51-18
का गंगायमुना उदक । वोघबगें वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणें ॥51॥
प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले, तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. ॥51॥
52-18
न मोडितां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर । हें अर्धनारी नटेश्वर- । रूपीं दिसें ॥52॥
अर्धनारीनटेश्वराचे रूपात जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते ॥52॥
53-18
नाना वाढिली दिवसें । कळा बिंबीं पैसे । परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नाहीं ॥53॥
शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राचे दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे. त्याच्यावर निराळे थर नाहीत ॥53॥
54-18
तैसीं सिनानीं चारीं पदें । श्लोक तो श्लोकावच्छेदें । अध्यावो अध्यायभेदें । गमे कीर ॥54॥
तसेच श्लोक चार जणांनी वेगळे वेगळे दिसतात व अध्याय अध्याय यामुळे वेगळे भासतात खरे; ॥54॥
55-18
परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी ॥55॥
परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते ॥55॥
56-18
मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥56॥
पुष्कळ मोती मिळून एकावळीची माळ तयार होते, परंतु सर्वांशी कांती एकच असते ॥56॥
57-18
फुलांफुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे ॥57॥
माळेत फुले ओवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते; परंतु त्याचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरीता दुसरे बोट घालावे लागत नाही म्हणजे सारखाच सुगंध असतो त्याचप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे ॥57॥
58-18
सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं ॥58॥
गीतेचे श्लोक सातशे असून अध्याय अठरा आहेत, परंतु देवाने या सर्वांत एकाच तत्वाचे विवेचन केले आहे. दुसरे काही वर्णन केले नाही ॥58॥
59-18
आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे । प्रस्तुत तेणें निर्वाहे । निरूपण आइका ॥59॥
आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथांचे स्पष्टीकरण केले आहे, तूर्त या समजुतीने मी अठरावा अध्याय सांगतो तो ऐका. ॥59॥
60-18
तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो । जें संपतां श्लोकीं देवो । बोलिले ऐसें ॥60॥
तर सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ॥60॥
61-18
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं। बुद्धि सांडूनि आस्तिकीं । कर्मे कीजती तितुकीं । असंतें होतीं ॥61॥
अर्जुना ब्रम्हनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत ॥61॥
62-18
हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ॥62॥
असे देवाचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की, देवानी कर्मावर श्रद्धा ठेवणारास दोष ठेवला आहे. ॥62॥
63-18
तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा । तेथ नामचि एक पुढां । कां सुझे तया ॥63॥
तो बिचारा ज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरलेला आहे, हे त्यास समजले नाही; मग तो प्रत्यक्ष त्याच्यापुढे असूनही ब्रह्मनामश्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल? ॥63॥
64-18
आणि रजतमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी । ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये? ॥64॥
रज व तम दोन्ही गुणांच्या नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते, ती ब्रम्हाच्या ब्रम्हश्रद्धेच्यानावासकशी पात्र होईल? ॥64॥
65-18
मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धावणें । सांडी पडे खेळणें । नागिणीचें तें ॥65॥
मग, शस्त्राला आलिंगन देणे अथवा दोरीवर धावत सुटणे व नागिणीला हातात धरुण खेळणे. या गोष्टी जशा मरणास कारण होतात. ॥65॥
66-18
तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं ॥66॥
तशी कर्मे कठीण असून ती जन्ममरण देण्यास कारणीभूत होतात, असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत. ॥66॥
67-18
ना विपायें हें उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे । येऱ्हवीं येणेंचि जाये । निरयालया ॥67॥
कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्याना ज्ञानाची योग्यता येते व ते कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्ति कारण होते ॥67॥
68-18
कर्मीं हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी । आतां कर्मठां कैं वारी । मोक्षाची हे ॥68॥
आजवर कर्म करण्यामध्ये पुष्कळ काळ घालविला पण त्यापासून मोक्ष मिळाला नाही, आता यापुढे कर्मठांना मोक्षाची पाळी केव्हा येणार? ॥68॥
69-18
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥69॥
तर कर्माचे दैन्य फिटून व त्याचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्मसंन्यास त्याचा आदर करावा ॥69॥
70-18
कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोठी नाहीं । तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय ॥70॥
ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते ॥70॥
71-18
ज्ञानाचें आवाहनमंत्र । जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र । ज्ञान आकर्षितें सूत्र । तंतु जे का ॥71॥
व जो कर्मसंन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करण्याचे मंत्र, अथवा ज्ञान पिकवण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू होत, ॥71॥
72-18
ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग । तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों ॥72॥
ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त होवो, तर हेच आता उघड रीतीने सांगा असे देवास पुसावे ॥72॥
73-18
ऐसें म्हणौनि पार्थें । त्यागसंन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथें । प्रश्नु केला ॥73॥
असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला ॥73॥
74-18
तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥74॥
तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनास प्रत्युत्तर देण्यासाठी जे भाषण केले तोच हा अठरावा अध्याय व्यक्त झाला ॥74॥
75-18
एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे । आतां ऐका बरवें । पुसिलें जें ॥75॥
याप्रमाणे कार्यकारणभावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो, आता अर्जुनाने काय प्रश्न केला, तो ऐका ॥75॥
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण