सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६२६ ते १६५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1626-18
रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया । कां रात्री होय पाहलया । निशाचरां ॥1626॥
एखादा जंगलांत राहाणारा मनुष्य राजमंदिरांत नेला तर त्याला तेथे दाही दिशा जशा उदास दिसतात, अथवा सूर्योदय झाला कीं निशाचरांची रात्र उजाडते. 26
1627-18
जो जेथिंचें गौरव नेणें । तयासि तें भिंगुळवाणें । म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो ॥1627॥
ज्याला ज्या गोष्टीचे महत्व समजण्याची बुद्धि नाही त्याला तें बेचव वाटणारच; मग धतराष्ट्राने कृष्णार्जुनसंवादकथनाला अप्रसंग म्हटले तर तें योग्यच होय. 27
1628-18
मग म्हणे सांगें प्रस्तुत । उदयलेंसे जें उत्कळित । तें कोणासि बा रे जैत । देईल शेखीं? ॥1628॥
मग धृतराष्ट्र म्हणाला. सध्या जें युद्ध चालले आहे त्यांत अखेर कोणाचा रे जय होणार? 28
1629-18
येऱ्हवीं विशेषें बहुतेक । आमुचें ऐसें मानसिक । जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥1629॥
एऱ्हवी, आमचा होरा तर असा धांवतो की, दुर्योधनाचा पक्ष अधिक पराक्रम आहे. 29
1630-18
आणि येरांचेनि पाडें । दळही याचें देव्हडें । म्हणौनि जैत फुडें । आणील ना तें? ॥1630॥
आणि सैन्याच्या बाजूने पहातांही पांडवापेक्षां त्याचे (दुर्योधनाचे) सैन्य दीढी आहे; मग ते शेवटीं जिकणार नाही काय? 1630

1631-18
आम्हां तंव गमे ऐसें । मा तुझें ज्योतिष कैसें । तें नेणों संजया असे । तैसें सांग पां ॥1631॥
आम्हाला तर असे वाटतें, संजया, तुझे ज्योतिष काय आहे हे आम्हाला माहीत नाही; असेल तसे सांग पाहू? 31
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥18.78॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः ॥18॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील मोक्षसंन्यासयोग नावाचा हा अठरावा अध्याय समाप्त झाला. ॥18॥
1632-18
यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचें मी नेणें । परी आयुष्य तेथें जिणें । हें फुडें कीं गा ॥1632॥
राजाच्या ह्या भाषणाला संजयानें उत्तर दिलें; “ कोण बलवान कीं कोणाचे सैन्य अधिक तें मला कांहीं समजत नाही; (मला एक कळतें) की ज्याच्या आयुष्याची दोरी मजबूत असेल तोच जगणार.” 32
1633-18
चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी ॥1633॥
चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे विचार, ह्या गोष्टी असावयाच्याच. 33
1634-18
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक । वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं ॥1634॥
राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध, अग्नि तेथे दाहकता असणारच. 38
1635-18
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु । सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा ॥1635॥
आणि दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ति व सुखप्राप्तींत पुरुषोत्तम जसा असतो.35

1636-18
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें । सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं ॥1636॥
वसंत तेथे वनश्री, वनश्री तेथे पुष्पे, आणि पुष्पे तेथे भ्रमरसमुदाय 36
1637-18
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन । दर्शनीं समाधान । आथी जैसें ॥1637॥
सद्गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथे किंवा तेंच आत्मदर्शन व आत्मदर्शन म्हणजेच समाधान हा जसा नियम. 37
1638-18
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें ॥1638॥
श्रीमंती तेथे सुखभोग, सुखभोग तेथे उल्हास किंवा जेथें सूर्य तेथे जसा प्रकाश, 38
1639-18
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥1639॥
त्याप्रमाणे, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ ज्याच्या योगे सनाथ आहेत, तो भगवान श्रीकृष्ण जेथे असणार तेथे लक्ष्मीही असावयाचीच 39
1640-18
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं । अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें? ॥1640॥
आणि, आपल्या पतीसहवर्तमान ती जगन्माता ज्याच्याकडे नांदते, त्याच्या अणिमादि सिद्धि काय दासी असणार नाहीत? 1640

1641-18
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें । तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे ॥1641॥
श्रीकृष्ण म्हणजे मूर्तीमंत विजय; तो ज्याच्या पक्षाल असेल, त्या पक्षाला निश्चयैकरून जय आहेच. 41
1642-18
विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे ॥1642॥
अर्जुन स्वतः “ विजय ” ह्या नांवानेच प्रसिद्ध आहे विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान त्याच्या बाजूला आहेत; भगवान तेथें विजयश्री आहेच; व जेथें विजयश्री तेथे निश्चयाने यश हे, ठेवलेलेच आहे. 42
1643-18
तयाचिये देशींच्या झाडीं । कल्पतरूतें होडी । न जिणावें कां येवढीं । मायबापें असतां? ॥1643॥
ज्याला ( अर्जुनाला ) लक्ष्मीनारायणासारखे समर्थ मायबाप आहेत त्याच्या गांवचीं सामान्य झाडेही कल्पतरूला पैजणें कां जिकणार नाहीत? 43
1644-18
ते पाषाणही आघवें । चिंतारत्‌नें कां नोहावे? । तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व? ॥1644॥
तेथील सर्व पाषाणही चिंतामणि कां न होतील? ती सर्व भूमि सुवर्णमय कां होणार नाहीं?44
1645-18
तयाचिया गांवींचिया । नदी अमृतें वाहाविया । नवल कायि राया । विचारीं पां ॥1645॥
राजा, थोंडा विचार कर; अरे, त्याच्या गांवच्या सर्व नद्याही अमृतवाहिन्या झाल्या, तर त्यांत नवल तें काय? 45

1646-18
तयाचे बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद । सदेह सच्चिदानंद । कां न व्हावे ते? ॥1646॥
तो भक्त जें कांहीं बोलेल, ते शब्द वेदतुल्य खुशाल समजावे व तो देहधारी आहे तेथवर सच्चिदानंदाची साकार मूर्ती म्हणून कां न म्हणावा? 46
1647-18
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही । इयें पदें जया अधीनीं । तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥1647॥
कारण, स्वर्ग व मुक्ति ही ज्याच्या हातांत आहेत तो श्रीकृष्ण भगवान ज्याचा पिता व देवी लक्ष्मी ही ज्याची जननी आहे. 47
1648-18
म्हणौनि जिया बाहीं उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा । तेथें सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणें ॥1648॥
म्हणून ज्या पक्षाच्या बाजूने तो लक्ष्मीवल्लभ उभा आहे तेथे सर्व सहजच सिद्धि आहेत इतकें मला समजते. दुसरें तिसरें मी कांहीही ओळखत नाही. 48
1649-18
आणि समुद्राचा मेघु । उपयोगें तयाहूनि चांगु । तैसा पार्थीं आजि लागु । आहे तये ॥1649॥
आणि समुद्रापासून जन्म पावणारा मेघ हा समुद्रापेक्षाही अधिक उपयोगी पडतो, त्याप्रमाणे आज त्या अर्जुनाचाच महिमा अधिक वाटतो. 49
1650-18
कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू । परी जगा पोसिता व्यवहारु । तेंचि जाणें ॥1650॥
लोहाला सुर्वणत्व देण्याचे सामर्थं परिसाचेच ह्यांत वाद नाही; पण जगाच्या व्यवहाराचे पोषण, परिसने नव्हे, तर सुवर्णानेच होत असतें 1650

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *