सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ७६ ते १०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

76-5
जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥76॥
सूक्ष्म विचार केला, तर तो सर्वेश्वर वस्तुतः काहीच न करणारा आहे, परंतु मायेच्या उपधींचा आरोप त्यावर केला म्हणजे संपूर्ण त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो, असे दिसून येते.
77-5
आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें । जे हातोपावो न लिंपे । उदासवृतीचा ॥77॥
सर्वेश्वरास त्रिभुवनाचा कर्ता म्हणावे, तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही; कारण तो उदासीन असल्यामुळे त्याच्या हाता- पायांस कशाचेही संसर्ग होत नाही.
78-5
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परि महाभूतांचे दळवाडें । उभारी भले ॥78॥
त्याची स्वरूप स्थिती कधीच मोडत नाही, त्याच्या अकर्तेपणालाही कधीही विरोध निर्माण होत नाही, तरीपण तो पंचमहाभूतांचे समुदाय उत्तम प्रकारे निर्माण करतो.
79-5
जगाचा जीवीं आहे । परि कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेंणे ॥79॥
तो परमात्मा विश्वातील सर्व प्राणीमात्रांना व्यापून असतो; परंतु कधीही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे विश्व उत्पन्न होते आणि नाहीसे होते, याची त्याला वार्ताही नसते.
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञान तेन मुह्यन्ति जन्तवः॥5.15॥
भावार्थ :- परमात्मा कोणाचेही पाप अथवा पुण्यही घेत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेलेले असते; त्यामुळे अज्ञानी जीव मोहित होत असतात.
80-5
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ॥80॥
प्राणिमात्राकडून होणारी सर्व पाप – पुण्य ही सर्व त्याच्या जवळ असूनदेखील तो त्यांना जाणत नाही.ऐवढेच काय, तो त्यांच्या साक्षीदेखील होऊन राहत नाही, मग इतर गोष्टीबद्दल काय बोलावे?


81-5
पै मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥81॥
तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारचा लिलाविलास करतो (सगुण स्वरूपाच्या संगतीने तो (देह धारण करून) सगुण होऊन क्रीडा करतो); परंतु त्या ईश्वराचा निराकारपणा थोडाही मलिन होत नाही.
82-5
तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरीं । ते अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥82॥
हे अर्जुना ! तो परमात्मा जगाला उत्पन्न करतो आणि जगाचा नाश करतो. त्याच्या कर्तृत्वाविषयी जे बोलले जाते, ते केवळ अज्ञान होय, हे तू लक्षात ठेव.
ज्ञानेन न तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवत् ज्ञान प्रकाशयति तत्परम्॥5.16॥
भावार्थ :- ज्याचे ते अज्ञान परम्यात्म्याच्या (आत्मज्ञानाने) ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्याचे ते ज्ञान त्या स्वतः सिद्ध सत्-चित्-आनंदघन परमात्म्याचा अनुभव घेऊ लागते.
83-5
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचें ॥83॥
जेंव्हा ते अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते, तेंव्हा विषभ्रमाची काजळी दूर होते. असे झाले, म्हणजे परमेश्वराचे अकर्तेपन स्पष्टपणे समजू लागते.

84-5
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसे मानले जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥84॥
आता ईश्वर अकर्ता आहे, हे जर चित्ताला पटले, तर पूर्वीपासून स्वभावतः तो ईश्वर मीच आहे, असा अभेदाचा अनुभव येतो.
85-5
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं । देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥85॥
अशा विवेकाचा उदय ज्याच्या चित्तात होतो, त्याला त्रैलोक्यात भेद कसा बरे दिसू शकेल? तो आपल्या अनुभवाने संपूर्ण जगच मुक्त आहे, असे पाहतो.


86-5
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदयाचि सूर्ये दिवाळी । की येरीही दिशां तियेचि काळी । काळिमा नाही ॥86॥
ज्याप्रमाणे पूर्वदिशेच्या राऊळी सूर्य उदय पावताच प्रकाशाची दिवाळी सुरु होते आणि इतर दिशांतील अंधकारही नाहीसा होतो,
तद् बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः॥5.17॥
भावार्थ :- ज्याची बुद्धी परम्यातम्याशी ताद्रुप झाली आहे, मन तदाकार झाले आहे, त्या सत्-चित्-आनंदस्वरूप परम्यातम्याशी जे सदैव ऐक्यभावाने स्थित आहेत; आणि ज्ञानाने ज्याचे सर्व प्रकारचे दोष नाहीसे झाले आहेत, असे जे तत्परायन, त्यांना पुनः जन्म मरण प्राप्त होत नाही. ते मोक्षाला प्राप्त होतात.
87-5
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥87॥
ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानासंबधी आहे आणि जे आपणास ब्रम्हरूप मानू लागतो, तसेच रात्रंदिवस ब्रम्हपरायन होऊन आपली ब्रम्हस्थिती पूर्णपणे राखतो,
88-5
ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयाते गिंवसित आलें । तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई ॥88॥
असे सर्व व्यापक श्रेष्ठ ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करीत आले आहे, त्याची सर्व विश्वासम्बधी समतादृष्टी शब्दाने विशेष काय वर्णन करावी?
89-5
एक आपणपेंचि पां जैसें । ते देखतीं विश्व तैसे । हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥89॥
ते जसे आपणास ब्रम्हरूप मानतात, त्याचप्रमाणे विश्वदेखील ब्रम्हरूप आहे, असे जाणतात, हे येथे सांगण्यात मोठे नवल ते काय??
90-5
परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥90॥
परंतु भाग्य जसे कौतुकानेदेखील दारिद्राकडे पाहत नाही, किंवा विवेक हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही,


91-5
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानी । मृत्युकथा ॥91॥
किंवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकारचे स्वरूप पाहत नाही अथवा अमृताच्या कानावर कधी मृत्यूची वार्ताही येत नाही,
(अगदी तसेच ज्ञानी पुरुष त्रैलोक्यात कसलाही भेद जाणत नाही)
92-5
हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥92॥
हे राहू दे; उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाही.
(येथे माऊली ने आपल्या सर्वांना समजावे म्हणून अजून एक दृष्टांत दिला आहे)
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः॥5.18॥
भावार्थ :- आत्मज्ञानी पंडित विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राम्हण, गाय, हत्ती, आणि चांडाल या सर्वांच्या ठिकाणी त्याची दृष्टी सारखीच असते
93-5
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विपु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ॥93॥
मग त्याच्या ठिकाणी हे चिलट आहे आणि हा हत्ती, हा चांडाल आणि हा ब्राम्हण आहे, अथवा हा आपला मुलगा आणि हा परका, असा भेद त्यांच्या अंगी कसा बरे राहील.?
(अर्थात राहणार नाही)
94-5
ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥94॥
किंवा ही गाय, हा कुत्रा अथवा हा एक थोर आणि हा नीच आहे, हे सगळे राहू दे. जागा असलेल्या माणसास स्वप्न कसे बरे पडणार.
(झोपेतून जागे झाल्यावर, अज्ञान / अहंकार दूर झाल्यावर)
95-5
एथ भेदु तरी कीं देखा । जरि अंहभावा उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥95॥
आणि अंतः करणात अहंकार असेल, तर विश्वात अनेक प्रकारचे भेद दिसतात; परंतु तो अहंकारच नाहीसा झाला, तर भेदभाव कुठला. (कोणत्याच प्रकारचे भेद दिसणार नाही)
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः॥5.19॥
भावार्थ :- अशा सम दृष्टीमध्ये ज्याचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकीच (इहलोकीच, वर्तमान अवस्थेत जीवनमुक्त झाले आहेत) संसाराला जिंकेले आहे. कारण सत्-चित्- आनंदस्वरूप परमात्मा निर्दोष व सम आहे; म्हणून ते परमात्म्यातच स्थित आहेत.


96-5
म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥96॥
म्हणून सर्व ठिकाणी, सर्वकाळ सम असणारे ते अद्वय ब्रम्ह आपणच आहोत, हे समदृष्टीचे तत्व, ते तो सम्पूर्ण जाणतो.
97-5
जिहीं विषयसंगु न सांडिता । इंद्रियांतें न दंडितां । परि भोगिली निसंगता । कामेंविण ॥97॥
ज्यांनी विषयांचा समंध न सोडता, इंद्रियांचे दमन न करता, निरिच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगली;
98-5
परि सांडिले निदसुरें । लौकिकु हें ॥98॥
जे लोकांना अनुसरून, लोक जे करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात; (उदरनिर्वाहासाठी लौकिक व्यवहार करतात)
परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्राम्हविषयक जे अज्ञान असेल, त्याचा त्यांनी त्याग केलेला असतो.
99-5
जैसा जनामाजी खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरीं परि संसारु । नोळखें तयांतें ॥99॥
ज्याप्रमाणे पिशाच्य जगात वावरत असून जगाला दिसत नाहीत, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. (समदृष्टी असलेला आत्मज्ञानी व्यक्तीला)
100-5
हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥100॥
हे असू दे, वास्तविक पाहता वाऱ्यामुळे पाण्यावरच पाणी लाटरूपाने खेळत असते. परंतु सामान्य लोक या लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत, असे म्हणतात.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading