सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२०१ ते १२२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1201-18
पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे । तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥1201॥
किंवा जागे झाल्यावर आपण एकटेच असतो, व हे एकटेपणाचे स्फुरणही जो वर असते तो वर ते त्याला एकट्यालाच असते. 1201
1202-18
कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु । तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥1202॥
सूर्य प्रकाशु लागला म्हणजे आपला प्रकाशकही तोच असतो व आपण व आपला प्रकाश (प्रकाश्य प्रकाशक ) यातील अभेदही त्याच्याच मुळे समजतो 1202
1203-18
तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं । तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे ॥1203॥
त्याप्रमाणे वेद्य वस्तुच्या लोपानंतर केवळ त्यांचा वेदकमात्र उरतो; तो आपण आपल्याला जाणीत असतो ह्याची व ते ज्यायोगे (सत्तेवर) जाणतो त्याचीही ह्याला जाणीव असते. 1203
1204-18
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया । ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥1204॥
ते आपले आपल्या ठिकाणीं तें स्फुरद्रूप असणारे आपलें अद्वयपण ज्या ज्ञप्तिमात्र स्वरूपाच्या सत्तेवर प्रत्ययाला येते, ते जें ज्ञप्तिस्वरूप, तोच ईश्वर व मीही तोच, असे त्याला कळून येते. 1204
1205-18
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत । हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे ॥1205॥
मग, द्वैताद्वैतातीत, नि:संदेह मीच एक आत्मा सगळीकडे भरलेला आहे असे सर्वात्मज्ञान होऊन तेंही जाणणें स्वरूपानुभवांत लीन होतें. 1205

1206-18
तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण । तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं ॥1206॥
स्वप्नांतून जागे झाल्यावर कांही काळ, स्वप्नांतील द्वैतव्यवहाराच्या स्मृतिमुळे, आपले एकपण आपल्यास स्फुरत असते, पण पूर्ण जागृति आल्यावर आपण कोण असतों ह्याचे जसे भान नसतें. 1206
1207-18
कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं । नाटितां होय आटणी । अळंकाराचीही ॥1207॥
सुवर्णालंकार डोळयांनीं पहातांच, “जर” हें सर्व सुवर्ण आहे ’ अशा दृष्टीचा उदय झाला, तर न आटतांच अलंकाराचे अलंकारपण संपले. 1207
1208-18
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे । तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें ॥1208॥
किंवा मिठाचे पाणी झाले तर क्षारता जलरूपाने असते, पण ते पाणी झालेलें मीठही जेव्हां पृथ्वींत समरस होते, तेव्हां “ हे मीठ” असा मिठाचा वेगळेपणा उरत नाही किंवा भासतही नाही. 1208
1209-18
तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें । कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं ॥1209॥
त्याप्रमाणे ” मी ” “ तो ” हा जो व्यवहार असतो तो आत्मानंदानुभवांत एकत्र करून, तो, तेच आनंदरूप, जे माझे स्वरूप, त्यामध्ये प्रवेश करितो. 1209
1210-18
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे । ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं ॥1210॥
मग, ” तो ” ही भाषा संपल्यावर, त्याच्या अपेक्षेनी नांदणारें जें ” मी” ते तरी कोणावर स्थापावयाचे? असा ‘तू व मी’ विवर्जित जे माझे स्वरूप त्याच्याशी तो ऐक्य पावतो. 1210

1211-18
जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी । मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं ॥1211॥
कापुराच्या जळण्याची समाप्ति तीच अग्नीची समाप्ति होय. मग तेथे कापूरही नसतो व अग्नीही नसतो; केवळ आकाश असते. 1211
1212-18
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी ॥1212॥
एकांतून एक वजा केला कीं खाली शून्य उरतें, तसें “आहे नाहीं” ह्या व्यवहार लोपानंतरही तद्व्यवहार सिद्धि ज्यावर होते असें जें शेष (अवधिभूत ) वस्तु तें मीच होय. 1212
1213-18
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु । न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ ॥1213॥
अशा स्थितीत ब्रह्म, आत्मा, ईश, अशी भाषा बोलण्याने तिचे स्वारस्य किंवा महत्त्व नष्ट झाल्यासारखे होते; व तद्विषयक मौनाचा निश्चयही अयुक्तच होय (अशी बोलाबोलातीत ती वस्तु आहे) 1213
1214-14
न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी । जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें ॥1214॥
म्हणून, न बोलण्याचाही निश्चय सोडून त्याजबद्दल तोंड भरून चर्चा करावी; पण तें जाणले जाते किंवा जाणले जात नाही असा निश्चय न करितां या दोन्ही कल्पनाहून अतीत ( स्वसंवेद्य ) आहे असे जाण. 14
1215-18
तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंदु घेपे आनंदें । सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे ॥1215॥
त्या स्थितीत बोधरुपालाच बोध होतो, आनंदालाच आनंद व सुखालाच सुखाचा भोग घडत असतो. 15


1216-18
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा । विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं ॥1216॥
तेथे लाभालाच लाभ; प्रभेलाच प्रभेची भेट, अशी स्थिति असून, विस्मय विस्मयांतच समूळ बुडतो. 16
1217-18
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला । अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें ॥1217॥
तेथे समत्व साम्याला आलें,विश्राम विश्रांतीला आला व अनुभवालाच अनुभूतित्वरूप येऊन तोही वेडावला ! (नाहीसा झाला) 17
1218-18
किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ । सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥1218॥
क्रमयोगरूप वेलीचे पाणिग्रहण करणाऱ्या त्या योग्याला असें जें माझें निखळ (असंग) स्वरूप त्याची प्राप्ति होते.18
1219-18
पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं । मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा ॥1219॥
अर्जुना, ह्या सार्वभौम क्रमयोग्यानें माझी आपल्या मुकुटावर चिद्रत्न म्हणून योजना केली आहे, तो व्यवहार मोबदल्याचा आहे. (बदला मी त्याला माझ्या हृदयांत आत्मत्वाने स्थान दिले आहे) 19
1220-18
कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा । तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥1220॥
किंवा, त्या क्रमयोगरूपी मंदिरावर जो हा मोक्षरूपी कळस बसविला जाणार त्या कलशाची बैठक किंवा आंतील (घुमटीतील) पोकळी हा होतो. 1220

1221-18
नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी । जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे ॥1221॥
अथवा ह्या भवारण्यांतील क्रमयोग हा राजरस्ताच होय; ह्याने गेले असतां मद्पता ” हा जो सीमाप्रांत त्याला योगी मोजका येतो 21
1222-18
हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें । मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा ॥1222॥
अथवा हेंही असो; ह्या क्रमयोगरूपीं ओघांतून वाहणारी ही भक्तिचिद्गंगा, वेगाने, निजानंदसागर जो मी, त्या मला येऊन गांठते व मद्रुप होते. 22
1223-18
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा । म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही ॥1223॥
अर्जुना, हा क्रमयोग अखेरपर्यंत पोंचविणारा आहे, असा ह्याचा महिमा आहे;व म्हणूनच आम्ही त्याचे वारंवार वर्णन केले. 23
1224-18
पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें । तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही ॥1224॥
कारण, देशविशेषांत, कालविशेषांत अथवा साधनविशेषाने होणारी अशी माझी प्राप्ति नसून, मी सर्वांचा आत्माच असल्याने सर्वांना सर्वदा सहजच प्राप्त आहे. 24
1225-18
म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं । मी लाभें इयें उपायीं । साचचि गा ॥1225॥
म्हणून, माझ्या प्राप्त्यर्थे कोणतेही सायास करावे लागत नाहीत. ह्या वरील क्रमयोगाने मी निश्चयाने सहज प्राप्त होतों 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *