सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी १२६ ते १५०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , ,

126-1
तो गाजत असे अद्‍भुतु । दोन्ही सैन्याआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥1-126॥
तो प्रचंड नाद दोन्ही सैन्यात दुमदुमून गेला. त्या नादाचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना; आणि आकाशातून पुनः पुन्हा नवीन नाद निर्माण होऊ लागले. ॥126॥
127-1
तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥1-127॥
भीष्माचार्यानी आपल्या वीर वृत्तीप्रमाणे त्या पहिल्या नादाबरोबर आपला दिव्य शंख वाजविला. ॥127॥
128-1
ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥1-128॥
ते दोन्ही महानाद एकत्र झाले, त्या वेळी त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्या वेळी आता जणू काय आकाश तुटून पडते की काय, असे वाटू लागले. ॥128॥
129-1
घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ॥1-129॥
त्या प्रचंड नादामुळे आकाश भीतीने थडथडू लागले, समुद्रातील लाटा उसळल्या; आणि सर्व चराचर भीतीने कापू लागले. ॥129॥
130-1
तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥1-130॥
त्या प्रचंड नादाने डोंगर-दऱ्यातून प्रतिध्वनी निर्माण होऊ लागले. त्याच वेळी सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. ॥130॥

131-1
ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥1.13॥

भावार्थ:- त्यानंतर इतर शूरवीरांनी शंख, नगारे, ढोल, मृदूंग,गोमुख ही रणवाद्ये एकदम वाजवली. त्यांचा अतिशय भयानक असा नाद उत्पन्न झाला. ॥13॥
उदंड सैंघ वाजतें । भयानखें खाखातें । महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥1-131॥
जिकडे तिकडे रणवाद्ये कर्कश व भयानक स्वरूपात वाजू लागली. बलशाही लोकांना देखील तो महाप्रलय वाटला. ॥131॥
132-1
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥1-132॥
नौबती, डंके, ढोल, शंख, मोठं-मोठया झान्जा, कर्णे इत्यादी रणवाद्यांचा गजर सुरु झाला; आणि त्यात वीरांच्या भयानक रनगर्जना मिसळून गेल्या. ॥132॥
133-1
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥1-133॥
कोणी युद्धातील विरश्रीच्या आवेशाने दंड ठोकू लागले आणि अतिशय त्वेषाने युद्धासाठी एकमेकांना हाका मारू लागले. त्यामुळे हत्तीदेखील बेफाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले. ॥133॥
134-1
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥1-134॥
तेथील भित्रा माणसाचे तर काय सांगावे? ते कस्पटासारखे दूर गेले. यमालादेखील दहशत बसली आणि तो इकडे पाहण्यास तयार होईना. ॥134॥
135-1
एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥1-135॥
कित्येकांचे तिथेच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दातखिळी बसली. जे नामवंत वीर होते, ते थरथर कापू लागले. ॥135॥

136-1
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥1-136॥
अशा प्रकारचा महाभयंकर वाद्यनाद ऐकून ब्राम्हदेवदेखील व्याकुळ झाले. आपला प्रलयकाळ जवळ आला आहे, असे देव म्हणू लागले. ॥136॥
137-1
ततः श्वेतैहयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः॥1.14॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः॥1.15॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ॥1.16॥

भावार्थ:- त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम मोठ्या रथात बसलेले ” भगवान श्रीकृष्ण” आणि “अर्जुन” यांनी दिव्य शंख वाजविले. ॥14॥
ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु । तव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥1-137॥
तो आकांत पाहून स्वर्गलोकामध्ये प्रलयकालाची साशंकता निर्माण झाली. त्या वेळी इकडे पांडवसैन्यामध्ये काय घडले, ते श्रवण करा. ॥137॥

138-1
हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥1-138॥
जे का विजयाचे केवळ सार, महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील, असे चार घोडे जुंपले असून, ॥138॥
139-1
कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥1-139॥
पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा, त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत, असा तो अतिवेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता. ॥139॥
140-1
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥1-140॥
अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा (अधिपती) भगवान श्रीकृष्ण घोडे हाकीत होता, त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत?? ॥140॥

141-1
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु । सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसीं ॥1-141॥
त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्येक्ष शंकराचा अवतार मारुती होता. अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. ॥141॥
142-1
देखा नवल तया प्रभूचें । अद्‍भुत प्रेम भक्ताचें । जें सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥1-142॥
त्या विश्वचालक प्रभूंचे नवल पाहा. प्रभूच्या मनात भक्तांविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे; म्हणून तो विश्वनियंता असूनदेखील अर्जुनाचे सारथ्य करत होता. ॥142॥
143-1
पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला । तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥1-143॥
त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला. ॥143॥
144-1
परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु । जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥1-144॥
ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला की नक्षत्रे लोप पावतात, त्याप्रमाणे शंखांचा ध्वनी सर्वत्र घुमत राहिला. ॥144॥
145-1
तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥1-145॥
त्यामुळे कौरवांचा सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते, ते कोठे नाहीसे झाले, ते कळाले नाही. ॥145॥

146-1
तैसाचि देखे येरे । निनादें अति गहिरे । देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥1-146॥
त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला. ॥146॥
147-1
ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥1-147॥
ह्या दोन शंखांचा अद्भुत नाद जेंव्हा एकत्र झाला, त्या वेळी ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होतात की काय, असे सर्वांना वाटू लागले. ॥147॥
148-1
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥1-148॥
त्यावेळी भीमाला आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला. त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. ॥148॥
149-1
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥1-149॥
त्या शंखांचा ध्वनी प्रलयकालचा मेघ गर्जावा, त्याप्रमाणे अतिगंभीर पणाने सर्वत्र पसरला. इतक्यात धर्मराजने ‘अनंतविजय’ नावाचा शंख वाजविला. ॥149॥
150-1
नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥1-150॥
नकुलाने ‘सुघोष’ आणि सहदेवाने ‘मणीपुष्पक’ शंख वाजविला. त्या महाभयंकर नादाने यमदेखील गोंधळून आश्चर्यचकित झाला. ॥150॥

, , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *