आयुर्वेदाच्या दृष्टीने दही वाईट असतं का?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आयुर्वेदसमजगैरसमज*

प्रश्न:
आयुर्वेदाच्या दृष्टीने दही हे वाईट असतं का?

उत्तर:
दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विराजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते असे आयुर्वेद सांगतो.

तरीही दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही हा झाला दही खाण्यासाठीचा मूलभूत नियम. अदमुरे दही कित्येकजण आवडीने खातात. ते गोड असल्याने चांगलं असा त्यांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात जी गोष्ट धड दूधही नाही आणि दहीदेखील नाही अशी त्रिशंकू गोष्ट आरोग्याला चांगली कशी असेल बरं? पिढ्यान् पिढ्या गैरसमजातून उत्तम समजलं जात असलं तरी अदमुरं दही खाऊ नका. ते शरीरातले तिन्ही दोष वाढवतं.

दही घेताना छान फेटून घ्या. याला दह्याचं Structure demolition असं म्हटलं जातं. तसं केल्याने ते पचायला सोपं जातं. त्यात साखर, मीठ, मिरपूड किंवा आवळा पूड घालून घेतलं तर हे दही बाधत नाही. दही गरम गोष्टींत मिसळायचं मात्र नाही. दुधासारखंच तेदेखील फाटतं. फाटलं नाही तरी काही हानिकारक घटक उत्पन्न करतं. त्यामुळे ‘दही + गरम’ हे समीकरण नकोच. कढी चालेल का? हा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न असला तरी पुन्हा उत्तर देतो. हो; चालेल! कारण त्यात आपण दही वापरत नसून फेटलेलं दही म्हणजेच आयुर्वेदानुसार ‘मथित’ वापरत आहात + त्यात घातलेल्या बेसनानेही अधिक रुक्षता येऊन गुणधर्म बदलत असतात.

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे; पचायला जड असलेलं दही हे थंड नसून उष्ण आहे! मग ते सर्दीसारखे त्रास कसं करतं बरं? सोपं आहे. सहसा दही आंबट असेल किंवा आपली प्रकृती कफाची असेल किंवा लहान मुलं असतील तरच कफाचे त्रास घडवून आणते; अन्यथा नाही. लस्सीदेखील दह्यापासूनच बनत असल्याने उष्णच. मग सर्दीचे त्रास गोड असलेल्या या लस्सीनेदेखील कसे होतात? कारण मुळात लस्सी हा पदार्थ गोड होतो तो साखरेमुळे; ती लस्सीची अंगभूत चव नव्हे. त्यातच पाणी मिसळले गेल्याने पुन्हा त्यातला जलांश वाढल्याने या पदार्थाने सर्दी होऊ शकते. असे असले तरी लस्सीसुद्धा उष्णच बरं का. मिरची फ्रीजमध्ये ठेवली म्हणून ‘थंड’ असं म्हणतो का आपण? अगदी तसंच इथेही आहे.

दही हा कॅल्शियमपासून ते शरीराला उपयुक्त बॅक्टेरियापर्यंत विविध गोष्टींचा उत्तम स्रोत आहे असे कोणी कितीही ओरडून सांगितले तरी त्याचे ‘नियमित’ म्हणजे रोज न चुकता सेवन टाळाच. विशेषतः डायबेटीस, सूज, पीसीओडी, स्थौल्य, त्वचा विकार, भरून न येणाऱ्या जखमा यांपैकी कोणती समस्या असल्यास दही कमीत कमी खाणे वा टाळणे योग्य. बाकी वरील नाममात्र काळजी घेऊन दही खुशाल खा. त्याने शरीरावर सुपरिणाम दिसून येतील. आणि कोणतेही दुष्परिणाम मात्र होणे टळेल.

– वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

आरोग्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *