संत चोखामेळा म. चरित्र १८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग -१८.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

आतां चोखोबांच्या प्रतिभेला, सृजनशीलतेला,शब्दवैभवाला फुलोरा येणार होता.संतरत्नांच्या हारामधे हे नवीन रत्न बुध्दीवैभवाने लखलखणार होते.आणि हा निर्णय घेण्याचे धाडस करण्यास विठ्ठल सखा नामदेव कारणीभूत होते आणि त्यामुळेच ही गोष्ट नामदेवाला कधी सांगतो असं विठ्ठलाला झाले होते.नामदेव तर तिर्थयात्रा करत फिरत होते.त्यांना नुसती बातमीच सांगायची नव्हती तर पंढरपूरला आल्या वर चोखोबाच्या राहण्याची व चरितार्था ची व्यवस्था करायची होती.त्यानंतरच चोखोबा निर्वेधपणे विठ्ठलभक्ती करुं शकणार होते.म्हणुनच नामदेवांच्या येण्याकडे विठ्ठलाचे लक्ष लागुन राहिले .

चोखोबांनी आपले कुटुंब व सामानासह पंढरपूरच्या वेशीबाहेर बसवुन,नामदेव यात्रेहुन आलेले नसल्या मुळे सरळ गोरोबाकाकाकडे गेले.त्यांनी दिलेल्या गाढ अलिंगनाने क्षणभर मंगळ वेढ्यात घडलेली घटना सांगायचा मोह झाला,पण प्रथम नामदेवांनी सांगावी असे ठरल्यामुळे त्यांना जुजबी उत्तरे देऊन,नामदेवांची चौकशी केल्यावर ते उद्या येणार असल्याचे कळल्यावर, गोरोबांच्या पायावर डोके ठेवुन निरोप घेतला व जिथे कुंटुंबमंडळी होती तिथे आले.तोवर सावित्री-सोयराने दगडाची चूल मांडुन बनवलेला झुणका भाताचे जेवण सगळ्यांनी केले. उद्या नामदेव येणार तोवर या झाडाखालीच रात्र काढण्याचे ठरल्यावर,सावित्री सोयराच्या मनांत आले,आपण घरदार सोडुन आलो ही चुक तर केली नाही ना?नामदेव उद्या आले नाही तर?आल्यावरही त्यांनी लक्ष दिले नाही तर?सगळे प्रश्नच प्रश्न!उबदार निवारा असलेलं घर सोडुन इथे उघड्या वर रात्र काढायची म्हणजे सोयरा,सुदामा सावित्री तिघेही मनांतुन अस्वस्थ होते. पण,चोखोबा मात्र निश्चिंत होते.त्यांना स्वतःच्या निर्णयावर!नशीबावर भरोसा होता.त्याहीपेक्षा पांडुरंग व नामदेवार कुठलीही चिंता,आशंका मनांत न बाळगता दृढ विश्वास होता.रात्र सरली.

दुसर्‍या दिवशी सावित्री सोयराने भाकरी कालवण बनवले.सर्वांनी दोन दोन घास खाण्याच्या उद्देशाने चोखोबा ला आवाज दिला पण ते आपल्याच तंद्रित,नामदेवांची आतुरतेने वाट बघत होते,त्यामुळे त्यांना हाका ऐकु आल्या नाहीत.मात्र गोरोबाच्या पहिल्याच हाकेने ते भानावर आले.समोर साक्षात नामदेव, गोरोबा,सावतामाळी,जनाबाई उभे दिसले.सार्‍या कुडीचे पंचप्राण नजरेत एकवटुन चोखोबा नामदेवांकडे बघतच राहिले.त्यांनी नामदेवांच्या पायावर लोळण घेतले.कितीतरी वेळ चोखोबा प्रेमालिंगात होते.मग सगळ्यांनीच उरी भेट घेतल्यानंतर,झाडाच्या गार सावलीत धुळीतच सार्‍यांनी बैठक मारली.विस्फर ल्या नेत्रांनी सुदामा,सावित्री,सोयरा हे दृष्य बघत होते.शिवाशिवी,अस्पृश्यतेचे कसलेच सावट त्या आपुलकीच्या संबंधात नव्हते.

चोखोबा! पांडुरंगाने तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे.चोखोबा! मंगळवेढ्यात जे घडलं ते अत्यंत निंदनिय वाईट होतं,पण ती समाजाची मानसिक ता होती.ती आपण एकदम बदलु शकत नाही. आपण वारकरी तत्वे पाळतो म्हणुन इतरांनीही ती पाळावी अशी जबरदस्ती कोणावरही करुं शकत नाही गावकीची परंपरा,भावकीचा रिती रिवाज,समाजाच्या चालीरीती पाळणे आपल्यावर बंधनकारक असल्यामुळे, गावाच्या दक्षिणेला अस्पृश्य लोकांची वस्ती आहे तिथे तुम्हाला खोपटं बांधण्या साठी मी जागा व उदनिर्वाहाची सोय उपलब्ध करुन देतो.तुम्ही आतां आमच्यात आलांत.कसलीही काळजी करुं नका,पण याबरोबरच अभंगरचना करायला विसरुं नका.

नामदेवांचा प्रत्येक शब्द चोखोबा कानांत प्राण आणुन ऐकत होते.त्यांच्या शब्दाशब्दातुन नवा साक्षात्कार,जीवना ची नवी दृष्टी मिळत होती.फक्त नामदेवच नाही तर,इतर संतांनीही त्यांच्याशी दाखवलेली जवळीक,प्रेम आणि अत्यंत मधुर व आपुलकीच्या शब्दात समाजाचे रीतीरिवाज पाळण्याबद्दल केलेले मार्ग दर्शन,नीट बस्तान बसवुन देण्याचे आश्वासन,संपूर्न कुटुंबाच्या उदरनिर्वाहा ची व कल्याणाची घेतलेली जबाबदारी हे बघुन सुदामा,सावित्री,सोयरा अचंभित होऊन,चोखाविषयीचा अभिमान मनांत मावत नव्हता.डोळ्यावाटे अश्रूरुपाने ओसंडुन वाहायला लागला.सगळ्यांच्या मदतीने सामान गोळा होऊ लागले. पंढरपूरांत कायमचे रहायला येण्याबद्दल सुदामा-सावित्रीच्या मनांत असलेले किल्मिष पार धुतल्या गेले.सर्वानीमिळुन चोखांचे सर्व सामान अस्पृश्य वस्तीत आणले.तिथे वयोवृध्द व पुढारी असलेल्या गणाला चोखोबाची सारी माहिती देऊन त्यांना लागेल ती मदत देण्यास सांगीतले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *