सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

476-18
तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी । होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय ॥476॥
ज्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो त्या विषयालाच ज्ञेय असणे असे म्हणतात. 476
477-18
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ॥477॥
याप्रमाणे धनंजया, ज्ञाता; ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी तीन प्रकारच्या सर्व कर्मांचा कारणीभूत आहे. 477
478-18
जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय । तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें ॥478॥
कारण शब्दादि पाच विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यापैकी कोणतीतरी एक असते. 478
479-18
ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया । तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥479॥
हे धनंजया, ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेय पदार्थ किंचित दाखवित आहे, तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो, 479
480-18
परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु । कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥480॥
परंतु, माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास लावतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहताच क्षणी तो घेण्यात दरिद्री धावतो, किंवा स्त्री पाहताच जसा कामिक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो; 480

481-18
जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणीं । नाना सुटला सांजवणीं । वत्सुचि पां ॥481॥
जसे पाणी उतरत्या जमिनीकडे राहते, भ्रमर पुष्पाचा वास घेण्यास जातो अथवा धार काढण्याचे वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते; 481
482-18
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेंवी माणुसीं । वराता लावीजती आकाशीं । यागांचिया ॥482॥
अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशांत यज्ञरुपी शिड्या लावतात; 482
483-18
पैं पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटीं । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें ॥483॥
अथवा अर्जुना, पारवा आकाशांत फिरत असता पारवीस पाहतांच एकदम सगळे अंग टाकून तीज जवळ येतो; 483
484-18
हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे ॥484॥
इतकेच नव्हे, तर मेघांची गर्जना होताक्षणीच मोर जसा आपल्यास आकाशावरून ओवाळून टाकतो, तसा ज्ञाता हा ज्ञेयास (विषयास) पाहून उडी घालतो. 484
485-18
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ॥485॥
म्हणून हे पंडुसुता, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूत होते; 485

486-18
परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥486॥
आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडता असला, तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही. 486
487-18
नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥487॥
अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला, तर त्याचा त्याग करण्याविषयी एकेक क्षण त्याला युगांप्रमाणे भासतो, 487
488-18
व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥488॥
सर्प असून नीलमण्यांचा हार आहे, या भावनेने हर्ष होतो व त्यास हात लावताक्षणीच सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते, 488
489-18
तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारीं वाहे । व्यापारातें ॥489॥
त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय हे पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते; आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते. 489
490-18
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥490॥
जो कुस्तीचा षोकी आहे, त्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर, तो जरी सर्वसैन्याचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचारी होतो. 490

491-18
तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे । जेवितें बैसलें जैसें । रंधन करूं ॥491॥
तसा ज्ञाता म्हणून असतो, तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्या कर्ता असे म्हणवितो. ते त्याचे कर्तेपणास येणे, ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणार्‍या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे; 491
492-18
कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा- । चिया कामा ॥492॥
किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग् लावण्याची खटपट करावी अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू हावे, देवांनी देवळात स्वस्थ बसणे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे 492
493-18
तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥493॥
तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवतो, तेथे अर्जुना, त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते. 493
494-18
आणि आपण हौनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथें ज्ञेयचि स्वभावतां । कार्य होय ॥494॥
आणि आपण जो ज्ञाता, तो कर्ता होऊन ज्ञानाला कारण(साधन) करतो, मग येथे ज्ञेय हे सहज कार्य होते. 494
495-18
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी ॥495॥
हे सुमते, ज्ञानाच्या स्वरूपगतीस अशा रीतीने पालट पडतो जसे नेत्राचे तेज रात्री उपयोगी पडत नाही; 495

496-18
कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठीं शीतांशु । पालटे जैसा ॥496॥
किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंताचे विलास बदलतात; अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एकेक कलेने कमी होत जातो- 496
497-18
तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें । तेथींचीं तियें लक्षणें । ऐक आतां ॥497॥
त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवीत असता ज्ञाता हा कर्तेपणाचा अभिमानात गुंततो नातं, त्यावेळची त्याची लक्षणे आता तुला सांगतो, ती ऐक. 497
498-18
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें ॥498॥
तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे या अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे;(अंत:करणाच्या ह्या चार आवृत्ती आहेत;) 498
499-18
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हें पंचविध जाण । इंद्रियें गा ॥499॥
आणि त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक अशी पाच प्रकारची इंद्रिय आहेत. 499
500-18
तेथ आंतुले तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें । मग तैं जरी जाणें । सुखा येतें ॥500॥
त्याठिकाणी अंतकरणाच्या वृत्तीच्या योगे जिवाच कर्म करण्यास विषयी स्फुरण येते; मग या कर्मापासून सुख प्राप्ती होईल असे वाटू लागले. 500

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *