सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

401-6
तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसी तुके ॥401॥
तो पंचमहाभुतात्मक शरीरांत जरी सापडला, तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण, अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो,
402-6
माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें । तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥402॥
ज्या अनुभवानें माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे, मग ‘ तो सर्वव्यापक झाला ‘ असे म्हटलेच पाहीजे असे नाही.
403-6
आतां शरीरीं तरी आहे । परि शरीराचा तो नोहे । ऐसें बोलवरी होये । तें करु ये काइ ॥403॥
हे पहा की, ह्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही. ही गोष्ट बोलून दाखविता येण्यासारखी नव्हे. तेव्हां तिचे वर्णन करितां येईल काय?
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः॥6.32॥

404-6
म्हणोनि असो तें विशेषें । अथवा आपणपेयांसारिखें । जो चराचर देखे । अखंडित ॥404॥
अर्थात् या विषयाबद्दल जास्त सांगणे नको. जो सदोदित आपल्यासारखेच सर्व जग मानतो.
405-6
सुखदुःखादि वर्मे । कां शुभाशुभे कर्में । दोनी ऐसी मनोधर्में । नेणेचि जो ॥405॥
जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनांत समजत नाही.

406-6
हे समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व । तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥406॥
हे सम आणि विषम असा मनांत भाव न धरता, याशिवाय इतर सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत, असे समजतो;
407-6
हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें । मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥407॥
यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगाव्या? ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवानें समजले आहे,
408-6
तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती । परि आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥408॥
त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी, आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात; तथापि आमच्या अनुभवानें तो परब्रह्म आहे.
409-6
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे । ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥409॥
म्हणून अर्जुना, ज्याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहतां येईल, आणि आपणां स्वतःसच विश्वरूप होता येईल, त्या समदृष्टीची तूं उपासना कर.
410-6
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं । जे साम्यापरौति जगीं । प्राप्ति नाहीं ॥410॥
आम्ही तुला पुष्कळ प्रसंगी याच कारणाकरिता असे सांगितले आहे की, समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्ति नाही.
अर्जुन उवाच –
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थित्तिं स्थिराम् ॥6.33॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥6.34॥

411-6
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥411॥
मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, देवा, तुम्ही आमची दया मनांत आणून हा समतेचा मार्ग सांगितला परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही.
412-6
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें । एऱ्हवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥412॥
हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहूं म्हटले तर ते सांपडत नाही. येरवी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे होत नाही.
413-6
म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल । कां राहा म्हणितलिया राहेल । महावातु ॥413॥
म्हणुन, माकडाला समाधि लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणतांच तो थांबणे ह्या गोष्टी कशा घडतील.
414-6
जें बुध्दीतें सळी । निश्चयाते टाळी । धैर्येसी हातफळी । मिळऊनि जाय ॥414॥
जे मन बुद्धीला हलवते, निश्चय मोडते, आणि धैर्याचे हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघुन जाते
415-6,
जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥415॥
जे विचाराला चकविते, संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दशदिशा हिंडविते,

416-6
जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥416॥
ज्याला कोंडले असता ते उसळून बाहेर येते, आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला साह्य करतो, असे हे मन आपला स्वभाव सोडील का?
417-6
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य होईल । हें विशेषेंही न घडेल । तयालागीं ॥417॥
म्हणून, एक मन जर स्थिर राहील, तर मग आम्हांला समदृष्टी प्राप्त होईल; परंतु मनाची अशीच चंचल वृत्ति असल्यामुळे ती प्राप्त होणे दुर्घट आहे.
श्रीभगवानुवाच –
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥6.35॥

418-6
तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥418॥
तेव्हां भगवान श्रीकृष्ण म्हणतात :- तूं जे बोललास, ते खरोखर तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे.
419-6
परि वैराग्यचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरि केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥419॥
परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले, तर कांही अवकाशाने हे स्थिर होईल.
420-6
कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिले गोडीचिया ठाया सोके । म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥420॥
कारण, या मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे. ज्याची याला चटक लागेल, त्याच ठिकाणी राहावयास हे सोकावते ! म्हणून कौतुकाने आत्मसुखाकडेसच याला वळवावे.
असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः॥6.36॥

421-6
एऱ्हवीं विरक्ती जयांसि नाही । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनू कायी ॥421॥
येरवी ज्याला वैराग्य नाही व जो अभ्यासही करीत नाही, त्याला हे मन आवरणार नाही असे आम्ही देखील कोठे मानीत नाही?
422-6
परी यमनियमांचिया वाटा न वंचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देऊनी ॥422॥
आणि जो यम, नियम, प्राणायाम, वैगेरेचा अभ्यास करीत नाही, ज्याला वैराग्याची कधी आठवण होत नाही, आणि जो केवळ विषयरूप जलांत माशासारखी बुडी देऊन राहीला आहे,
423-6
यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगे ॥423॥
आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीचा चिमटा कधी लागला नाही, त्याचे मन निश्चल कसे होईल सांग बरे?
424-6
म्हणोनि मनाचा निग्रह होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥424॥
म्हणून, मनाचा निग्रह करणे हा जो उपाय आहे त्याला तूं आरंभ कर; मग ते कसे निश्चल होत नाही ते पांहू !
425-6
तरी योगसाधन जितुकें । कें अवघेचि काय लटिकें । परि आपणयां अभ्यास न ठाके । हेंचि म्हण ॥425॥
तर योगसाधने म्हणून जेवढी आहेत, तेवढी सर्व काय खोटी आहेत? परंतु, आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण.

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *