सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १८०१ ते १८१० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

1801-18
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥1801॥
आणि विशेषत: येथे हाच ग्रंथ ज्यांनी आपलें उपजीव्य मानिलें आहे (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजयसुखाचां लाभ घडत जावा. 1801
1802-18
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥1802॥
तेव्हां सद्गुरू निवृत्तिनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ” तथास्तु ‘; तुझी ही इच्छा सफल होईल असा तुला प्रसाद आहे; त्यायोगें ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले. 2
1803-18
ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं । श्रीगोदावरीच्या कूलीं । दक्षिणलिंगीं ॥1803॥
याप्रमाणे कलियुगांत, महाराष्ट्र देशांत, गोदावरीच्या दक्षिण तीरावर, 3
1804-18
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥1804॥
त्रिभुवनांत पवित्र असलेले अनादि पंचक्रश क्षेत्र (नेवासें) येथे सर्व जगाचे जीवनसूत्र श्रीमहालय (मोहनीराज) आहे. 4
1805-18
तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥1805॥
त्या क्षेत्रांत यदुवंशाला भूषणभूत व सकलकलांचे स्थान असा न्यायनिष्ठ रामराजा होता. 5

1806-18
तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें । केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥1806॥
तेथे श्रीशंकरांपासून ज्यांची परपरा चालत आलेली आहे असे श्रीनिवृत्तिनाथ महाराज ह्यांचा शिष्य ज्ञानेश्वर ह्याने गीतेला देशी भाषेचा अलंकार चढविला. (रूप दिलें) 6
1807-18
एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं । श्रीकृष्णार्जुनीं बरवी । गोठी जे केली ॥1807॥
ह्याप्रमाणे, भारतांतील प्रसिद्ध भीष्मपर्वात श्रीकृष्णार्जुनांचा जो गोड संवाद झाला. 7
1808-18
जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर । परमहंसीं सरोवर । सेविजे जें ॥1808॥
जो उपनिषदांचे सार व शास्त्रांचे आद्यस्थान (माहेरघर) व परमहंसांचे क्रीडासरोवरच होय, 8
1809-18
तियें गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु । म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥1809॥
निवृत्तिनाथशिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात, त्या गीतेचा. अठरावा अध्याय हा कलश म्हणजे शेवटचा अध्याय होय. 9
1810-18
पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥1810॥
ह्या ग्रंथाच्या पुण्यरूपसंपत्तीने सर्व जीवमात्रांना उत्तरोत्तर संपूर्ण सुखप्राप्ति होवो. 10
1811-18
शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥1811॥
शके 1212 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनीं ही टीका केली ती सच्चिदानंद बाबांनी आदरपूर्वक लिहिली. 1811
॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां मोक्षसंन्यासयोगोनाम अष्टादशोऽध्यायः॥18॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-78 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 1810 ॥


श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन
केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या.


श्रीशके पंधराशें साहोत्तरीं । तारणनामसंवत्सरीं । एकाजनार्दनें अत्यादरीं । गीता-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥1॥
शके 1506 तारणनाम संवत्सरामध्ये श्रीजनार्दन महाराजांचे शिष्य एकनाथ महाराज ह्यांनीं गीता ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. 1

ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध । परी पाठांतरीं शुद्ध अबद्ध । तो शोधूनियां एवंविध । प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥2॥
ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध होता. परंतु लोकांतील पाठभेदानें क्वचित् शुद्धतेला बाध आला होता. तो पाठभेद शुद्ध करून आतां ह्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध झाली आहे. 2

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचितां टीका । ज्ञान होय लोकां । अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥3॥
ज्यांची गीतेवरील टीका (ज्ञानेश्वरी) वाचली असतां, गीतार्थाच्या अर्थाविषयीं आर्त असलेल्या भाविक लोकांना ज्ञानप्राप्ति होते, त्या अतिपवित्र ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार असो 3

बहुकाळपर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥4॥
फार वर्षांनीं येणान्या भाद्रपद महिन्यांतील कपिलाषष्ठीच्या पर्वणीचे सुयोगावर गोदातीर पैठणक्षेत्रांत प्रत शुद्ध करणे समाप्त झाले. 4

ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाटी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥5॥
ज्ञानेश्वरीच्या मूळच्या पाठांत जो पदरची ओवी प्रक्षिप्त करील (मराठी भाषेत) त्याने अमृताच्या ताटांत नरोटी (करवटी) ठेवण्या सारखेच होय. 5
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
॥ श्री परमात्मने नमः ॥ ॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *