प्रेतयात्रा स्मशान यात्रेचे निर्याणपर अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

प्रेतयात्रा/ स्मशान यात्रेचे/निर्याणपर अभंग
अभंग संख्या :

1611 धन मान बळे नाठविसी देवा 1
धन मान बळे नाठविसी देवा । मृत्यू काळी तेंव्हा कोण आहे ॥१॥
यमाचे यमदंड बैसतील माथा । तेंव्हा तुज रक्षिता कोण आहे ॥ २ ।
माय बाप बंधू तोवरी सोयरी । इंद्रिये जो वरी वाहताती ॥३॥
सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता । तीही केस देता रडतसे ॥४॥
विष्णुदास नामा जाताची शरण । स्वप्नी जन्म मरण नाही नाही ॥५॥

नको नको मना गुंतुं मायाजाळीं 2

नको नको मना गुंतुं मायाजाळीं । काळ आला जवळीं ग्रासावया ॥१॥
काळाची ही उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥२॥
सोडविना बंधु पाठिची बहिण । शेजेची कामीन दुर राहे ॥३॥
सोडविना राजा देशीचा चौधरी । आणिक सोइरीं भलीं भलीं ॥४॥
तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणिवांचूनियां ॥५॥

क्षणोक्षणी हाची करावा विचार 3
क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥धृ.॥
संता समागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थासी ॥२॥
तुका म्हणे ईह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥

बोळविला देह आपुलेनि हातें 4
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥१॥
एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥धृ.॥
मृतसंजीवनी निवविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥
एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा । ३॥
अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥४॥
तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥

जाला प्रेतरुप शरीराचा भाव । 5
जाला प्रेतरुप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोध माया । म्हणती हाय हाय यमधर्म ॥२॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि लागला ब्रम्हत्वेंसी ॥३॥
फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य ध्वनि बोंब झाली ॥४॥
दिली तीळांजुळी कुळनाम रुपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पिले ॥५॥
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥६॥

रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी 6
रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ॥१॥
शरीर जायाचें ठेवणें । धरिसी अभिलास झणें ॥२॥
नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥३॥
अंतकाळींचा सोईरा । तुका म्हणॆ विठो धरा ॥४॥

याजसाठी केला होता अट्टाहास 7
याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चिंतीने पावलो विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे झालिया वेंचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

अतंकाळी मी परदेशी 8
अतंकाळी मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसी ।
म्हणोनिया हृषीकेशी । शरण मी तुज आलो ॥१॥
नवमास गर्भवासीं । कष्ट झाले तया मातेसी ।
तें निष्ठुर झाली कैसी । अंती दूर राहिली ॥२॥
जीवीं बापासी आवड । मुखीं घालोनि करी कोड ।
जेव्हां लागली यमओढ । तेव्हां दूर टाकिले ॥३॥
बहिणी बंधुचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा ।
जेव्हां लागली यमशृंखला । तेव्हां दूर राहिली ॥४॥
कन्या पुत्रादिक बाळे । ही तंव स्नेहाची स्नेहाळे ॥
तुझ्या दर्शनाहून व्याकुळे । अंती दूर राहिली ॥५॥
देहगृहाची कामिनी । तें तंव राहिली भुवनी ।
मी तंव जळतसे स्मशानीं । अग्नीसवें एकला ॥६॥
मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानी परतले ॥
शेवटी टाकोनिया गेले । मजलागी स्मशानी ॥ ७ ॥
ऐसा जाणोनि निर्धार । मग मज आला गहिवर ।
तंव दाही दिशा अंधकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥
ऐसें जाणोनि निर्वाण पाहीं । मनुष्यजन्म मागुतां नाहीं ।
नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥९॥

मोलाचे आयुष्य वेचूनियां जाय 9
मोलाचे आयुष्य वेचूनियां जाय । पूर्वपुण्य होय लाभ याचा ॥१॥
अनंत जन्माचा शेवट पाहतां । नरदेह हातां आला तुझ्या ॥२॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावे विठ्ठलासी सुखालागीं ॥३॥
सांचलिया धन होईल ठेवणे । तैसी नारायण जोडी करा ॥४॥
करा हरिभक्ति परलोकीं ये कामा । सोडविल यमा पासोनियां ॥५॥
तुका म्हणे करा आयुष्याचे मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥६॥

आपुला तो एक देव करूनि घ्यावा 10
आपुला तो एक देव करूनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर ती माइकें दुःखाची जनितीं । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऐसें । लावी मना पिसें गोविंदाचें ॥३॥
तुका म्हणे एका मरणेचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥

आलिया संसारा उठा वेग करा 11
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हे काळाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचे काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे ॥३॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥४॥

विषयाचे सुख येथे वाटे गोड 12
विषयाचे सुख येथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठूर । यमाचे किंकर बहुसाल ॥२॥
असिपत्र तरुवर खैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकीं ॥३॥
तप्तभूमीवरी चालविती पायीं । अग्निस्तंभ बाही कवटाळविती ॥४॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायाती गर्भवास ॥४॥

देह मृत्याचे भातुकें । कळों 13
देह मृत्याचे भातुकें । कळों आले कवतुकें ॥१॥
काय मानियेलें सार । हेचि वाटतें आश्चर्य ॥२॥
नाना भोगांची संचितें । करुनि ठेविलें आइतें ॥३॥
तुका म्हणे कोडीं । उगवू न शकती बापुडी ॥४॥

कोणे तुझा सांग केला अंगीकार 14
कोणे तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंती त्वां थोर मानियेली ॥१॥
कोणें ऐसा तूज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥२॥
तेव्हां तूज कोण घालील पाठीसी । घांसील भूमीसी वदन यम ॥३॥
कां रे नागविसी आयुष्य खातो काळ । दिवसे दिवस बळ क्षीण होतें ॥४॥
तुका म्हणे यासी सांगा कोणी तरी । विसरला हरि मायबाप ॥५॥

बुध्दीचा पालट धरा रे कांहीं 15
बुध्दीचा पालट धरा रे कांहीं । मागुता हा नाहीं मनुष्यदेह ॥१॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदारा आस धनवित्त ॥२॥
अवचित निधान लागले हे हातीं । भोगावी विपत्ति गर्भवास ॥३॥
यावें जा पुढे ऐसेंचि कारण । भोगावे पतन नरकवास ॥४॥
तुका म्हणे धरी आठव या देहीं । नाहीं तरी कांहीं बरे नव्हे ॥५॥

मैत्र केला महाबळी । 16
मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळीं ॥१॥
आधी घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम ।
नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥
धन मिळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥
तंववरी तुमचे बळ । जंव आला नाही काळ ॥५॥
तुका म्हणे बापा । चुकवी चौ-यांशींच्या खेपा ॥६॥

एक पाहातसां एकांची दहनें 17
एक पाहातसां एकांची दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥
मारा हाक देवा भय अट्टाहासें । जंव काळा ऐसें झालें नाहीं ॥२॥
मरणाची तंब गांठोडी पदरीं । जिणें तोचिवरी माप भरे ॥३॥
तुका म्हणे धिग वाहती मारग । अंगा आले मग हालों नेदी ॥४॥

जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचें 18
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचें । अंत हे काळीचे नाहीं कोणी ॥१॥
झाल्या हीन शक्ति नाकडोळे गळती । सांडोनिया पळती रांडापोरे ॥२॥
बाईल म्हणे खर मरतां तरी बरे ॥ नासिले हे घर थुंकोनिया ॥३॥
तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥४॥

मरणाहाती सुटली काया 19
मरणाहाती सुटली काया । विचारे या निश्चये ॥१॥
नासोनियां गेली खंती । सहजस्थिति भोगाची ॥२॥
न देखेंसे झाले श्रम । आलें वर्म हाता हे ॥३॥
तुका म्हणे कैंची कीव । कोठे जीव निराळा ॥४॥

हाती घेऊनियां काठी ॥ तुका 20
हाती घेऊनियां काठी ॥ तुका लागला कलेवरा पाठीं ॥१॥
नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी तें ठिकाणीं ॥२॥
काढिले ते ओढें । मागील उपचाराचे पुढे ॥३॥
नाहीं वाटो आला भेव । सुख दु:ख भोगिता देव ॥४॥
याजसाठी हे निर्वाण । केलें कसियेलें मन ॥५॥
तुका म्हणे अनुभव बरा । नाहीं तरी हस्तपाय चोरा ॥६॥

संपूर्ण भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *