सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८०१ ते ८२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

801-18
ऐसें आपत्ती जें सुख । ऐहिकीं परिणमे देख । परत्रीं कीर विख । होऊनि परते ॥801॥
इहलोकी प्राप्त झालेले जे सुख, त्याचा हा अशा प्रकारचा परिणाम होतो; आणि ते परलोकही खरोखर विषरूपानेच फलप्रद होते. 801
802-18
जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥802॥
जे इंद्रियांचे लाड पुरविण्याकरिता धर्मरूपी मळा त्याचे स्वाधीन करतात, ते धर्म जाळून इंद्रियाकडून विषयाचा सोहळा भोगवितात. 802
803-18
तेथ पातकें बांधिती थावो । तियें नरकीं देती ठावो । जेणें सुखें हा अपावो । परत्रीं ऐसा ॥803॥
मग पातकांस थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या लोकांच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो; 803
804-18
पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें । तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ॥804॥
हे पहा, जसे विष हे शब्दाने मात्र मधुर परंतु परिणामी प्राणनाशक करणारे आहे, तसे इहालोकिंचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे. 804
805-18
पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें । म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं ॥805॥
पार्था, हे सुख केवळ रजोगुणांचेच बनलेले (राजस) आहे; म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको. 805
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥18.39॥


806-18
आणि अपेयाचेनि पानें । अखाद्याचेनि भोजनें । स्वैरस्त्रीसंनिधानें । होय जें सुख ॥806॥
आणि अपेय पानाने, अभक्ष्य भक्षणने, व स्वैरिणीस्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे सुख 806
807-18
का पुढिलांचेनि मारें । नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे । भाटाच्या बोलीं ॥807॥
किंवा दुसऱ्याचा आघात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतिपाठाने जे सुख होते; 807
808-18
जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे । जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट ॥808॥
जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाचे शुद्धी नसते. 808
809-18
तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे ॥809॥
जे सुख अर्जुना, तामस असे जाण. ही कथा मी विस्ताराने सांगत बसत नाही कारण, ती असंभाव्य आहे. 809
810-18
ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज ॥810॥
अशाप्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फळरुप सुख हे तीन प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र सांगितले. 810

811-18
ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वांचूनि कांहींचि नसे स्थूल । सूक्ष्मीं इये ॥811॥
सर्व जगतांत लहान व मोठ्या वस्तू ज्या आहेत, त्यांत एकही वस्तू कर्ता कर्म व फळ या त्रिपुटीशिवाय सापडणार नाही. 811
812-18
आणि हे तंव त्रिपुटी । तिहीं गुणीं इहीं किरीटी । गुंफिली असे पटीं । तांतुवीं जैसी ॥812॥
आणि अर्जुना, पट जसा तंतूंनी तयार केला आहे, तशी ही त्रिपुटी पाहू गेले असता तीन गुणांनी भरलेली आहे. 812
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥18.40॥

813-18
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं । न बंधिजे इहीं सत्वादिकीं । तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु ॥813॥
म्हणून तू हे लक्षात ठेव की, प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेली अशी कोणतीही वस्तू या यालोकी अथवा स्वर्गलोकी नाही. 813
814-18
कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेंवीण कल्लोळा । होणें आहे? ॥814॥
लोकरी वाचून कांबळा व माती वाचून गोळा कसा होणार? अथवा पाण्यावाचून लाटा कशा होतील? 814
815-18
तैसें न होनि गुणाचें । सृष्टीची रचना रचे । ऐसें नाहींचि गा साचें । प्राणिजात ॥815॥
त्याप्रमाणे जीवमात्र, गुणाच्या रचनेवाचून या सृष्टीत मोकळे नाहीत, 815


816-18
यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ । घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ॥816॥
यास्तव, हे सर्व जगांतील पदार्थ तीन गुणांनी केवळ रचलेले आहेत, असे समज. 816
817-18
गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें ॥817॥
या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की, त्यांनी एका देवाचे तीन देव गेले आणि लोकांचे 3 लोक (स्वर्ग, मृत्यू व पाताळ) गुणांनीच केले आहेत आणि चार वर्ण व त्यांची कर्मे आहेत. 817
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥18.41॥

818-18
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ॥818॥
हे चार वर्ण कोणते, असे पुसशील, तर त्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत. 818
819-18
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ॥819॥
दुसरे क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ते ब्राह्मणांचाच बरोबरीचे मानावे. 19
820-18
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तऱ्हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥820॥
हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण, त्याला वेदाचा अधिकार नाही, तर त्याची सेवावृत्ती तीन वर्णांच्या आधीन आहे. 820

821-18
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा । चौथा जाला ॥821॥
त्या ब्राह्मणादि तीन वर्णांच्या सेवा वृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही चौथ्या वर्णात गणले. 821
822-18
जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें । तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ॥822॥
जसा फुलांच्या संगतीने असलेल्या दोऱ्याला ही श्रीमंत धारण करतात तशी श्रुती द्विजांच्या संगतीने शूद्रांचा त्यांचा स्वीकार करते. 822
823-18
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ॥823॥
पार्था, आता अशा चार प्रकारांनी या चार वर्णांची व्यवस्था झालेली आहे. तर त्या त्या वर्णांची कर्मे कोणती हे भेद तुला सांगतो. 823
824-18
जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ॥824॥
ज्या गुणांनी ते चारी वर्ण जन्ममृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात; 824
825-18
जिये आत्मप्रकृतीचे इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं । कर्में चौघां चहूं ठाईं । वांटिलीं वर्णा ॥825॥
आत्म्याची जी प्रकृती, तिच्या सत्वादी गुणांनी चार वर्णाला चार ठिकाणी कर्मे वाटून दिली आहेत; 825

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *