सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

501-18
तरी बाहेरीलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही । उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये ॥501॥
तर नेत्रादि दहाही बाह्येन्द्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावतो; 501
502-18
मग तो इंद्रियकदंबु । करविजे तंव राबु । जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥502॥
नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवितो, की जोपर्यंत कर्माचे फळ हाती आले नाही! 502
503-18
ना तें कर्तव्य जरी दुःखें । फळेल ऐसें देखे । तो लावी त्यागमुखें । तियें दाहाही ॥503॥
किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले, तर त्या कर्माचा त्याग करण्याकरिता त्या दहाही इंद्रियांची योजना करितो. 503
504-18
मग फिटे दुःखाचा ठावो । तंव राहाटवी रात्रिदिवो । विकणवातें कां रावो । जयापरी ॥504॥
मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरिता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करतो. 504
505-18
तैसेनि त्याग स्वीकारीं । वाहातां इंद्रियांची धुरी । ज्ञातयातें अवधारीं । कर्ता म्हणिपे ॥505॥
अशाप्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरिता इंद्रियांचे पुढारीपण ज्ञात्याने घेतले, म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात; 505

506-18
आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं । आउतांचिया परी क्षमी । म्हणौनि इंद्रियांतें आम्ही । करणें म्हणों ॥506॥
आणि कर्ता हा कर्म करण्याकरिता आऊता प्रमाणे सर्व इंद्रियांना खपवतो. म्हणून आम्ही त्यास करणे म्हणजे क्रियेची साधने असे म्हणतो.
507-18
आणि हेचि करणेंवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे तें अवधारीं । कर्म एथ ॥507॥
आणि हे करण्याकरीता कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो, त्यांनी जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो. 507
508-18
सोनाराचिया बुद्धि लेणें । व्यापे चंद्रकरीं चांदणें । कां व्यापे वेल्हाळपणें । वेली जैसी ॥508॥
सोनाराच्या बुद्धीने जसे दागिने व्यापिले जातात, चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो, 508
509-18
नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हें असो अवकाशु । आकाशीं जैसा ॥509॥
अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो, हे असो, अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते, 509
510-18
तैसें कर्तयाचिया क्रिया । व्यापलें जें धनंजया । तें कर्म गा बोलावया । आन नाहीं ॥510॥
तसे अर्जुना, कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय यात शंका नाही. 510

511-18
एवं कर्म कर्ता करण । या तिहींचेंही लक्षण । सांगितलें तुज विचक्षण- । शिरोमणी ॥511॥
याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व करण या तिघांची लक्षणे सांगितली. 511
512-18
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हें कर्माचें प्रवृत्तित्रय । तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥512॥
तर ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी कर्मप्रवृत्ती कारक आहे. तसेच कर्ता, करण व कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय आहे. 512
513-18
वन्हीं ठेविला असे धूमु । आथी बीजीं जेवीं द्रुमु । कां मनीं जोडे कामु । सदा जैसा ॥513॥
विस्तवात जसा धूर ठेवलेलाच असतो, अथवा मनात जशी नेहमीच इच्छा असते, 513
514-18
तैसा कर्ता क्रिया करणीं । कर्माचें आहे जिंतवणीं । सोनें जैसें खाणी । सुवर्णाचिये ॥514॥
आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते- तसा कर्ता क्रिया व करणे(इंद्रिये) ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच (उत्पत्तिस्थानच) आहे. म्हणून 514
515-18
म्हणौनि हें कार्य मी कर्ता । ऐसें आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासीं ॥515॥
हे पंडुसुता, अमुक कार्याचा मी कर्ता, जसा जीवाने कर्तेपणा धारण केला, म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा या सर्व क्रियापासून दूर असतो.515

516-18
यालागीं पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आतां असो हे किती । जाणतासि तूं ॥516॥
यास्तव हे सुभते, कर्मापासून आत्मा वेगळाच आहे, हे तुला वारंवार काय सांगावे? कारण हे तू जाणतच आहेस.516
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसण्‌ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥18.19॥
517-18
परी सांगितलें जें ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न । गुणीं आहाती ॥517॥
पण तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून सांगितले, ती तिन्ही गुणांनी निरनिराळी आहेत. 517
518-17
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥518॥
म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नको. कारण यातील रज व तम या दोन गुणांपासून मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्त्वगुणच सुटका करण्यास समर्थ आहे.518
519-18
तें सात्विक ठाऊवें होये । तो गुणभेदु सांगों पाहे । जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला ॥519॥
तो सात्त्विक गुणांचा भेद ज्याविषयी संख्याशास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असा सांगतो. 519
520-18
जें विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसां नरेंद्र । शास्त्रांचा जें ॥520॥
जे संख्यशास्त्र विचाररूपी क्षीर समुद्रच आहे, आत्मबोधरुपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान उत्पन्न करणारे शास्त्रात श्रेष्ठ आहे.520

521-18
कीं प्रकृतिपुरुष दोनी । मिसळलीं दिवोरजनीं । तियें निवडितां त्रिभुवनीं । मार्तंडु जें ॥521॥
किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही दिवस व रात्र याप्रमाणे अहर्निश एकमेकांत मिसळली आहेत. त्यांना पृथक करून दाखविणारा या त्रिभुवनात सूर्यच आहे.521
522-18
जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापीं चोविसीं । उगाणा घेऊनि परेशीं । सुरवाडिजे ॥522॥
जे अपार अशा मोहाचा चोवीस तत्त्वांनी ठाव घेऊन परतत्त्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगावयास लावते. 522
523-18
अर्जुना तें सांख्यशास्त्र । पढे जयाचें स्तोत्र । तें गुणभेदचरित्र । ऐसें आहे ॥523॥
अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र, ते ज्या गुणांचे स्तवन करिते, त्यात तीन गुणांचे वर्णन असे आहे.523
524-18
जे आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें । दृश्यजात तितुकें । अंकित केलें ॥524॥
या गुणांनी आपल्या बळाने तीन प्रकारचे शिक्के देऊन द्रव्यपदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत, 524
525-18
एवं सत्वरजतमा । तिहींची एवढी असे महिमा । जें त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी ॥525॥
याप्रमाणे सत्व, रज व तम या तीन गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की, त्यांनी ब्रह्मदेवापासून किटका पर्यंत तीन भेद केले आहेत.525

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading