201-6
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । तंव बाहुमुळीं दिसे । थोरवी आली॥201॥
नंतर सहजच डाव्या पायावर दोन्ही हात द्रोणाकर करून ठेवाव्यात. त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात.
202-6
माजी उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारीची कवाडें । लागूं पहाती ॥202॥
उंचावलेल्या दंडाकार खांद्यामुळे शिरकमल दोन्ही खांद्यात घट्ट राहते. मग डोळ्यांच्या पापण्या हळूहळू मिटू लागतात.
203-6
वरचिलें पाती ढळती । तळींची तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥203॥
वरची पापणी खाली येते व खालची पापणी खालीच विकसित होते. त्यावेळी डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिलेली अशी दृष्टी होते.
204-6
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥204॥
दृष्टी ही आतल्याआत अंतर्मुख होऊनही स्वतःच्या इच्छेने बाहेर पाऊल टाकते आणि नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते.
205-6
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥205॥
अर्धोन्मीलित स्थितीमध्ये दृष्टी आतच राहते, ती पुनः बाहेर येत नाही; म्हणून अर्धीच दृष्टी नाकाच्या शेंड्याच्या ठिकाणी स्थिर राहते.
206-6
आतां दिशांचि भेटी घ्यावी । कां रुपाची वाट पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥206॥
आता दिशांची भेट घ्यावी म्हणजे चोहीकडे पाहावे अथवा रूपाची वाट पहावी, रूप या विषयाकडे धाव घ्यावी, ही इच्छा सहजच नाहीशी होते.
207-6
मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौति दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥207॥
मग कंठ संकुचित होत जातो. हनुवटी कंठच्या हाडांवर घट्ट बसते. ती जादा बळकट होऊन छातीवर दाब येतो.
208-6
माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥208॥
हे अर्जुना ! त्या हनुवाटीच्या खाली गळ्याची घाटी दिसेनाशी होते. अशा प्रकारे हानुवाटीचा गळ्यावर जो बंध निर्माण होतो, त्याला जालंधरबंध असे म्हणतात.
209-6
नाभीवरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु॥209॥
वोढियाना बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाऊन छोटे होते आणि हृद्यकमल आतमध्ये विकसित होते.
210-6
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभीस्थानातळवटीं । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो॥210॥
यामुळे स्वाधिष्ठानचक्राच्या वरच्या बाजूला आणि बेंबीच्या खालच्या भागाला बंध पडतो, त्याला वोढीयानबंध असे म्हणतात.
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः॥6.14॥
भावार्थ :- योगी पुरुषाने अंतःकरण प्रसन्न ठेऊन, निर्भय होऊन ब्रम्हचर्य व्रताचे पालन करावे आणि मनाचे संयमन करून माझे चिंतन करीत मत्परायन होऊन (आसनावर बसावे) राहावे.
211-6
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥211॥
अशा प्रकाराने शरीराच्या बाहेर योग- अभ्यासाची छाया पसरते, त्यावेळी आतील मनाच्या चंचलतेच्या संस्काराचा जोर नाहीसा होतो,
212-6
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥212॥
कल्पना नाहीशी होऊन जाते, बाह्य विषयाकडे धावणाऱ्या मनाची हाव थांबते आणि शरीर आणि मन सहजच शांत होते.
213-6
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥213॥
भुकेचे काय झाले? झोप कोठे निघून गेली? याची आठ्वनदेखील नाहीशी होऊन जाते. त्याचा वेग दिसतदेखील नाही.
214-6
जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥
मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू ऊर्ध्व गतीने माघारी फिरतो आणि सहजच अवघडलेला होऊन वर फुगू लागतो.
215-6
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपुरेंसी झुंजे । राहोनियां ॥215॥
तो अपानवायू क्षोभुन बलशाही होतो आणि अडकलेल्या ठिकाणी मोठ्याने आवाज करतो. तेथेच राहून तो मणिपूरचक्राला धक्के देतो.
216-6
मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥
अशा तर्हेने बळावलेली वावटळ पोटात चोहीकडे फिरून ढवळाढवळ करते आणि बालपणापासून शरीरात साचलेली कुजकी घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.
217-6
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी ॥217॥
त्या अपानवायूला आत वळण घेण्यास कोठे जागा नसल्यामुळे तो कोठ्यात शिरतो वात, पित्त यांचा थारा राहून देत नाही.
218-6
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥
तो वायू सप्त धातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे पर्वत फोडून टाकतो आणि देहमध्ये हाडांत असलेली मज्जा ओरपुन बाहेर काढतो.
219-6
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकांते भेडसावी । परि बिहावें ना ॥219॥
तो नाड्यांच्या गाठी सोडुवून टाकतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो, परंतु साधकाने भिऊ नये.
220-6
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥220॥
तो वायू शरीरात अचानक रोग निर्माण करतो आणि ताबडतोब नाहीसा करतो, शरीरातील पृथ्वी व पाण्याचे अंश एकमेकांत कालवितो.
221-6
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥221॥
हे अर्जुना !! त्यावेळी दुसरीकडे वज्रसनामुळे निर्माण झालेली शरीरातील उष्णता ही कुंडलिनी नावाच्या प्राणशक्तीला जागृत करते.
222-6
नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥222॥
नागिनींच्या पिलाला कुंकवाने स्नान घातल्यावर ते ज्याप्रमाणे वेटोळे घालून निजते,
223-6
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥223॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे झोपी गेलेली असते.
224-6
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥224॥
ती कुंडलिनी म्हणजे जणू काय वाटोळी कडी, अग्नीच्या ज्वालांची घडी अथवा शुद्ध सोन्याची आटवून तयार केलेली चकचकित लगड होय.
225-6
तैसी सुबध्द आटली । पुटीं होती दाटली । तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥225॥
त्याप्रमाणे ती पद्धतशीर संकुचित झालेली, नाभिजवळच्या संकुचित जागेत दातून बसलेली असते, ती वज्रसनामुळे चिमटली जाते आणि जागृत होते.
