सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६७६ ते ७०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
,

676-18
कां हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणीं धडाडितु । अग्नि होय ॥676॥
अथवा कितीही थंड पदार्थ जर अग्नित घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो, 676
677-18
नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठीं । होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवीं ॥677॥
किंवा अर्जुना, कितीही उत्तम पदार्थ असेल तरी त्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो, 677
678-18
तैसें पुढिलाचें बरवें । जयाच्या भीतरीं पावे । आणि विरुद्धचि आघवें । होऊनि निगे ॥678॥
त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले याने ऐकिले केले किंवा पाहिले तर ते त्याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो. (त्याला वाईट वाटते) 678
679-18
जो गुण घे दे दोख । अमृताचें करी विख । दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥679॥
सर्पास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर जो त्याच दुर्गुण मानतो; 679
980-18
आणि ऐहिकीं जियावें । जेणें परत्रा साच यावें । तें उचित कृत्य पावे । अवसरीं जिये ॥680॥
आणि इहलोकी कीर्ती होवून ज्याचे योगाने परलोक ही मिळेल असे कृत्य ज्यावेळेस प्राप्त होईल; 680

681-18
तेव्हां जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारीं जैसी । विटाळें लोटे ॥681॥
त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते; आणि वाईट कर्माचे वेळेस तीच झोप विटाळशी सारखी दूर राहते. 681
682-18
पैं द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । कां डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥682॥
हे पहा, द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसांत ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो, किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसात फुटतात, 682
683-18
तैसा कल्याणकाळु पाहे । तैं तयातें आळसु खाये । ना प्रमादीं तरी होये । तो म्हणे तैसें ॥683॥
त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सत्शास्त्र अशी वेळ आली असता श्रवणाची वेळ आली असता त्याच्यावरच लोटतो, आणि अन्यायाचे कर्म करण्याचे वेळी तोच आळस त्याचे हुकुमांत वागतो. 683
684-18
जेवींचि सागराच्या पोटीं । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गांठीं । जिवाचिये जो ॥684॥
जसा समुद्राची पोटांत अग्नी(वडवानळ) अखंड जळत असतो, तसा याच्या अंतकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही, असा विशाद असतो. 684
685-18
लेंडोराआगीं धूमावधि । कां अपाना आंगीं दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादें केला ॥685॥
लेंड्यांचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्त असतो, तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते (विषयात मनांत बाळगतो) 685

686-18
आणि कल्पांताचिया पारा । वेगळेंही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥686॥
आणि अर्जुना, कल्पांताच्याही पलीकडे, लाभ होईल, अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो; 686
687-18
अगा जगाही परौती । शुचा वाहे पैं चित्तीं । करितां विषीं हातीं । तृणही न लगे ॥687॥
अरे, जगातील जे लोक व्यापार करीत नाहीत, ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो, परंतु ज्यापासून तृणाचाही लाभ त्यास होत नाही, 687
688-18
ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥688॥
असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीत होय, तो नि:संशय तामस कर्त जाण. 688
689-18
एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहींचें त्रिधा चिन्ह । दाविलें तुज सुजन । चक्रवर्ती ॥689॥
याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे सांगितली. 689
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥18.29॥

690-18
आतां अविद्येचिया गांवीं । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाचीं आघवीं । लेऊनि लेणीं ॥690॥
आता अज्ञानरूपी गावांत मोहरूपी वस्त्र नेसून संशयरुपी सर्व अलंकार घालून, 690

691-18
आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसां पाहे सावयव । तिये बुद्धीचीही धांव । त्रिधा असे ॥691॥
आत्मनिश्चयाचा चांगलेपणाचा ज्या बुद्धीरूप आरशात स्पष्ट दिसतो, त्या बुद्धीचे तीन प्रकार आहेत, 691
692-18
अगा सत्वादि गुणीं इहीं । कायी एक तिहीं ठायीं । न कीजेचि येथ पाहीं । जगामाजीं ॥692॥
अर्जुना, अरे ! या सत्व-रज-तम गुणांनी जगांतील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले नाहीत? 692
693-18
आगी न वसतां पोटीं । कवण काष्ठ असे सृष्टीं । तैसें तें कैंचें दृश्यकोटीं । त्रिविध जें नोहे ॥693॥
पोटांत अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते लाकूड आहे? त्याप्रमाणे जिचे तीन प्रकार नाहीत, अशी दृश्य वस्तुत कोणती वस्तू आहे? 693
694-18
म्हणौनि तिहीं गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥694॥
म्हणून या तीन गुणांनी बुद्धीचे तीन प्रकार केले आहेत. तसेच बुद्धीचेही तीन भेद झालेले आहेत. 694
695-18
तेंचि येक वेगळालें । यथा चिन्हीं अळंकारलें । सांगिजैल उपाइलें । भेदलेपणें ॥695॥
तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हासहवर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. 695

696-18
परी बुद्धि धृति इयां । दोहीं भागामाजीं धनंजया । आधीं रूप बुद्धीचिया । भेदासि करूं ॥696॥
परंतु हे धनंजया, बुद्धी व धृत्ति या दोहोंपैकी अगोदर बुद्धीच्या भेदाची कारणे सांगतो. 696
697-18
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणियां येतिया वाटा । तिनी आथी ॥697॥
तर हे सुभटा, मनुष्याला या संसारांत येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे तीन मार्ग आहेत. 697
698-18
जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभयें सबाध । जीवां ययां ॥698॥
ते तीन मार्ग म्हणजे अकरणीय, काम्य व निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहेत आणि प्राणिमात्राला यांच्यापासून संसार भय प्राप्त असते. 698
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥18.30॥

699-18
म्हणौनि अधिकारें मानिलें । जें विधीचेनि वोघें आलें । तें एकचि येथ भलें । नित्य कर्म ॥699॥
याकरिता, या लोकी अधिकारसमंत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म, ते नित्यकर्म एक उत्तम होय, 699
700-18
तेंचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसें कां जळ । सेविजे ताहनें ॥700॥
तेच नित्यकर्म आत्मप्राप्ती रूप फळावर दृष्टी ठेवून, तृषा क्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे. 700

,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading