पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोसिला साप”

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पदवी (डिग्री) मिळाली की, सुरुवात होते, ती नोकरी शोधण्याची… मग आपण अगदी भोळे भाबडे, सज्जन आहोत असे बनून व भासवून एखाद्या कंपनीत, संस्थेमध्ये किंवा सरकारी कार्यालयात मुलाखत (“इंटरव्ह्यू”) द्यायला जातो.. जसे काही आपल्यासारखे प्रामाणिक, शिष्टाचारी व कधीच हातून पाप झाले नाही, अशा अविर्भावात त्यांच्यासोबत तेथे वागतो… नोकरी सुरू होते… नंतर मग वरिष्ठांशी, अधिकाऱ्यांशी व संस्थाचालकांशी न्याय व हक्काच्या गोष्टी कशा आहेत, हे सांगायला आणि त्यांना समजावयाला तो महाभाग सुरुवात करतो… तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेलेले असते… ज्यांनी आपल्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून, रक्ताचे पाणी करून आणि खस्ता खाऊन जे संस्थारुपी रोप लावलेले असते, त्याच्याशी यांचे काहीही एक देणेघेणे नसते… उलट त्या झाडाचे रक्त जास्तीत जास्त कसे शोषता येईल, याकडे त्यांचे लक्ष असते… कल असतो…

मग संस्थेने उभी केलेली इमारत असो, वा तेथील साहित्य, महत्त्वाचे दप्तर, केरकचरा किंवा इतर गोष्टी… यांच्यांशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो… ते तिकडे मुद्दाम कानाडोळा करतात… वाजले किती व वाढले किती, अशा न्यायाने वागणारी ही लबाड मंडळी नोकरीचे हे तास कसे व कधी संपतील आणि आपल्याला घरी कसे पळता येईल या चिंतेत असतात… कर्तव्यात कसूर करणाऱ्या सहकाऱ्यांचा एक गट बनवून म्हणजेच तयार करून ज्यांच्यासमोर सुरुवातीला नम्रपणाचे ढोंग करणारे, लोटांगण घालणारे आता आपले वरिष्ठ कसे वाईट आहेत, हे जगाला पटवून सांगायला लागतात… त्यासाठी ते आपल्या जीवाचा आटापिटा करतात… आपला वेळ सत्कारणी न लावता गावभर ते वरिष्ठांची निंदा-नालस्ती करत फिरत असतात… परंतु आपण तेथेच विसरतो की, त्यावेळी नियती देखील आपल्याकडे चोरून पाहत असते… जे कृत्य आपण करतो, त्याची परतफेड मग आयुष्याच्या वळणावर ती नियती सुध्दा करत असते… तेव्हा वेळ निघून गेलेली असते… याच दरम्यान बदल्या व बढत्या होऊ नयेत म्हणून यासंबंधी यांचाच एक गट बाहेर कर्यरत असतो… तात्पर्य काय, तर सापापेक्षा कामचुकार सुशिक्षित साप भयानक असतात… पहा पटतंय का?…

कडू आहे, परंतु सत्य आहे… “पुण्य करता होय पाप”, दूध पाजोनी पोसिला साप” असेच उपकारकर्त्यांना वाटले, तर नवल नाही… आपल्या कामासाठी हात जोडणारे, पाया पडणारे लोकं स्वार्थासाठी आपल्या डोक्यावर बसायला मागेपुढे बघत नाहीत… न्याय-हक्कासाठी लढणारेच हे महाभाग आपल्या कामकाजात हयगय व टाळाटाळ करून कामचुकारपणा करतात… त्यामुळे त्यांची स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती थांबते… याला जबाबदार त्यांचे आडमुठे धोरणच असते… हे कळायला त्यांची निवृत्ती जवळ येऊन ठेपलेली असते… झोपेचे सोंग घेतलेल्या या ढोग्यांना उशिराही शहाणपण येत नाही… हेच आपले दुर्दैव आहे… सेवाकाळात पगाराएवढे काम न करणाऱ्या अशा नोकरदारांना पदरमोड करून मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कारखानदारांचा किंवा संस्थाचालकांचा त्याग कसा कळणार आणि समजणार?…

याचेही संबंधितांनी आत्मचिंतन करायला काय हरकत आहे?… “जगा आणि जगू द्या” असा त्यांचा दृष्टिकोन का नसतो?… सामाजिक बांधिलकीचे भान न ठेवणारे, सातत्याने जबाबदारी टाळणारे काही दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची वेतन कपात करणारे, नियमानुसार वेतनवाढ रोखणारे वरिष्ठ हे त्यांच्या दृष्टीने कसे चांगले असतील?… नेमके कोणाचे चुकते?… याबाबत सर्वांनी अंतर्मुख झाल्यास बरे होईल… नाही का?… अनेकदा कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या वरिष्ठांचा या महाभागांना राग येतो… शिस्तप्रिय जीवन आणि जबाबदाऱ्या यांना नकोशा वाटतात… बदलत्या आव्हानांना यांना सामोरे जाता येत नाही… विद्येची वाण असलेले असे हे विद्वान व महागुरु आपणास बऱ्याच ठिकाणी भेटतात किंवा आढळून येतात… ही वस्तुस्थिती देश हिताला अतिशय घातक आणि मारक आहे… म्हणूनच याची खंत वाटते… झोपेचे सोंग घेणाऱ्या या ढोग्यांना परमेश्वर वेळीच सुबुद्धी देवो… मुद्दाम असे वागणाऱ्या महाभागांना एवढेच म्हणता येईल की, तुका म्हणे ऐशा नरा | मोजोनी माराव्या पैजारा

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *