सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २०१ ते २२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , ,

201-1
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥201॥
भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येंच अडकून पडतो. ॥201॥
202-1
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें । तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥202॥
तो त्याठिकाणी प्राणास मूकेल; परंतु कमळाविषयीच्या स्नेहामूळे तो कमळ-कळी कोरून बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे आपल्या आप्त लोकांची मोह-ममता कोवळी असली, तरी त्यातून बाहेर पडणे महाकठीण आहे. ॥202॥
203-1
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया । म्हणौनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥203॥
संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा ! हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळली जात नाही; म्हणूनच या मायेने अर्जुनालाही मोहित केले आहे. ॥203॥
204-1
अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥
हे राजा ! मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असें पाहून, लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥04॥
205-1
कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता । मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥205॥
तेथें त्याच्या मनात कोठून दयाभाव उत्पन्न झाला कोण जाणे ! मग तो म्हणाला, हे कृष्णा, आपण येथें राहू नये, हे बरें. ॥05॥

206-1
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥206॥
ह्या सर्वांस मारावयाचे हें मनात येताच त्यानें माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळु लागते. ॥06॥
207-1
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे॥1.31॥

भावार्थ :- हे केशवा ! मला ही सर्व लक्षणे विपरीत दिसत आहेत; आणि युद्धामध्ये स्वजनांना मारिले असता कोणतेही श्रेय (प्राप्त होईल असें) मला दिसत नाही. ॥31॥
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे॥207॥
या कौरवाना मारणे जर योग्य असेल, तर धर्मराजादिकांचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण की हे सर्व आणि आम्ही एकमेकांचे नातलग आहोत. ॥07॥
208-1
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज । एणें काय काज । महापापें ॥208॥
याकरितां आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हांस काय गरज आहे? ॥08॥
209-1
देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥209॥
हे देवा ! अनेक दृष्टीनी विचार केला असता (असें वाटते की) या वेळी युद्ध केले, तर (त्याचा परिणाम) वाईट होईल; पण ते जर टाळले तर काहीं लाभ होईल. ॥09॥
210-1
न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा॥1.32॥
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च॥1.33॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा॥1.34॥

भावार्थ :- हे श्रीकृष्णा ! मला विजयाची आकांशा नाही किंवा राज्याची आणि सुखाची आत्ता इच्छा उरलेली नाही. हे गोविंदा ! राज्य, सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग? अथवा आंम्हाला जगुन तरी काय उपयोग? ॥32॥
जांच्याकरिता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे स्वजन संपत्ती आणि जीवाची पर्वा न करता युद्धासाठी उभे टाकले आहेत. ॥33॥
आचार्य, वडील, पुत्र, त्याप्रमाणे आजोबा, मामा, सासरे, नातू, मेव्हणे, आणि इतर नातलग येथे युद्धासाठी जमले आहेत. ॥34॥

तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हे पाहुनियां ॥210॥
अशा प्रकारे विजय प्राप्त करण्याची मला मुळीच इच्छा नाही. गोत्रजांना ठार मारून मिळविलेले राज्य तरी काय करायचे? ॥210॥


211-1
या सकळांतें वधावें । मग हे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥211॥
अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगावयाचे, त्या सगळ्यांना आग लागो ! ॥211॥
212-1
तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल । वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥212॥
त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखांच्या अभावी, जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असेल तरीहि सहन करता येईल. इतकेच काय? त्यांच्या करिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल; ॥212॥
213-1
परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥213॥
परंतु त्यांचे प्राण घ्यावे आणि आपण राज्यसुख भोगावे, ही गोष्ट स्वप्नातदेखील माझ्या मनात येणार नाही. ॥213॥
214-1
तरी आम्हीं कां जन्मावें । कवणलागीं जियावें । जरी वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥214॥
जर या वडील माणसांचे अहित मानानें चिंतवायचे, तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय व आम्ही जगावें तरी कोणासाठी? ॥214॥
215-1
पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥215॥
कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की, त्यानें आपल्या आप्तेष्ठांचा केवळ वधच करावा? ॥215॥

216-1
हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेया होईजे । वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥216॥
यांच्या वधाचा विचार आपण मनात तरी कसा आणावा? यांच्यासाठी वज्रासारखे कठोर तरी कसे व्हावे? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितचं करांवे. ॥216॥
217-1
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥217॥
आम्ही जे जे मिळवावे, ते ते या सर्वांनी (वास्तविक) भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणहि खर्च करावेत. ॥217॥
218-1
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥218॥
आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकावे आणि आपल्या कुळास संतुष्ट करावे. ॥218॥
219-1
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥219॥
परंतू कर्माची गती किती विपरीत आहे, ते पाहा. तेच आमचे सर्व गोत्रज आपसांत लढावयास तयार झाले आहेत ! ॥219॥
220-1
अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥220॥
बायका, मुले, आपली सर्व संपत्ती या सर्वाना सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन जे युद्धासाठी तयार झाले आहेत. ॥220॥

221-1
एसियांते कैसेनि मारूं? । कवणावरी शस्त्र धरूं? । निजहृदया करूं । घातु केवीं? ॥221॥
अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शास्त्रांचा प्रहार करू? (हे कौरव म्हणजे आम्हीच. आम्ही सारे एकाच कुळातील आहोत, त्यामुळे यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीनें अर्जुन म्हणतो) आपल्या काळजाचा घात कसे करू? ॥221॥
222-1
हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥222॥
हे श्रीकृष्णा ! युद्धासाठी आमच्यासमोर कोण उभे आहेत, तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर अनन्यसाधारण (असामान्य) उपकार आहेत, असे पितामह भीष्म व गुरू द्रोणचार्या, ते पलीकडे आहेत पाहा. ॥222॥
223-1
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥223॥
या ठिकाणी मेव्हणे, सासरे, मामा आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि आप्तही आहेत ॥223॥
224-1
अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥224॥
हे देवा ऐक, येथे आमचे अतिशय जवळचे असे हे आमचे सोयरे आहेत; आणि म्हणूनच यांचा वध करावा, असे वाणीने नुसते बोलणे, हे सुद्धा पाप होईल. ॥224॥
225-1
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥1.35॥
भावार्थ :- हे मधुसुदना ! हे स्वजन मला ठार मारण्यासाठी येथे आले आहेत. त्रैलोक्याचे राज्य मिळालं तरीही, मी यांना ठार मारण्याची इच्छा करीत नाही. मग पृथ्वीच्या राज्याची कथा काय? ॥35॥
हे वरी भलतें करितु । आतांचि येथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा॥225॥
उलटपक्षी हे वाटेल ते करोत अथवा आम्हास मारोत; परंतु यांचा घात करण्याचा विचारदेखील मनांतही आणणे बरे नाही. ॥225॥

, , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *