सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६५१ ते १६७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1651-18
येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला ॥1651॥
ह्या दृष्टांतांनी गुरूकडे कमी-पणा येतो असें प्रथमतः कोणाला वाटेल; पण तसें नाहीं; कारण, अग्नि हाच दीपद्वारा मोठा प्रकाश देतो; ( तेव्हां लोक त्याला दीपप्रकाश म्हणाले तर अग्नीला कमीपणा कसा?) 51
1652-18
तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती । परी माने इये स्तुती । गौरव असे ॥1652॥
(दीपमहिमा हा अग्नि-प्रसाद होय ) त्याप्रमाणे, देवांच्या शक्तीच्या प्रसादानेच पार्थं देवापेक्षां मोठा वाटतो; पण तशी भक्तस्तुति करणे हाही वस्तुतः देवांचाच गौरव होय. 52
1653-18
आणि पुत्रें मी सर्व गुणीं । जिणावा हे बापा शिराणी । तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥1653॥
आणि पुत्राने सर्व, गुणांत आपल्यावर ताण करावी अशी पित्याची इच्छा असते, तीच शिष्याच्या उत्कर्षाने सद्गुरू भगवान श्रीकृष्णांना पहाण्याचे भाग्य लाभले. 53
1654-18
किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा । तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥1654॥
राजा, फार काय सांगावें? अशाप्रकारची कृष्ण कृपा ज्यावर झाली आहे तो पार्थ, ज्या पक्षाचा अभिमान धरून उभा आहे, 54
1655-18
तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो? । तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥1655॥
तेंच विजयस्थान होय; ह्यांत तुला संदेह कसला? अरे, तेथे नसणारा विजय तो विजयच नव्हे असे जाण. 55

1656-18
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु । तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥1656॥
म्हणून. जेथे श्री तेथे श्रीमंत श्रीपति, जेथे तो पंडुपुत्र तेथे सर्व जय आणि उत्कर्षही तेथेच.56
1657-18
जरी व्यासाचेनि साचें । धिरे मन तुमचें । तरी या बोलाचें । ध्रुवचि माना ॥1657॥
श्रीव्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मी सांगितलें हे, निश्चित होय. असे समजा 57
1658-18
जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु । तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥1658॥
जेथे तो श्रीवल्लभ, जेथे तो भक्तश्रेष्ठ अर्जुन, तेथे सर्व मंगल, सुख आणि लाभ असणारच 58
1659-18
या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे । ऐसें गाजोनि बाहें । उभिली तेणें ॥1659॥
हे माझे बोल जर अन्यथा होतील तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे अशी बाहु उभारून संजयानें गर्जना केली. 59
1660-18
एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका । संजयें कुरुनायका । दिधला हातीं ॥1660॥
ह्याप्रमाणे सर्व भारताचे सार एका श्लोकांत संजयानें, कौरवपति धृतराष्ट्र ह्याला ऐकविलें. 1660

1661-18
जैसा नेणों केवढा वन्ही । परी गुणाग्रीं ठेऊनी । आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥1661॥
अग्निस्वरूप केवढे आहे हे सांगतां न आलें (न कळलें) तरी तो वातीच्या अग्रभागीं स्थापित केला म्हणजे सूर्यास्तानें होणारी अडचण दूर करितो. 61
1662-18
तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत । भारताचें शतें सात । सर्वस्व गीता ॥1662॥
शब्दब्रह्म जे वेद ते अनंत आहेत; त्याचे सार सवालक्ष (श्लोक) भारतांत आणिलें; आणि त्याचेही सर्व सार म्हणजे गीतेचे सातशे श्लोक हे होय. 62
1663-18
तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा । व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥1663॥
त्या सातशे श्लोकांचाही व्यासशिष्य संजय ह्याचा निश्चयाचा उद्गाररूप असणारा जो हा अखेरचा श्लोक तो सारभूत होय. 63
1664-18
येणें येकेंचि श्लोकें । राहे तेणें असकें । अविद्याजाताचें निकें । जिंतलें होय ॥1664॥
ह्या एकच श्लोकाला चिकटून त्याचे मनन जो करील त्याने सर्व अविद्याजात जिकल्या सारखेच होईल. 64
1665-18
ऐसें श्लोक शतें सात । गीतेचीं पदें आंगें वाहत । पदें म्हणों कीं परमामृत । गीताकाशींचें ॥1665॥
याप्रमाणे, सातशे श्लोक हे गीतेतील पदांनी (शब्दांनीं) धारण केले आहेत (वाहिले आहेत) ह्या पदांना पदे’ म्हणावें कीं गीतारूप आकाशांतील अमृतवृष्टि म्हणावें हेंच कळत नाही. 65

1666-18
कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे । मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥1666॥
किंवा, आत्मराजाच्या गीतारूपी सभामंडपाचे हे सातशे श्लोक म्हणजे जणू तेवढे खांबच होत असे वाटतें. 66
1667-18
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥1667॥
किंवा श्लोकरूपी सातशे मंत्रांनीं जिचे प्रतिपादन केले आहे,अशी गीता ही देवी भगवतीच होय; व मोहमहिषासुर-वधानें ती आनंदित आहे. 67
1668-18
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥1668॥
म्हणून काया, वाचा, मनें करून जो तिचा सेवक होईल त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती करील. 68
1669-18
कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें । ऐसे प्रकाशिले गीतामिषें । रायें श्रीकृष्णें ॥1669॥
किंवा अविद्यारूपी अंधकाराचा नाश करून गीतेचा एकेक श्लोकही सूर्याला पैजेने जिंकील, असे सातशे श्लोक देवांनी गीतेच्या मिषाने प्रकाशित केले.69
1670-18
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता । संसारपथश्रांता । विसंवावया ॥1670॥
किंवा संसारपथ. आक्रमण करीत असतां दमल्या भागल्या जीवांना विसांवा घेण्यासाठी, श्लोकाक्षररूपी द्राक्षवल्लींनी युक्त असा मांडवच गीता स्वत:झाली आहे. 1670

1671-18
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं । केले ते श्लोककल्हारीं । कृष्णाख्यसरोवरीं । सासिन्नली हे ॥1671॥

किंवा भ्रमरप्रमाणे ज्या भाग्यवान साधुसंतांनी ह्या गीतेच्या श्लोकरूपी कमलांचा आस्वाद (मकरंद) लुटला आहे अशा श्रीकृष्णनामक सरोवरांतील भरास आलेल्या ह्या कमलिनीच होत. 71
1672-18
कीं श्लोक नव्हती आन । गमे गीतेचें महिमान । वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥1672॥
किंवा मला वाटते हे श्लोक नसून गीतेचे अखंड महिमान वर्णन करणारे हे भाटच (स्तुति पाठक) होत. 72
1673-18
कीं श्लोकांचिया आवारा । सात शतें करूनि सुंदरा । सर्वागम गीतापुरा । वसों आले ॥1673॥
किंवा सातशे श्लोकांचा जणू रक्षणार्थं सुंदर कोट बांधून सर्व वेदशास्त्रे ह्या गीतानगरीत वास करण्यास आले आहेत. 73
1674-18
कीं निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया । श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥1674॥
किंवा आपला कांत जो आत्मा त्याला आवडीने आलिंगन देण्यासाठी त्याची कांतारूप असलेली गीता ही सातशे श्लोकरूपी बाह्या पसरूनच जणू आली आहे ! 74
1675-18
कीं गीताकमळींचे भृंग । कीं हे गीतासागरतरंग । कीं हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥1675॥
किंवा हे श्लोक म्हणजे गीताकमळावरील भृंगच होत; अथवा गीतासागरावरील हे तरंग म्हणा किंवा अशीही कल्पना करावी किं श्रीहरीच्या गीतारथाचे हे श्लोक हे अश्वच होत. 75

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *