परमात्म – सुखाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी साधक हे बुद्धीच्या डोळ्यामध्ये जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाहीत,


161-4
जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ॥161॥
ते ज्ञान चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. जे कर्मातीत बोधाची खाण आहे आणि आत्मज्ञानाची भूक लागलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे.
162-4
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रिये विसरलीं । इंद्रियसंगु ॥162॥
ज्याच्या ठीकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी नाहीशी होते, ज्याच्या योगाने सर्व इंद्रिय विषयसंग विसरून जातात,
163-4
मनाचे मनपण गेलें । जेथ बोलाचे बोलपण ठेलें । जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसें ॥163॥
ज्या ठिकाणी मनाचे मनपन संपून जाते, शब्दाची धाव थांबली जाते, ज्यामध्ये जाणवयाची वस्तू ब्रम्ह, हे प्रत्येक्ष अनुभवास येते,
164-4
जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहता सहज भेटे । आपणपें ॥164॥
जेथे वैराग्याचे दारिद्र संपून जाते, विवेकाची हाव बंद पडते आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता सहजपणे ब्रह्मची अनुभूती येते,
तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः॥4.34॥

भावार्थ :- साष्टांग नमस्कार करून, मनोभावे त्यांची सेवा करून, निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून ते ज्ञान तू समजून घे. ते तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.
165-4
तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥165॥
ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल, तर संतांना सर्वभावाने भजावें.


166-4
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥166॥
हे संत म्हणजे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना ! संतांची मनोभावे सेवा करून त्यांना आपलेसे कर.
167-4
तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥167॥
शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे. सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे.
168-4
मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणे अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ॥168॥
ज्या आत्मज्ञानासंबंधी आपणास अपेक्षा असते, त्यासंबंधी आपण प्रश्न केला, तर त्याचे उत्तर संत सांगतात, ते ज्ञान आपल्या अंतःकरणात बिंबले जाते आणि मनात संकल्प निर्माण होत नाहीत.
यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥4.35॥

भावार्थ :- हे पांडुपुत्रा ! ते ज्ञान प्राप्त झाले म्हणजे तुला पुनः भेदरूपी मोह होणार नाही. मी आत्मस्वरूप असून माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत, असे तू या ज्ञानाने जाणशील.
169-4
जयाचेनि वाक्यउजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडे । निःशंकु होय ॥169॥
संतांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्भय झालेले चित्त ब्रम्हाप्रमाणे शंकारहीत होईल.
170-4
ते वेळीं आपणपेया सहितें । इये अशेषेंही भूतें । माझां स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥170॥
त्यावेळी तू आपल्यासह ही सर्व भुते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील.


171-4
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल । जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥171॥
हे पार्था ! अशाप्रकारे सद्गुरूंची कृपा होईल, त्यावेळी तुझ्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश उदयाला येईल आणि मोहरूप अंधकार नाहीसा होईल.
अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि॥4.36॥

भावार्थ :- तू सर्व पापी लोकांच्या पेक्षाही अधिक पापी असलास, तरी ज्ञानरूपी नौकेच्या आधाराने पापरूपी सागरातून अनायासे तरुण जाशील.
172-4
जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥172॥
तू पातकांचे आगर (खाण), भ्रमाचा सागर किंवा संशयाचा मोठा डोंगर जरी असलास,
173-4
तर्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें । हें आघवेंची गा थोकडें । ऐसे सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानी इये ॥173॥
तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व लहान आहे, इतके या ज्ञानामध्ये सर्व दोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे.
174-4
देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कवडसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥174॥
निराकार परब्रम्हाची पडछाया म्हणून असणारा हा जो विश्वाचा पसारा, तो ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. म्हणजे ज्ञान झाले असता संपूर्ण विश्वभ्रम नाहीसा होऊन जातो.
175-4
तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ । नाहीं येणें पाडें हे ढिसाळ । दुजें जगीं ॥175॥
त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे काय आहे? पण अशी तुलना करणेही योग्य नाही. कारण, या जगात याच्यासारखे महान असे दुसरे कांही नाही.
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा॥4.37॥

भावार्थ :- हे अर्जुना ! ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकडांना भस्मसात् करतो, त्याप्रमाणे परमात्मज्ञानस्वरूप दिव्य अग्नी हा सर्व प्रकारचे कर्मबंध जाळून टाकतो.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading