सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

226-2
सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥226॥
अर्जुना, सुखाच्या वेळी संतोष मानू नको, दुःखाच्या वेळी खेद करू नकोउ.आणि मनात लाभ किंवा हानी याचा (कसलाही) विचार करू नकोस.
227-2
एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥227॥
या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा देहच नाहिसा होईल, या पुढील गोष्टींचे युद्धपूर्वी (आगोदरच) चिंतन करत बसू नको.
228-2
आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां । जे पावें तें निवांता । साहोनि जावें ॥228॥
आपल्या विहित स्वधर्माने वागत असताना, जे कांही (आपले बरे-वाईट) प्रसंग आपल्याला येतील ते (शांतपणे) निमूटपणे सहन करावे
229-2
ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥229॥
अशी मनाची तयारी होईल.(मन शांत होईल) मन शांत झाल्यामुळे स्वभावतःच तुझ्याकडून पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल झुंज देण्यास तयार व्हावे.
एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि॥2.39॥

भावार्थ :- अर्जुना !! आतापर्यँत तुला सांख्यविषयक (आत्मज्ञान – विचार) ज्ञान सांगितले. आता निष्काम कर्मयोगासबंधी ज्ञान सांगतो. त्याने तू कर्मबंधनापासून मुक्त होशील.
230-2
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥230॥
आत्तापर्यंत तुला आत्मज्ञान (ज्ञानमार्ग) संक्षिप्तपणे सांगितला, आता निश्चित असा निष्काम कर्मयोग सांगतो, तो तू ऐक.


231-2
जया बुद्धियुक्ता । आहालिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥231॥
हे अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याने आचरली. त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही.
232-2
जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ॥232॥
ज्याप्रमाने अंगात वज्रकवच (चिलखत)घातले म्हणजे शस्त्रांची वृष्टी सहन करता येते.इतचेच नव्हे तर (अंगाला शस्त्र स्पर्शहि)न करता विजय मिळवून राहता येते.
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्॥2.40॥

भावार्थ :- या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. यात कोणताही दोष नाही. या धर्माचे थोडे अनुष्ठानही मोठ्या भयापासून रक्षण करते.
233-2
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥233॥
त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वी पासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने सुरु असलेले दिसून येते. त्या कर्मयोगात ऐहिक सुखांचा नाश तर होत नाहीच, शिवाय मोक्षसुख ही तर ठेवलेलाच आहे.(प्राप्त होते)
234-2
कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥234॥
म्हणून निष्काम कर्म करीत रहावे. परंतू कर्माच्या फळावर नजर ठेऊ नये. जसे मंत्र जाणणाऱ्यास भुताची बाधा होत नाही,
235-2
तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि । हां असतांचि उपाधि । आंकळू न सके ॥235॥
त्याप्रमाणे अंतःकरणात आसक्ती न ठेवता (अनासक्त) भावाने कर्म करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली,.हा उपाधित (देह धारण करून देखील) असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही.


236-2
जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥236॥
ज्या बुद्धीत (योगी, संत, परमतत्व स्वरूप ब्रम्हस्थितीस प्राप्त झालेले असे) कर्मफळांचा प्रवेश होत नाही. जी सूक्ष्म व निश्चल झालेली आहे आणि जिला (सात्विक, राजस, तामस) तीन गुणांचा मूळीच स्पर्श होत नाही,
237-2
अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥237॥
अर्जुना ! सद्बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याईने थोडीशीच अंतःकरणात (प्रकाशित) प्रगट झाली, तर तेवढ्यानेच संसाराचे संपूर्ण भिती नाहिसे होते.
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम्॥2.41॥

भावार्थ :- हे अर्जुना, येथे (कर्मयोगात) निश्चयात्मक (इश्वरनिष्ठ) बुद्धी एकच असते. (अज्ञानी, चंचल, सकामी) अनिश्चित व्यक्तींची बुद्धी (वृक्षाच्या शाखेप्रमाणे) अनेक भेदानी युक्त अशा अनंत बुद्धी असतात.
238-2
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी । तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥238॥
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असते, पण, तिचा मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणे अंतःकरणातील निष्काम कर्माची सद्बुद्धी (अल्प जरी असली तरी तीला) लहान (म्हणजेच महान आहे) आहे, असे म्हणू नये.
239-2
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरी । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥239॥
हे अर्जूना ! विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात. कारण या चाराचात सद्बुद्धी ही सहज प्राप्त होणे (शक्य नाही) ही दूर्लभ आहे.
240-2
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥240॥
ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण ‘परीस’ काही मिळत नाही, किंवा ‘लेशमात्र अमृत’ सापडण्यास तसाच दैवयोग लागतो.


241-2
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥241॥
त्याप्रमाणेच, परमेश्वराशी एकरूपता प्राप्त (परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय) अशी ही सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी संगरालाच मिळते,
242-2
तैसी ईश्वरावांचूनि कांही । जिये आणिक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥242॥
त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून दुसरे आश्रयस्थान नाही, (ईश्वरप्राप्ती शिवाय इतर काहीही प्राप्त करणे नाही) (किंवा अंतिम ध्येय ईश्वर प्राप्तीच करणे) अर्जुना, अशी या जगामध्ये जगात एकच सद्बुद्धी आहे, हे जाण.
243-2
येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥243॥
(सद्बुद्धी शिवाय,) इतर त्या दूर्बुद्धीच आहेत.अशा दूर्बुद्धीत अनेक विकार (अविचार) उत्पन्न होतात. आणि आशा बुद्धीच्या ठिकाणी अविचारी लोक रममाण (रमून गेलेले असतात) होतात.
244-2
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥244॥
म्हणून हे पार्था ! आशा (अविवेकी, अविचारी) लोकांना स्वर्ग, संसार किंवा नरकावस्था हे प्राप्त हातात.परंतू त्यांना आत्मसुखाच (आत्मानंदाचे अनुभव) मुळीच दर्शन होत नाही.
यामिनां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः॥2.42॥

भावार्थ :- हे अर्जुना, वेदांच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममाण झालेले अविवेकी लोक (स्वर्गसुख व त्याचे साधन जे कर्म याशिवाय) सकाम कर्मशिवाय दुसरे काही नाही, अशी शोभायुक्त (मनोहर दिसते) दिखाऊ वाणी (वेदांची पुष्पित, किंवा रोचक वाणी तिच्या) च्या आधाराने बोलतात.
245-2
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥245॥
असे (अविचारांच्या अधिन) असणारे लोक वेदांतील वाचनाचा आधारा घेऊन बोलतात. (केवळ फलाची अपेक्षा ठेवूनच कर्म करतात) केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात, कर्मफळाची आसक्ती, लोभ त्यांच्या हृदयात असते.


246-2
म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥246॥
ते म्हणतात, मृत्यूलोकी जन्माला यावे, यज्ञादि कर्मे करावीत व आल्हाददायक असे मनोहर स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा.
247-2
एथ हें वांचूनि कांही । आणिक सर्वथा सुखचि नाही । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥247॥
मृत्युलोकी, (इहलोकी)उपभोगाच्या सुखासारखे दुसरे सुख नाही, असे द्रूबुद्धी असलेले लोक नेहमी असे (बोलतात) म्हणतात. अर्जुना हे तू जाण.
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति॥2.43॥

भावार्थ :- विषयभोगाविषयी तत्पर व स्वर्गसुखाच्या मागे लागलेले, भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसंबंधाने जीच्यामध्ये अनेक कर्माचे वर्णन केले आहे. जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी बोली बोलणारे,
248-2
देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥248॥
असे पाहा की, हे अविचारी लोक सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून (कामना आसक्त होवून) (भोगजण्य सुखावर), फळाची इच्छा मनात धरून ते कर्मे करतात.
249-2
क्रियाविशेषें बहुतें । न लोपितीं विधीतें । निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥249॥
शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे अनेक प्रकारची (अनुष्ठाने मनलावून) कर्मे करतात. आणि त्यात निपुण होऊन यत्किंचितहि चूक न होऊ देता अगदी दक्षतेने धर्माचरण करतात.
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते॥2.44॥
भावार्थ :- त्या वाणीद्वारा ज्यांचे चित्त हरण केलेले आहे, तसेच भोग व ऐश्वर्य यांची आसक्ती असणाऱ्या (ज्यांची विवेकबुद्धी झाकलेली आहे) अशा पुरुषांच्या अंतःकरणांमध्ये भगवंताशी एकरूप असणारी सद्बुद्धी असत नाही. (उदभवत नाही)
250-2
परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥250॥
अर्जूना, हे लोक एकच गोष्ट फार वाईट करतात, ती ही की, ते मनामध्ये स्वर्गसुखाची इच्छा धरतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा, त्यालाच नेमके विसरतात.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *