सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२७६ ते १३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1276-18
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु । भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं ॥1276॥
ह्या देहात्मबुद्धीने पावलों पावलीं, आत्मघात होत असतो व विसांवा म्हणून कसा तो क्षणभरही मिळत नाही. 76
1277-18
येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें । पडेल जरी बोलणें । नेघसी माझें ॥1277॥
माझ्या भाषणाकडे तू दुर्लक्ष केलेंस तर, वस्तुतः तू अमर असूनही तुला मरणासारखे दारुण दुःख भोगावें लागेल. 77
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे
। मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥18.59॥

1278-18
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा ॥1278॥
पथ्य मोडणारा ज्वराला व दीप फोडणारा अंधकारला, तसा विचार सोडणारा अहंकाराला पुष्ट करितो. 78
1279-18
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥1279॥
आपला देह तो अर्जुन, दुसऱ्यांचे देह ते स्वजन, आणि त्यांच्याबरोबर युद्ध म्हणजे पापकर्म. 79
1280-18
इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां । ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा ॥1280॥
ह्या तीन गोष्टींना आपल्या, बुद्धीप्रमाणे अशी तीन नांवें देऊन, अर्जुना, मी युद्ध करणार नाही असा-1280

128-18
जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥1281॥
चित्तांत दृढनिश्चय करून जरी तूं बसला असलास तरी तुझा नैसर्गिक म्हणजे जन्मजात, स्वभाव तुझा तो निश्चय टिकू देणार नाही. 81
1282-18
आणि मी अर्जुन हे आत्मिक । ययां वधु करणें हें पातक । हे मायावांचूनि तात्त्विक । कांहीं आहे? ॥1282॥
आणि विचार करून पाहिले तर, ” मी अर्जुना, हे माझे ह्यांचा वध करणे म्हणजे पातक ” इत्यादि समजूत, म्हणजे तत्त्वदृष्टया केवळ भ्रमावांचून दुसरें कांहीं आहे काय? 82
1283-18
आधीं जुंझार तुवां होआवें । मग झुंजावया शस्त्र घेयावें । कां न जुंझावया करावें । देवांगण ॥1283॥
अरे, प्रथम तूंच युद्धाला तयार झालास त्याकरितां शस्त्रही धारण केलेंस व आतां ऐन प्रसंग मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा करतोस? 83
1284-18
म्हणौनि न झुंजणें । म्हणसी तें वायाणें । ना मानूं लोकपणें । लोकदृष्टीही ॥1284॥
म्हणून, झुंजणार नाही असें जें म्हणत आहेस ते व्यर्थ होय. आम्हाला तर ते खरे वाटत नाहीच, पण लोकही हे खरे आहे असे मानणार नाहीत. 84
1285-18
तऱ्ही न झुंजें ऐसें । निष्टंकीसी जें मानसें । तें प्रकृति अनारिसें । करवीलचि ॥1285॥
तरी युद्ध करू नये असा जो चित्तांत सारखा विचार सुरू आहे, तो तुझा क्षात्रस्वभावच अन्यथा करील. (फिरवील) 85

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥18.60॥

1286-18
पैं पूर्वे वाहतां पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं । तरी आग्रहोचि उरे तें आणी । आपुलिया लेखा ॥1286॥
अहो, पूर्वदिशेकडे पाणी वाहत असता, कोणी पश्चिमेकडे तोंड करून पोहू लागला, त्याचा आग्रह मात्र उरणार; पाणी त्यास आपल्या ओघाकडे आणणारच. 86
1287-18
कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवें साळीपणें । तरी आहे आन करणें । स्वभावासी? ॥1287॥
साळीच्या बीयाने साळीपणानें न उगविण्याचे ठरविले तर ही अस्वाभाविक गोष्ट शक्य आहे काय? 87
1288-18
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा । आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तूं ॥1288॥
त्याप्रमाणे, जन्मतः क्षात्रसंस्कारसिद्ध प्रकृतीने घडलेला किंवा बनलेला बनलेला जो तूं, तो ह्या क्षणीं युद्ध करणार नाही असे जरी म्हणालास तरी तें व्यर्थ होय; ती तुझी प्रकृति तुला उठविणारच. 88
1289-18
पैं शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता । गुण दिधले जन्मतां । प्रकृती तुज ॥1289॥
अर्जुना, तेज, शौर्य, दक्षता आदि तुझ्या अंगचे गुण प्रकृतिसिद्ध किंवा जन्मजात आहेत. 89
1290-18
तरी तयाचिया समवाया- । अनुरूप धनंजया । न करितां उगलियां । नयेल असों ॥1290॥
तर, त्या गुणानुरूप न वागतां तुं स्वस्थ बसू म्हणशील तर प्रकृति तुला तसे करू देणार नाही. 1290

1291-18
म्हणौनियां तिहीं गुणीं । बांधिलासि तूं कोदंडपाणी । त्रिशुद्धी निघसी वाहणीं । क्षात्राचिया ॥1291॥
अर्जुना, त्या गुणांनीं तूं जन्मतः बांधलेला आहेस. अखेर ते तुला क्षात्र वळणावर नेणारच. 91
1292-18
ना हें आपुलें जन्ममूळ । न विचारीतचि केवळ । न झुंजें ऐसें अढळ । व्रत जरी घेसी ॥1292॥
अथवा आपला जन्म कोणत्या कुलांत आहे. ह्याचा कांहींएक विचार न करितां नुसता लढणार नाही असा निश्चय करून बसशील. 92
1293-18
तरी बांधोनि हात पाये । जो रथीं घातला होये । तो न चाले तरी जाये । दिगंता जेवीं ॥1293॥
तरी, हातपाय बांधून रथीत घातलेला मनष्य स्वतः न चालतांही जसा रथाबरोबर देशांतराला पोंचतो 93
1294-18
तैसा तूं आपुलियाकडुनी । मीं कांहींच न करीं म्हणौनि । ठासी परी भरंवसेनि । तूंचि करिसी ॥1294॥
त्याप्रमाणे आपण कांही करणार नाही अशा निश्चयाने तू जरी असलास तरी, खात्रीने तूच ते करणार.94
1295-18
उत्तरु वैराटींचा राजा । पळतां तूं कां निघालासी झुंजा? । हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥1295॥
विराट नगराचा राज उत्तर, युद्धांतून पळू लागला, तेव्हां तूं रे कां तें युद्ध केलेंस? हा तुझा क्षात्रस्वभाव तुला युद्ध करू लावणारच. 95

1296-18
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवां येकें नागविले रणांगणीं । तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूंतें ॥1296॥
अर्जुना, त्या युद्धांत अकरा अक्षौहिणी महावीर तू एकटयानं पराजित करून त्यांची वस्त्रे हिराऊन घेतलीस, तो तुझा क्षत्रियाचा स्वभाव तुला झुंजविणारच. 96
1297-18
हां गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया? । परी भोगविजे बळिया । अदृष्टें जेणें ॥1297॥
अरे, रोग्याला रोगाची किंवा निर्धनाला निर्धनत्वाची काय आवड असते? पण बलवान अदृष्ट तसे भोग देतेच. 97
1298-18
तें अदृष्ट अनारिसें । न करील ईश्वरवशें । तो ईश्वरुही असे । हृदयीं तुझ्या ॥1298॥
ईश्वराधीन असलेले ते अदृष्ट अन्यथा कांहीही करू शकत नाही; व तो ईश्वरही तुझ्याच हृदयाच्या ठिकाण आहे,98
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥18.61॥

1299-18
सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं । चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥1299॥
भूतमात्रांच्या अंतःकरणरूपी महाकाशांत, जो ज्ञानवृत्तिरूप अनंत किरणांनी उदय पावला आहे 99
1300-18
अवस्थात्रय तिन्हीं लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥1300॥
व जो जीवांच्या जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थारूप लोकांस प्रकाशून, देहात्मबुद्धीच्या विपरीत ज्ञानाने सन्मार्गच्युत झालेल्या त्या जीवरूपी पांथिकांना ( वाटसरूंना जागे करितो. 1300

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *