सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४५१ ते १४७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , ,

1451-18
हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥1451॥
हें असो, ही कांडत्रयाचे सार जी गीतारूप श्रुति, ती, सर्व साधनांचा हेतु. मोक्ष रूप जे अखेरचे फल तें जीवांनीं अवश्य प्राप्त करून घ्यावे अशी गर्जना करून सांगतें. 51
1452-18
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं । वैर करी जो प्रतिदिवशीं । तो अज्ञानवर्ग षोडशीं । प्रतिपादिजे ॥1452॥
त्या मोक्षाचे अंतिम साधन जें ज्ञान त्याच्याशीं प्रत्यहीं शत्रुत्व करणारा जो अज्ञानवर्ग त्याचे सोळाव्या अध्यायांत प्रतिपादन केले. 52
1453-18
तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा । हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥1453॥
शास्त्राच्या सहाय्याने तो अज्ञानशत्रू जीवांनी जिंकावा असा त्यांना सतराव्या अध्यायांत गीतेचा आदेश आहे. 53
1454-18
ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी । आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवें ॥1454॥
पहिल्या अध्यायापासून तों सतराव्याच्या अंतापर्यंत देवांनी, आत्मनिःश्वासरूपी जो वेद त्याचे मनोगत विशद करून गीतेत दर्शविलें. 54
1455-18
तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका । तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥1455॥
या सतराही अध्यायांतील सर्व अर्थाच्या तात्पर्याच ज्यांत विचार केला आहे तो हा अठरावा अध्याय होय; तो गीताशास्त्र समाप्तीचा अध्याय असल्यामुळे त्याला कलशाध्याय अशी अलंकारिक संज्ञा आहे 55

1456-18
एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु । हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण ॥1456॥
ह्याप्रमाणे, सातशे पद्य (श्लोक) संख्येने युक्त असलेला हा गीताप्रबंध म्हणजे अधिक औदार्यसंपन्न होऊन अवतरलेला मूर्तीमंत वेदच होय. 56
1457-18
वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं । जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ॥1457॥
वेद गर्भश्रीमंत तर खराच; पण त्याच्याइतका कृपणही दुसरा कोण नाही कारण त्याने आपल्या संपन्नतेचा साक्षात् उपभोग घेण्याचा अधिकार तीन वर्णांनाच दिला आहे. 57
1458-18
येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां । अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ॥1458॥
(तीन वर्षे सोडून राहिलेले) जे । संसारदुःखपीडित इतर स्त्रीशूद्रादिक प्राणी, त्यांना माझ्या उपदेशाचा अधिकार नाही असा निर्बंध घालून तो स्वस्थ आहे. 58
1459-18
तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें । वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥1459॥
महाराज म्हणतात- मला वाटते, हा मागील दोष धुवून टाकावा म्हणून, वाटेल त्याने आपली सेवा करावी असे वेषांतर करून, वेद गीतेच्या रूपाने अवतरला आहे.59
1460-18
ना हे अर्थु रिगोनि मनीं । श्रवणें लागोनि कानीं । जपमिषें वदनीं । वसोनियां ॥1460॥
इतकेच नव्हें; तर अर्थद्वारा मनांत प्रवेश करून, श्रवणरूपाने कर्णात शिरून व जपाच्या मिषानें वाणींत राहून- 1460

1461-18
ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणें । गीता लिहोनि वाहाणें । पुस्तकमिषें ॥1461॥
किंवा जो गीता पाठ करितो, (पठण) किंवा जो त्या पाठकाच्या संगतींत असतो, अथवा जो गीताग्रंथ लिहून बाळगतो वा इतरांस अर्पण करतो. 61
1462-18
ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा । गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥1462॥
वेदाने अशा अनेक मिषांनीं, भर संसाराच्या बाजारात मोक्षसुखाचे सत्र उघडले आहे. 62
1463-18
परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया । रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥1463॥
परंतु, अंतरिक्षांत संचार करणे, पृथ्वीवर बसणे अथवा सूर्यकिरणांनीं प्रकाशन करणे ह्या सर्वांना आकाशाचा जसा सारखाच आधार असतो. 63
1464-18
तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे । कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥1464॥
त्याप्रमाणे आपली सेवा करणारा मध्ये, उत्तम, अधम, असा भेदाभेद न करिता, गीता सर्वांना सारखेच कैवल्यदान करून शांत करिते. 64
1465-18
यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं । रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला ॥1465॥
म्हणून, आपल्या मागील निंदेला भिऊन वेदाने गीतेच्या उदरात प्रवेश केला (व तिच्याद्वारें सर्वांशी संवाद केला).त्यामुळे, आतां मात्र त्याच धवल कीर्ति झाली आहे. 65

1466-18
म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता । श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली ॥1466॥
म्हणून, वेदाच्या उत्तम सेवेचे फल देणारी अशी ही मूर्तीमंत गीता भगवान श्रीकृष्णांनी पंडुसुत अर्जुनास उपदेशिली. 66
1467-18
परी वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें । जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥1467॥
परंतु वत्साच्या स्नेहाने गाईने दिलेल्या दुधाने जसे घरादाराला सुकाळ दुभते होते,त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेल्या गीतेने सर्व जगाचा उद्धार झाला. 67
1468-18
चातकाचियें कणवें । मेघु पाणियेसिं धांवे । तेथ चराचर आघवें । निवालें जेवीं ॥1468॥
चातका विषयींच्या दयेनें मेघ जलासह धांव घेतो, त्यात चराचर जगताची जशी सहजच शान्ति होते. 68
1469-18
कां अनन्यगतिकमळा- । लागीं सूर्य ये वेळोवेळां । कीं सुखिया होईजे डोळां । त्रिभुवनींचा ॥1469॥
किंवा अनन्यशरण असलेल्या कमलां करिता सूर्य रोज उदय पावतो, त्याने जगांतील सर्व दृष्टींना सहजच सुख होतें 69
1470-18
तैसें अर्जुनाचेनि व्याजें । गीता प्रकाशूनि श्रीराजें । संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें ॥1470॥
त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनीं गीता प्रकट करून, जगांतील सर्व लोकांच्या शिरावरील संसारासारखें थोर ओझे दूर देणारा केले. 1470

1471-18
सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं । सूर्यु नव्हें लक्ष्मीपती । वक्त्राकाशींचा ॥1471॥
सर्व शास्त्ररूपी रत्नांच्या एकत्रित झालेल्या तेजाप्रमाणे त्रैलोक्याला प्रकाश देणाराहा गीता ग्रंथ म्हणजे भगवान् लक्ष्मीपतींच्या मुखाकाशातील सूर्यच म्हणू नये काय? 71
1472-18
बाप कुळ तें पवित्र । जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र । जेणें गीता केलें शास्त्र । आवारु जगा ॥1472॥
धन्य ते पवित्र कुल की ज्यांत, जन्माला आलेला पार्थ, अशा ज्ञानाचा अधिकारी होऊन त्याच्याकरितां निर्माण झालेले गीताशास्त्र हें साऱ्या जगाचे रक्षणकर्ता झाले ! 72
1473-18
हें असो मग तेणें । सद्गुरु श्रीकृष्णें । पार्थाचें मिसळणें । आणिलें द्वैता ॥1473॥
हें असो; मग सद्गुरू श्रीकृष्णांनी आपल्याशी एकरूप होणाऱ्या पार्थाला पुन्हां भानावर आणिलें. 73
1474-18
पाठीं म्हणतसे पांडवा । शास्त्र हें मानलें कीं जीवा । तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥1474॥
आणि म्हणाले, अर्जुना, माझा उपदेश पटला ना? तेव्हां अर्जुनाने उत्तर दिले देवा, हो, देवा, हें सारे आपल्या कृपेचे फळ. 74
1475-18
तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया । परी जोडिलें भोगावया । विपायें होय ॥1475॥
अर्जुना, ऐश्वर्यप्राप्तीचे भाग्यही कोठे कोठे दिसते, पण जोडलेल्या ऐश्वर्याचा त्याला भोग घडावा असे भाग्य क्वचितच असतें. 75

, , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *