151-5
तरी वैराग्यचेनि आधारें । जिहीं विषय दवडुनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥151॥
ज्यांनी वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना मनातून बाहेर घालविले आहे व मन अंतर्मुख केले,
152-5
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी । तेथ पाठमोरी दिठी । पारुखोनियां ॥152॥
त्यांचा प्राण इडा-पिंगळा सोडून सुषुम्नामध्ये नेला जातो आणि स्वरूपामध्ये आणि स्वरूपामध्ये दृष्टी मागे वळवून स्थिर केली जाते.
153-5
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥153॥
उजव्या म्हणजे पिंगळा व डाव्या म्हणजे इडा नाकपुडीतून वाहत असलेल्या वायूची गती म्हणजे रेचक-पूरक बंद करून, कुंभक करून प्राण व अपान यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून चित्तास ते व्यमोगामी म्हणजे मुर्धन्योकाशकडे जाणारे करतात.
154-5
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्री मिळे । मग एकैक वेगळें । निवडु नये ॥154॥
जशी गंगानदी ही रस्त्यातून वाहणारे सर्व पाणी आपल्यामध्ये सामावून घेऊन सागरात मिळते, तेंव्हा त्या सागरामध्ये हे रस्त्यावरचे अशुद्ध पाणी आणि गंगेचे शुद्ध पाणी असा भेद करता येत नाही.
155-5
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळी गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥155॥
त्याप्रमाणे हे अर्जुना ! ज्यावेळी मनाचा प्राण – अपणाच्या निरोधाने
मुध्र्नी-आकाशात लय केला जातो, त्यावेळी वैषयीक वासनांचा विचारचक्रे आपोआप बंद पडतात.
156-5
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिमा नाहीं ॥156॥
ज्या मनोरुप पटावरती संसाररूपी अनेक प्रकारची चित्रे उमटत असतात, तो पटच फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही,
157-5
। मग अंहभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥157॥
त्याप्रमाणे मनाचा मनपणाच नाहीसा झाला, तर कोणत्याही प्रकारचे अहंभाव, भ्रम वगैरे कसे शिल्लक राहतील? म्हणून तो अनुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हरूप होतो.
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति॥5.29॥
भावार्थ :- यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर तसेच सर्वभूत प्राण्यांचा मित्र, अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप अखंड शांतीला प्राप्त होतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥5॥
158-5
आम्ही मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गे आले । म्हणऊनिया ॥158॥
जे पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हस्वरूपाला प्राप्त झाले, ते ह्या योगमार्गाने आले, म्हणून आम्ही याआधी मार्गविषयक निरूपण केले आहे.
159-5
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥159॥
ते पुरुष यम, नियम यांचे पर्वत ओलांडून, आणि योग- अभ्यासाचा सागर ओलांडून मोक्षाला प्राप्त झालेले असतात.
160-5
तिहीं आपणपें करुनि निर्लेप । प्रंपचाचें घेतलें माप । मग साचाचेंचि रुप । होऊनि ठेले ॥160॥
त्यांनी आपले अंतःकरण पूर्ण शुद्ध करून प्रपंचाला जाणून घेतलेले असते; आणि विश्वाचे सत्य अधिष्ठान जे परब्रम्ह, याच्याशी ते एकरूप होऊन राहिलेले असतात.
161-5
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ॥161॥
जेंव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला. तेंव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला.
162-5
तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । तें काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझे ॥162॥
श्रीकृष्णानी अर्जुनाच्या मनाची ही अवस्था जाणली व मग हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का??
163-5
तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥163॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, “हे देवा ! दुसऱ्याच्या मनातील भावभावना जाणणारे तुम्ही राजे आहात; त्यामुळे तुम्ही माझ्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणल
164-5
म्यां जें काहीं विवरुनि पुसावें । ते आधींचि कळले देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करुनि ॥164॥
हे देवा ! मी काही चिंतन करून तुम्हाला विचारावे, ते तुम्ही आधीच जाणलेले आहे. तरी आता आपण मागे जे योगासंबंधी सांगितले, तेच आता अधिक स्पष्ट करून सांगावे.
165-5
एऱ्हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥165॥
एरवीसुद्धा असा विचार करा की, तुम्ही जो योगशास्त्राचा मार्ग सांगितला, तो पोहून जाण्यापेक्षा पायउताराने जाणे जसे सोपे असते,
166-5
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हांसारिखियां अभोळां । एथ आहाति कांही परि काळा । तो साहों ये वर ॥166॥
तसा हा अष्टांगयोग सांख्ययोगा पेक्षा सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बलांना तो राजयोग समजण्यास काही काळ विलंब लागेल; पण तो विलंब सहन करता येईल.
167-5
म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥167॥
म्हणून हे देवा ! एक वेळ त्या अष्टांगयोगाचा अनुवाद करावा. जरी त्याचा विस्तार झाला,तरी चालेल; परंतु तो योगमार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगावा.
168-5
तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्ग गमला निका । तरी काय जाहलें ऐंकिजो कां । सुखें बोलों ॥168॥
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे का !! तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे? ऐक, आम्ही तो तो आनंदाने सांगतो.
169-5
अर्जुना तु परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ॥169॥
हे अर्जुना ! तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस करतोस, असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का बरे करावी??
170-5
आधींच चित्त मायेचें । वरी मिष जाहलें पढियंताचे । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥170॥
(ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.) आगोदरच आईचे अंतःकरणं,त्यात आवडत्या लेकाराचे आवडतेपणाचे निमित्त झाले; मग त्या ममतेच्या अद्भूततेची कल्पना कोणाला येईल??
171-5
ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि । हें असे नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥171॥
त्या अद्भुत प्रेमाला करुण्यरूपी जलाचा वर्षाव म्हणता येईल अथवा नूतन प्रेमाची सृष्टी म्हणता येईल. परंतु हे असो, श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे, हे कळत नाही.
172-5
जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊन मातली । म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणे ॥172॥
ही कृपादृष्टी अमृताच्या मुशीत ओतली अथवा प्रेम पिऊन मस्त झाली होती, म्हणून अर्जुनाविषयीच्या मोहमध्ये गुंतली असून तिला बाहेर येता येईना.
173-5
हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परि स्नेह रुपा नयेल । बोलवरी ॥173॥
या कृपादृष्टीसंबंधी जास्त बोलावे, तर कथेचे विषयांतर होईल. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अलौकिक प्रेमाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही.
174-5
म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु आकळावा कवणें । जो आपुलें मान नेणे । आपणचि ॥174॥
म्हणून हा विचार का बरे करावा? जो ईश्वर आपल्या अनंत स्वरूपाचे मोजमाप आपणच करू शकत नाही, तो ईश्वर कोणी बरे आकलन करावा.??
175-5
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥175॥
तरी मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून असे वाटते की, श्रीकृष्ण सहज मोहित बलात्काराने अर्जुनास असे म्हणेल की, “अरे बाबा ! मी सांगतो, ते ऐक.”
176-5
अर्जुना जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरुपिजेल ॥176॥
हे अर्जुना ! ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल, त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने सोप्या मनोरंजक भाषेत सांगेन.
177-5
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥177॥
तो योग कशाला म्हणतात?? त्या योगाचा उपयोग काय?? आणि त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो??
178-5
ऐसें जें जें कांही । उक्त असे इये ठाई । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥178॥
याप्रमाणे जे जे कांही या बाबतीत (शास्त्रात) सांगितले असेल, ते सर्वच मी तुला आता सांगेन, पाहा.
179-5
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥179॥
तू मन लावून ऐक. असे म्हणून भगवान श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल.
180-5
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करु प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥180॥
अर्जुनाशी असलेल्या द्वैत न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला जो राजयोग सांगितला, तो प्रसंग आम्ही स्पष्ट करून सांगतो, असे निवृत्तींनाथांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणाले.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – कर्मसंन्यासयोगोनाम्
पञ्चमोऽध्यायः॥5॥
॥ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु॥
॥ भगवद्गीता श्लोक :- 29 ॥ ॥ज्ञानेश्वरी ओव्या :-180 ॥
