1226-18
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥1226॥
एक गुरु, एक शिष्य, असा जो संप्रदाय लोकांत रूढ आहे, तो मत्प्राप्तीचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून होय 26
1227-18
अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी । वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध ॥1227॥
अरे, पूर्वीच्या पोटांत अनंत ठेवे, काष्ठांत अग्नि व कांसेंत दुध, नित्य सिद्ध आहेतच. 27
1228-18
परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें । येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी ॥1228॥
परंतु, ते सिद्ध असलेले पदार्थच प्राप्त करून घेण्यास कांहीं उपाय करावे लागतात; त्याप्रमाणे नित्यसिद्ध असलेल्या माझ्या प्राप्तीचेही उपाय करावे लागतात. 28
1229-18
हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो । हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा ॥1229॥
स्वतःच्या प्राप्तीचे उपाय मागें सांगितले असतां, पुन्हा त्याच विषयाची देव प्रस्तावना का करीत आहेत असे कोणास वाटल्यास येथे देवांच्या मनांतील अभिप्राय असा आहे,29
1230-18
जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें । आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध ॥1230॥
कीं, सर्व गीताशास्त्र, हे स्वतःप्रमाण वेदांचे सार असून मोक्षोपायदर्शक आहे; अन्यशास्त्रोपाय असले तरी, ते प्रमाण सिद्ध असतीलच असे सांगतां येत नाही. 1230
1231-18
वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी । कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥1231॥
माझी प्राप्ति म्हणजे असा प्रकार असतो. वारा फक्त सूर्याच्या आड असलेले ढग दूर लोटतो, सूर्य कांहीं नवा आणीत नाही; किंवा हाताने पाण्यावरील फक्त गोंडाळ दूर केली जाते; पाणी पहिलेच असतें. 31
1232-18
तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु । तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें ॥1232॥
त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा पडदा मध्ये असतो, तेवढाच शास्त्र दूर करितें; त्याचे आंत मी असंग, स्वप्रकाश, नित्य आहेच. त्याचे दर्शन सहज होतें; 32
1233-18
म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें । वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं ॥1233॥
म्हणून, सर्व शास्त्रांची मर्यादा अगर कामगिरी अविद्येचा नाश करणे येथ वरच आहे; त्यांच्यात स्वतःसिद्ध आत्मबोध (साक्षात्) करून देण्याचे सामर्थ्य नाही. 33
1234-18
तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी । तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥1234॥
अध्यात्मविषयावरील जी इतर शास्त्रे त्यांस, त्यांच्या विधानाच्या सत्यत्वाला प्रमाण काय असें विचारले तर, ती प्रमाण म्हणून ज्याच्याकडे बोट करितात तें हे गीताशास्त्र होय. (येवढी ह्याची थोरवी आहे.) 34
1235-18
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया । तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें ॥1235॥
सूर्य उदयाने. पूर्वदिशा अलंकृत करितो खरी, पण, लगेच इतर सर्व दिशा सतेज होतात, तसें सर्व अध्यात्मशास्त्रांचा राजा अशी ही गीता तिच्यावर शास्त्राचे सर्व सनाथत्व अगर सौभाग्य अवलंबून आहे.35
1236-18
हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें । सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा ॥1236॥
हें असो; ह्या गीताशास्त्रेश्वरानें मागे पुष्कळ विस्तारपूर्वक आत्म-प्राप्तीचा उपाय सांगितला आहे की ज्यायोगे तळहातावरील वस्तूप्रमाणे आत्मदर्शन व्हावें. 36
1237-18
परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे । हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥1237॥
पण प्रथम श्रवणा- बरोबर अर्जुनाच्या चित्तांत तें आरूढ होईल न होईल अशी देवांनी कळकळ बाळगून 37
1238-18
तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ । सांगतसे मुकुल । मुद्रा आतां ॥1238॥
तोच अर्थ अगर तेच प्रमेय शिष्याच्या चित्तांत ठसावें म्हणून पुन्हा स्पष्ट करून कथन केले. 38
1239-18
आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता । म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥1239॥
आणि गीताग्रंथाच्या समाप्तीचाही प्रसंग असल्यामुळे गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय एकच आहे हें तिच्या उपक्रमाच्या व उपसंहाराच्या एकार्थत्वाने दाखवितात. 39
1240-18
जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं । निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें ॥1240॥
ग्रंथाच्या मधील अध्यायांत अधिकार भेदानें भिन्न भिन्न सिद्धान्त सांगितले आहेत. 1240
1241-18
तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत । हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी ॥1241॥
त्यामुळे ह्या गीताशास्त्रांत अनेक सिद्धान्त सांगितले आहेत असें पूर्वापर संबंध न जर जाणणाराला वाटेल तर- 41
1242-18
तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका । भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥1242॥
मुख्य सिद्धान्ताच्या पोटांत अनेक उपसिद्धान्त त्याची कक्षा म्हणून सांगावे लागतात, हे या उपसिद्धांताची मुख्य सिद्धान्तापाशीं जुळणी करून दाखवून आरंभिलेली गीता, देव संपुर्ण करितात. 42
1243-18
एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ । या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥1243॥
अविद्येचा नाश करून त्यायोगे आत्मरूप मोक्षफल जीवांच्या पदरात पाडणे व ह्या दोन्ही गोष्टीचे साधन म्हणजे केवळ यथार्थ आत्मज्ञान हेंच होय, हे जीवांस पटविणे हाच गीतेचा महासिद्धान्त होय. 43
1244-18
हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं । तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें ॥1244॥
हें इतकेच सांगण्यासाठी, प्रसंगतः ग्रंथांत कर्म उपासनादि विस्तार करून सांगितले; पण त्या मुख्य सिद्धान्ताचा थोडक्यांत अनुवाद करावा ह्या हेतूनें 44
1245-18
म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती । देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें ॥1245॥
म्हणून उपेय म्हणजे ज्याच्यासाठी उपाय करावे तें फल प्राप्त झाले असतांही त्याचे उपाय सांगण्यांत देव पुन्हा प्रवृत्त झाले. 45
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः
। मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥18.56॥
1246-18
मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा । मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं ॥1246॥
देव म्हणतात, अर्जुना, असा तो क्रमयोगी निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपांत रहातो. 46
1247-18
स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं । तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें ॥1247॥
स्वकर्माचरणरूप पुष्पांनीं माझे पूजन करून त्यायोगे होणाऱ्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो 47
1248-18
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिया भजन समरसें । सुखिया होय ॥1248॥
ती ज्ञाननिष्ठा ज्यानें हस्तगत केली तेथे माझी भक्ति उत्कर्ष पावते व तिच्या भजनांत समरस होऊन तो सुखी होतो. 48
1249-18
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया । अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे ॥1249॥
आणि सर्व विश्वाला प्रकाशित करणारा असा जो मी, त्याचा आत्मा त्याला तो सर्वथैव अनुसरतो. 49
1250-18
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ । कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं ॥1250॥
आपलें काठिण्य सोडून मीठ जसा जलाचा आश्रय करितें किंवा सर्व दिशांत संचार करून वायु जसा आकाशाचे पोटांत शान्त होतो. 1250
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण