सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६०१ ते १६२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1601-18
जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके । कीं तयासींही निमिखें । तेंचि होय ॥1601॥
दोन जलप्रवाह एकत्र होत असतां त्यांना जर मीठ बांधासारखे आडवें, तर तेंही क्षणांत जसे जलरूप होते 1
1602-18
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं । धरितां मजही वानी । तेंचि होतसे ॥1602॥
त्याप्रमाणे त्या दोघांच्या संगमांत व तेथील संवादांत जें ऐकिलें त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला कीं माझीही त्यांच्यासारखीच स्थिति झाली! 2
1603-18
ऐसें म्हणे ना मोटकें । तंव हिरोनि सात्विकें । आठव नेला नेणों कें । संजयपणाचा ॥1603॥
इतकें तो म्हणत आहे तोंच अष्टसात्विकभाव प्रादुर्भूत होऊन त्याच्या संजयपणची स्मृति त्यांनी कोठे नाहींशी केली तें कांहीं कळेना.3
1604-18
रोमांच जंव फरके । तंव तंव आंग सुरके । स्तंभ स्वेदांतें जिंके । एकला कंपु ॥1604॥
आंगावर जो जो रोमांच उभे राहिले तों तो शरीर संकुचित झाले व स्तब्धता व घामबिंदू ह्यांना एकट्या शरीरकंपानेच जणु जिकलें. 4
1605-18
अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नव्हती जैसें । द्रवत्वचि ॥1605॥
अद्वयानंदाच्या आविर्भावाने नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले; इतके कि कोणाला वाटावें ते अश्न नसून पाझरच लागले आहेत. 5

1606-18
नेणों काय न माय पोटीं । नेणों काय गुंफे कंठीं । वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥1606॥
पोटांत कांहीही सांठविणेस जागा नव्हती तें कशाने झालें न कळे; कंठ कशानेंदाटला तेंही कळेना व दीर्घश्वासामुळे वाणीही कार्यक्षम होईना, अशी स्थिति झाली. 6
1607-18
किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा । संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा ॥1607॥
किंबहुना, अष्टसात्विक भाव प्रगट होऊन संजयाची वाणी चाचरू लागली व तो कृष्णार्जुनसंवादाचा चव्हाटाच झाला. 7
1608-18
तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती । मग पुढती देहस्मृती । लाधली तेणें ॥1608॥
त्या सुखाची जातीच अशी आहे की, त्याचें भरतें आपोआप शमतें; म्हणून त्यायोगें संजय सहजच देहभानावर आला. 8
व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥18.75॥

1609-18
तेव्हां बैसतेनि आनंदें । म्हणे जी जें उपनिषदें । नेणती तें व्यासप्रसादें । ऐकिलें मियां ॥1609॥
मग आनंदाचें भरतें ओसरू लागल्यावर, संजय म्हणाला, उपनिषदांमध्येही उपलब्ध न होणारें श्रवण मला व्यासांच्या कृपेने घडलें.9
1610-18
ऐकतांचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी । मीतूंपणेंसीं दृष्टी । विरोनि गेली ॥1610॥
ते श्रवण घडतांच मला ब्रह्मस्थिति प्राप्त होऊन मीतुंपणासह सर्व विश्व मावळून गेले. 1610

1611-18
हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग । तयाचें वाक्य सवंग । केलें मज व्यासें ॥1611॥
सर्व, योगादि मार्ग ज्या ठिकाणाला येऊन समाप्ति पावतात असे भगवंतांचे वाक्य श्रीव्यासकृपेने मला अनायासें प्राप्त झाले. 11
1612-18
अहो अर्जुनाचेनि मिषें । आपणपेंचि दुजें ऐसें । नटोनि आपणया उद्देशें । बोलिलें जें देव ॥1612॥
अहो, अर्जुनाला निमित्त करून भगवान श्रीकृष्ण त्यारूपाने आपणच अवतरूनआपण आपल्याला जो उपदेश करून घेतला.12
1613-18
तेथ कीं माझें श्रोत्र । पाटाचें जालें जी पात्र । काय वानूं स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचें ॥1613॥
केवळ अशा परिस्थितींत जर माझे श्रोत्र त्या श्रवणाचे अधिकारी झाले, तर श्रीगुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याची योग्यता मी कशी वर्णन करू शकेन? 13
राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्
। केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥18.76॥

1614-18
राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । रत्नीं कीं रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥1614॥
रत्नकांति जशी फांकल्यामुळे त्याच्या आकारादि स्वरूपाला झांकते (त्याच्या आकाराची प्रथम कल्पना येऊ देत नाही.) त्याप्रमाणे, राजा धृतराष्ट्राला तें वृत्त सांगत असतां संजयाचें बसल्या जागीच देहभान जाऊन तो समाधिस्थ झाला. 14
1615-18
हिमवंतींचीं सरोवरें । चंद्रोदयीं होती काश्मीरें । मग सूर्यागमीं माघारें । द्रवत्व ये ॥1615॥
हिमालयांतील सरोवरें चंद्रोदयाच्या वेळीं गोठून जशीं स्फटिक मण्याप्रमाणे दिसतात व सूर्योदयाला पुन्हा त्यांना द्रवत्व येते.15

1616-18
तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्तीं । धरी आणि पुढती । तेंचि होय ॥1616॥
त्याप्रमाणे देहभानावर आला कीं, तो संवाद स्मरावा व पुन्हा त्या स्मरणाने त्याचा स्वरूपसमाधि लागावा असें होई. 16
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥18.77॥

1617-18
मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा । देखिलया उगा कां पां । असों लाहसी? ॥1617॥
मग हर्षभरांत उठून म्हणाला, राजा, श्रीहरीचें विश्वरूपदर्शन होऊनही, तू जागच्या जागी स्वस्थ कसा राहू शकतोस? 17
1618-18
न देखणेनि जें दिसे । नाहींपणेंचि जें असे । विसरें आठवे तें कैसें । चुकऊं आतां । ॥1618॥
न पहातांही जे दिसतें, जें नाहीं म्हटले तरी (नास्तित्व सिद्ध करणाराच्या रूपाने) असते; व विसरू जावें तर तोच त्याचा आठव; मग त्याला कसे टाळत येईल? 18
1619-18
देखोनि चमत्कारु । कीजे तो नाहीं पैसारु । मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥1619॥
तें विश्वरूप पाहून, काय हा चमत्कार असे म्हणण्यालाही अवसर नाहीं तोंच त्या आनंदाच्या महापुरांत मीही वाहून गेलों. (मला माझे भान उरले नाही.) 19
1620-18
ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमीं स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचें ॥1620॥
ह्याप्रमाणे श्रीकृष्णार्जुन संगमांत स्नान करून संजयानें अहंकाराची तिलांजली दिली. 620

1621-18
तेथ असंवरें आनंदें । अलौकिकही कांहीं स्फुंदे । श्रीकृष्ण म्हणे सद्गदें । वेळोवेळां ॥1621॥
त्या प्रसंगी अनावर आनंदानें तो कांही अलौकिक भाषणही करी व सद्गदित कंठाने वारंवार कृष्णनामोच्चारण चालत असे. 21
1622-18
या अवस्थांची कांहीं । कौरवांतें परी नाहीं । म्हणौनि रायें तें कांहीं । कल्पावें जंव ॥1622॥
संजयाच्या चित्ताच्या ह्या स्थितीची राजा धृतराष्ट्राला जर कांहींच वार्ता नव्हती तर त्याला त्याची नुसती कल्पना तरी कशी येणार? 22
1623-18
तंव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु । बुझाविला अवष्टंभु । संजयें तेणें ॥1623॥
तेव्हां झालेला सुखलाभ संजयाने आपल्याच ठिकाणीं स्थिर करून अष्टसात्विक भावाचा कुंज जिरविला. 23
1624-18
तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी । रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा? ॥1624॥
धृतराष्ट्र म्हणाला, संजया, युद्धांत कोणत्या वेळी काय घडतें (तें सांगण्यासाठी तुला येथे ठेविला असतां) हे सांगण्याचे सोडून हा अन्य प्रकार काय सांगत बसला आहेस? 24
1625-18
तेणें तूंतें येथें व्यासें । बैसविलें कासया उद्देशें । अप्रसंगामाजीं ऐसें । बोलसी काई? ॥1625॥
त्या व्यासांनीं तुला येथे कोणत्या उद्देशानें ठेविले, आणि ह्या अप्रासंगिक (भलत्याच) गोष्टी तू काय सांगत बसला आहेस? 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *