951-18
कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥951॥
अथवा समुद्रांत पडलेल्याने नाव सोडू नये? किंवा महारोग्यानें दिव्यौषधीचा त्याग करू नये, त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये. 51
952-18
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥952॥
मग हे कपिध्वजा; याच सत्कर्मरूप महापूजेनें संतुष्ट झालेला ईश्वर, तम व रज या गुणांचा नाश करून 12
953-18
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी ॥953॥
आपल्या उत्कंठेला शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला लावितो; आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषाप्रमाणे आहेत, असे वाटावयास लावतो. नंतर 53
954-18
जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें । किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें ॥954॥
पूर्वी वैराग्य या शब्दानें संसिद्धि या शब्दाचे जें वर्णन केले ते आपलें वैराग्यरूप स्थान तो मिळवितो. 54
955-18
मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । कां जालाही जें लाहे । तें आतां सांगों ॥955॥
मग ही वैराग्यभूमिका जिंकल्यावर ती त्याची योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो, तें आतां सांगतो. 55
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥18.49॥
956-18
तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें । तेथ नातुडे तो वागुरें । वारा जैसा ॥956॥
वारा जसा पारध्याच्या जाळ्यांत इकडून तिकडे जातांना अडकत नाही, तसा देह आदिकरून जे संसार पाश त्यांत तो असून हि सांपडत नाही. 56
957-18
पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देठु फळें । न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय ॥957॥
हे पहा, पिकलेले फळ जसे देंठाला धरीत नाही, किंवा देठहि त्याला धरीत नाही, तसें संसारादिकांवरील सर्व प्रेम निर्जीव होते. (लुळे पडते. ) 57
958-18
पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें ॥958॥
ज्याप्रमाणे विषाचे पात्र माझे आहे असे कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे पुत्र, वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असली तरी ती माझी आहेत असे म्हणत नाही. 58
959-18
हें असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती । पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाच्या रिगे ॥959॥
फार काय सांगावे, कढत पदार्थाच्या योगें हातालाः चटका बसतांच जसा हात मनुष्य माग घेतो, तशी त्याची बुद्धि विषयांपासून मागें परतून आत्मविचाराकडे लागते. 59
960-18
ऐसया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥960॥
ज्याप्रमाणे दासी स्वामीच्या भीतीने त्याची आज्ञा मोडीत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन आम्याची शपथ मोडीत नाही.960
961-18
तैसें ऐक्याचिये मुठी । माजिवडें चित्त किरीटी । करूनि वेधी नेहटीं । आत्मयाच्या ॥961॥
तसें अर्जुना, ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो; 61
962-18
तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे । आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें ॥962॥
त्या वेळेस, जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे धूर आपोआप राहतो, तशी इहपर विषयांची इच्छा सहजच नष्ट होते. 62
963-18
म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासौनि जाय आपैसीं । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥963॥
म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपोआप नाहीशी होते. फार सांगून काय करावयाचे आहे? अशी भूमिका साधकाला प्राप्त होते. 63
964-18
पैं अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रींचि जीवा । ठावो होय ॥964॥
हे बघ अर्जुन, विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो. 64
965-18
धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे । नवें तंव नुपकरे । कांहीचि करूं ॥965॥
जसें सांचविलेले पाणी रोज खर्च केलें म्हणजे तें सरतें, तसे प्रारब्धकर्म हें भोगांती सरते आणि अहंकर्तृत्वभावना नसत्यामुळे नवीन कर्म उपन्न होत नाही. 65
966-18
ऐसीं कर्में साम्यदशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥966॥
अर्जुन, अशाप्रकारे सर्व कर्माची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्रीगुरूंची आपोआप भेट होते.66
967-18
रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं । डोळ्यां तमारी । मिळे जैसा ॥967॥
हे पहा, रात्रींचे चार प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य दृष्टीस पडतो 67
968-18
का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥968॥
अथवा, फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवितो, त्याप्रमाणे श्रीगुरु हे भेट्न जिज्ञासूची कर्मकर्तृत्ववाची खटपट बंद करतात.68
969-18
मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा । तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥969॥
मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी कलेचा कमीपणा मुळीच राहात नाही, त्याप्रमाणे, हे श्रेष्ठवीरा, गुरुकृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीहि उणीव राहात नाही. 69
970-18
तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नासे । तेथ निशीसवें जैसें । आंधारें जाय ॥970॥
त्या वेळीं अज्ञान म्हणून जेवढे असते, तेव्हढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते, आणि रात्र गेल्यावर अंधार नहीसा होतो, 970
971-18
तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥971॥
याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटांत जी कर्ता, कर्म आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीहि नाश पावते. जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही, तो आपोआपच मरतो. 71
972-18
तैसेंचि अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥972॥
तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्मांचा नाश होतो. अशा प्रकारे सर्व कमचा समूळ नाश होणे यालाच संन्यास म्हणतात तोच त्याला प्राप्त होतो. 72
973-18
येणें मुळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा जेथ ठावो पुसे । तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे ॥973॥
त्यामुळे ज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाले म्हणजे मग जाणावयाचे जे तें तो आपण स्वतःच आहे.73
974-18
चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं । आपणयातें काई । काढूं जाइजे? ॥974॥
असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहांत बुडत असल्याच जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, तो ! सत्य मानून त्यातून आपल्याला काढण्याविषयीं तो खटपट करील काय?
975-18
तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दुःस्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥975॥
त्याप्रमाणे मला कळत नाही, मी आतां समजून घेईन, हे त्याचे दुःस्वप्त नष्ट होते; आणि • ज्ञेय व ज्ञाता हे जाऊन तो केवळ चिदाकाश म्हणजे ज्ञानमात्र होतो. 75
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण
