सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

251-6
जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूं नये ॥251॥
सुर्यासमोर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते आणि ढग दूर गेल्यावर त्याचे तेज आवरून धरता येत नाही.
252-6
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥252॥
त्याप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो कोरडा पापुद्रा असतो, तो धान्यावरील कोंड्याप्रमाणे निघून जातो.
253-6
मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीचि भांब । तैसी दिसे ॥253॥
मग स्फटिकाचे मूर्तिमंत स्वयंभु लिंग जसे असावे अथवा रत्नरूप बिजाला जणू अंकुर निघावा, त्याप्रमाणे त्या अवयवांची शोभा दिसते
254-6
नातरि संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । की अंतर्जोतीचें लिंग । निर्वाळिलें ॥254॥
अथवा संध्याकाळी आकाशात पसरलेले रंग काढून जणू ते शरीर बनविले आहे किंवा देहातील आत्मज्योतीची तेजस्वी शिवलिंगच.!!!
255-6
कुंकुमाचे भरींव । सिध्दरसांचे वोतींव । मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥255॥
केशराने पूर्ण भरलेला आकार अथवा शरीररूपी मुशीत अमृत ओतून झालेला आकार अथवा मला असे जाणवते की, देहाच्या रूपाने मोक्षरूपी शांतीच सर्व अवयवासह प्रगट झालेली आहे.

256-6
तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें ॥256॥
योग्याचे शरीर म्हणजे जणू आनंदरुपी चित्रातील रंग अथवा महासुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे जणू विकसित झालेले रोप होय.
257-6
तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥257॥
तो देह म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा अथवा कोवळीकतेचा बहरून आलेला मळा आहे.
258-6
हो कां जे शारदियेचे वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥258॥
अथवा शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओलाव्याने प्रफुल्लित झालेले चांद्रबिंबच किंवा आसनावर विराजमान झालेले तेजच होय.
259-6
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥259॥
ज्यावेळी कुंडलिनी शक्ती चंद्रामृत प्राशन करते, त्यावेळी शरीर असे तेजोमय होते, अशा देहाला पाहून यमदेखील घाबरतो.
260-6
वृध्दाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥260॥
वार्धक्य तर संपून जाते, तारुण्य नाहीसे होते आणि नाहीसे झालेले रसरशीत बालपण प्रगट होते.

261-6
वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवी बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपम ॥261॥
एरवी वयाने तो एवढासा दिसतो; परंतु त्याचा पराक्रम मोठा असतो. त्याच्या धैर्याच्या थोरपणाला उपमा देता येत नाही.
262-6
कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥262॥
सोन्याच्या वृक्षाची पालवी अथवा रत्नांची नित्यनुतन कळी यावी, त्याप्रमाणे योगी पुरुषाला नवी उत्तम नखे येतात.
263-6
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥263॥
दुसरे नवीन दातही येतात. परंतु ते फार छोटे असतात, जणू कांही दोन्ही बाजुंनी हिऱ्यांची पंगत बसली आहे.
264-6
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचियां ॥264॥
ज्याप्रमाणे माणिकाचे बारीक कण असावेत आणि ते अनुऐवढे असावेत, त्याप्रमाणे सर्व शरीरावर रोमांचाची टोके वर येतात.
265-6
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पळें । पाखाळीं होती डोळे । काय सांगो ॥265॥
हाताचे आणि पायाचे तळवे लाल कमळाप्रमाणे लालसर आणि नाजूक होतात. डोळे किती स्वच्छ होतात, हे काय सांगू??

266-6
निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥266॥
मोत्ये मोठी होऊन दाटल्यामुळे लहान शिंपीत मावत नाहीत, म्हणून जसा शिंपीच्या दोन भागांचा सांधा उकलतो,
267-6
तैशीं पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।आधिलीची परि होये । गगना कळिती ॥267॥
त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात मावत नाही; आणि त्या पात्यांना व्यापून बाहेर निघावायस पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते; परंतु ती आकाश व्यापणारी होते.
268-6
आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥268॥
अर्जुना, ऐक. त्या योगी पुरुषाचा देह सोन्यासमान कंतीमय होतो; परंतु देह वायूसमान हलका होतो. कारण त्यातील पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश नाहीसे झालेले असतात.
269-6
मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचे ॥269॥
मग तो समुद्राच्या पलीकडे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो.
270-6
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिध्दी ॥270॥
वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्यास प्रसंगानुसार प्राप्त होतात.

271-6
आइकें प्राणाचा हातु धरुनि । गगनाची पाउटी करुनी । मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥271॥
अर्जुना, ऐक. जी प्राणाचा हात धरून हृदय-आकाशच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आली,
272-6
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥272॥
ती कुंडलिनी संपूर्ण जगताची आई आहे, ती ब्रम्हचैत्यन्यरूप सार्वभॊम राजाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला शीतल सावली केली आहे,
273-6
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी । जे प्राणाची उघडी । जन्मभूमी ॥273॥
जी निराकार ब्रम्हाची साकार अशी मूर्ती, जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी, जी ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे.
274-6
हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते ॥274॥
हे असो. ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तेथे अनाहत नाद सुरु होतो.
275-6
शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥275॥
कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञानरुप चैत्यन्य, त्या साक्षीचैत्यन्याच तो अनाहत शब्द किंचित ऐकलेला असतो.

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *