सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७५१ ते ७७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
,

751-18
पैं ग्रहांमाजीं इंगळु । तयातें म्हणिजे मंगळु । तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा ॥751॥
सर्व ग्रहात जो इंगळ (निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा) त्यालाही मंगळ म्हणत नाहीत काय? तसा तमाला गुण हा ढसाळ हा (साधरण) शब्द आहे. 751
752-18
जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ॥752॥
हे सुभटा अर्जुना, सर्व दोषांचे वसतिस्थान जो तमोगुण, तो कमवून त्या नराची मूर्ती बनवली आहे: 752
753-18
तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कहीं न मुके । पापें पोषितां दुःखें । न सांडिजे जेवीं ॥753॥
ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडीत नाही, त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो; म्हणून निद्रा त्याला कधी सोडत नाही, 753
754-18
आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयातें न सांडी । विसंबूं न सके धोंडीं । काठिण्य जैसें ॥754॥
आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीति असल्यामुळे त्याला भव्य सोडत नाही; 754
755-18
आणि पदार्थजातीं स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोकें ठावो । केला न शके पाप जावों । कृतघ्नौनि जैसें ॥755॥
आणि कृतघ्न मनुष्याचे पाप जाण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जात नाही, तसे पदार्थमात्राच्या ठिकाणी; प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो; 755

756-18
आणि असंतोष जीवेंसीं । धरूनि ठेला अहर्निशीं । म्हणौनि मैत्री तेणेंसीं । विषादें केली ॥756॥
आणि रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे 756
757-18
लसणातें न सांडी गंधी । कां अपथ्यशीळातें व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादें तया ॥757॥
लसुनाची घाण जशी त्याजपासून दूर होत नाही, किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडीत नाही, त्याप्रमाणे विषादाने त्याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते; 757
758-18
आणि वयसा वित्तकामु । ययांचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदें आश्रमु । तोचि केला ॥758॥
आणखी तारुण्य, वित्त व काम यांचा जो गर्व वाहतो, म्हणून त्याच्या ठिकाणी मदही वास करतो; 758
759-18
आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु । कां जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥759॥
अग्नीला जशी तप्तता सोडीत नाही, जातिवंत साप जसा आपला डाव धरण्याचा स्वभाव सोडत नाही अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून त्याला सोडत नाही; 759
760-18
नातरी शरीरातें काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथी अढळु । तामसीं मदु ॥760॥
अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही, तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो. 760

761-18
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाईं दोख । जिया धृती देख । धरिलें आहाती ॥761॥
याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विशाद व मद हे पाच तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत, 761
762-18
तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें । म्हणितलें तेणें देवें । जगाचेनी ॥762॥
त्याला धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले. 762
763-18
एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥763॥
याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने जो कर्माचा निश्चय केला. तो धैर्य शेवटास नेते. 763
764-18
सूर्यें मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणें तें आहे । धैर्यें जेवीं ॥764॥
सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागला त्यावरून मनुष्य पायांनी चालतो, परंतु चालनाराणे आणि धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही, 764
765-18
तैसी बुद्धि कर्मातें दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ॥765॥
त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माला दाखविते ते कर्म इंद्रिये उत्पन्न करितात, परंतु उत्पन्न होण्याला जे धैर्य लागते, 765

766-18
ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती । यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥766॥
ते धैर्य तुला तीन प्रकारांनी सांगितले; आणि त्याच धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले. 766
767-18
येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे । तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें ॥767॥
मग त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे, तेही कर्माप्रमाणे तीन प्रकारचे आहे, 767
768-18
तरी फळरूप तें सुख । त्रिगुणीं भेदलें देख । विवंचूं आतां चोख । चोखीं बोलीं ॥768॥
तर फळरूप जे सुख, ते तीन गुणांनी निरनिराळे केलेले आहे. त्याचा आता स्पष्ट भाषणांनी विचार करू. 768
769-18
परी चोखी ते कैसी सांगे । पैं घेवों जातां बोलबगें । कानींचियेही लागे । हातींचा मळु ॥769॥
ते स्पष्ट असे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दांचा मळ त्याला लागतो व कर्ण द्वारा श्रवण केले असता, कर्णरोग हाताचा मळ त्याला लागतो. 669
770-18
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें । अवधानही होय बाहिरें । तेणें आइक हो आंतरें । जीवाचेनि जीवें ॥770॥
म्हणून शब्दाचा व अवधानाचा अव्हेर करुन ते केवळ अंत:करणाने श्रवण कर. 770

771-18
ऐसें म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपित असें ॥771॥
असे बोलून देवांनी त्रिविध सुखाचे वर्णन करण्या विषयी प्रस्तावना केली, तीच व्यवस्था मी सांगतो, 771
सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥18.36॥
772-18
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगों म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलों तें प्राज्ञा । ऐक आतां ॥772॥
भगवान म्हणतात:- हे बुद्धिमंता अर्जुना, सुखाचे तीन रूपे गुणांच्या योगाने आहेत म्हणून तुला जे म्हटले होते ती सांगतो, ऐक. 772
773-18
तरी सुख तें गा किरीटी । दाविजेल तुज दिठी । जें आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥773॥
हे किरीटी, जीवाला आत्म्याची भेट होती त्यावेळेस जो आनंद होतो, त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो. 773
774-18
परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसें घेपें । कां कथिलाचें कीजे रुपें । रसभावनीं ॥774॥
जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे अथवा रसाचे पुटे देऊन जसे कथलाचे रूपे करावे 774
775-18
नाना लवणाचें जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचें जेवीं ॥775॥
किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याजवर दोन-चारवेळ पाणी घालावे लागते, 775

,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *