सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३७६ ते १४०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

1376-18
कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु । तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥1376॥
अंशतः सूर्यप्रकाशानेही कमलवने विकसित होतात पण तो त्यांना आपला सर्वच प्रकाश नित्य देतो. 76
1377-18
पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर । वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं ॥1377॥
पृथ्वी शांत होऊन समुद्रही भरतील इतकी अफाट; वृष्टी मेघ करितात खरे पण त्याचे निमित्त अनन्यशरण चातकाची तृषा हरण करणें असते. 77
1378-18
म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया । प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥1378॥
त्याच न्यायाने, हे दानशूर, दयानिधे देवा, तुझ्या ज्ञानदानरूपी औदार्याला नाही म्हणावयास मी निमित्त झालों हे खरे, पण त्यांत सर्व जगाचे कल्याण अगर उद्धार आपण केला; 78
1379-18
तंव देवो म्हणती राहें । या बोलाचा प्रस्तावो नोहे । पैं मातें पावसी उपायें । साचचि येणें ॥1379॥
तेव्हां देव म्हणाले, अर्जुना, आतां ही प्रस्तावना राहु दे; ( आपण मूळ गोष्टीवर येऊ) हें पहा; ह्या उपायानें तू मला निश्चयैकरून येऊन मिळशील. 79
1380-18
सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया । तेणें विरेचि कीं उरावया । कारण कायी? ॥1380॥
अर्जुन, ज्याक्षणीं मिठाचा खडा पाण्यांत पडतो त्याच क्षणीं तो विरतोच; वेगळे रहाण्याचे कारणच काय? 1380

1381-18
तैसें सर्वत्र मातें भजतां । सर्व मी होतां अहंता । निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी ॥1381॥
त्याप्रमाणे, सर्वत्र असलेली माझी व्याप्ति जाणून भजन केले असतां व सर्व मीच आहे अशा दृष्टीचा उदय झाला असतां, अहंता निःशेष नाहीशी होऊन तू तत्त्वतः मद्रूपच होशील. 81
1382-18
एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारीं । दाविली तुज उजरी । उपायांची ॥1382॥
ह्याप्रमाणे कर्मापासून ब्रह्मात्म्यैक्यज्ञानपर्यंतचे माझ्या प्राप्तीचे सर्व उपाय तुला स्पष्ट करून सांगितले. 82
1383-18
जे आधीं तंव पंडुसुता । सर्व कर्में मज अर्पितां । सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥1383॥
थोडक्यांत असें-अर्जुना, प्रथम सर्व कर्म मला अर्पण करावी म्हणजे सर्वत्र माझी प्रसन्नता प्राप्त होते. 83
1384-18
पाठीं माझ्या इये प्रसादीं । माझें ज्ञान जाय सिद्धी । तेणें मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपीं माझ्या ॥1384॥
अशा प्रसन्नतेनंतर, मत्प्राप्त्यर्थं केलेला ज्ञानविचार सिद्धीस जाऊन, तो निश्चयेकरून मद्रूप होतो.84
1385-18
मग पार्था तिये ठायीं । साध्य साधन होय नाहीं । किंबहुना तुज कांहीं । उरेचि ना ॥1385॥
अशी स्थिति झाल्यावर, अर्जुना, साध्य-साधनादि व्यवहाराचा वाचा लोप होऊन, तुला कांहीही कर्तव्य उरणार नाही. 85

1386-18
तरी सर्व कर्में आपलीं । तुवां सर्वदा मज अर्पिलीं । तेणें प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥1386॥
पार्था, तुजवर मी जो आज प्रसन्न आलों आहे, त्याचे कारण, तू सर्वदा सर्वं कर्म मदर्पणबुद्धीनें केलींस. 86
1387-18
म्हणौनि येणें प्रसादबळें । नव्हे झुंजाचेनि आडळें । न ठाकेचि येकवेळे । भाळलों तुज ॥1387॥
म्हणून हा युद्धाचा प्रसंग आहे; आतांच नको; पुढे पाहुं; वगैरे कांहीही विचार न करितां मी ह्या प्रसादबळाने तुला भाळलों. (वश झालों) 87
1388-18
जेणें सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये । तें उपपत्तीचेनि उपायें । गीतारूप हें ॥1388॥
ज्यायोगे, कार्यासह अज्ञाननिवृत्ति होऊन अद्वितीय एक असा जो मी, त्या माझे आत्मत्वाने अपरोक्ष होईल, तें माझे गीतारूप ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी, 88
1389-18
मियां ज्ञान तुज आपुलें । नानापरी उपदेशिलें । येणें अज्ञानजात सांडी वियालें । धर्माधर्म जें ॥1389॥
मी तुला माझ्या आत्मज्ञानाचा नाना प्रकारें उपदेश केला; त्याने, जें धर्माधर्मादि व्यालें आहे अशा अज्ञानमात्राचा त्याग कर. 89
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥18.66॥
1390-18
आशा जैसी दुःखातें । व्यालीं निंदा दुरितें । हे असो जैसें दैन्यातें । दुर्भगत्व ॥1390॥
आशा दुःखाची, निंदा पापाची, किंवा हेअसो, दुर्दैव जशी दैन्याची जननी आहे,1390

1391-18
तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक । तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें ॥1391॥
याप्रमाणे, स्वर्गनरक प्राप्तीचीं साधने जे धर्माधर्म, त्यांची अज्ञान ही जननी आहे, त्याचा ह्या ज्ञानाने निःशेष नाश कर. 91
1392-18
हातीं घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु । कां निद्रात्यागें घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥1392॥
दोर हाती आल्यावर त्यावर पूर्वी भासलला सर्प जसा नष्ट होतो, किंवा जागे झाल्यावर स्वप्नांतील सर्व व्यवहार जसा लोपतो. 92
1393-18
नाना सांडिलेनि कवळें । चंद्रींचें धुये पिंवळें । व्याधित्यागें कडुवाळें- । पण मुखाचें ॥1393॥
कावीळ नाहींशी झाली, म्हणजे चंद्राच्या ठिकाणी दिसणारा पिवळेपण जसा नाहीसा होतो किंवा व्याधिनाशाने मुखाचा कडवटपणा जसा जातो; 93
1394-18
अगा दिवसा पाठीं देउनी । मृगजळ घापे त्यजुनी । कां काष्ठत्यागें वन्ही । त्यजिजे जैसा ॥1394॥
दिवस मावळतांच मृगजळ नाहीसे होते, किंवा काष्ठत्यागाने जस वन्हित्यागही केलासा होतो. 94
1395-18
तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ । तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात ॥1395॥
त्याप्रमाणे धर्माधर्माचा बाऊ वाटविणारे मूळ कारण जें अज्ञान, त्याचा त्याग करून सर्व धर्माधर्मापासून मुक्त हो. 95

1396-18
मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया । सनिद्र स्वप्न गेलया । आपणपें जैसें ॥1396॥
निद्रा दोषासह स्वप्ननाश झाल्यावर जसा आपला आपणच एकटा असतो, तसा अज्ञाननाशानंतर एकटा मीच आपोआप सहज उरतों 96
1397-18
तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं । सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥1397॥
एक माझ्या सत्तेवांचून, जगांत कोणत्याही पदार्थाला भिन्न किवा अभिन्नत्वाने नांदण्याइतकी स्वतंत्र सत्ता नाही, असें जें माझी सर्वव्यापक स्वरूप, त्याच्याशीं माझेही वस्तुतः तेच स्वरूप आहे अशा शुद्ध बोधाने अनन्य हो. (वेगळा उरू नको.) 97
1398-18
पैं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण । तयाचि नांव शरण । मज यीणें गा ॥1398॥
आपण स्वतः वेगळेपणाने न उरतां, सर्वत्र मीच एकटा एक आहें असें ज्याने नि:संदेहपणे जाणिलें, तोच एक, अर्जुना, मला खरा शरण झाला. 98
1399-18
जैसें घटाचेनि नाशें । गगनीं गगन प्रवेशे । मज शरण येणें तैसें । ऐक्य करी ॥1399॥
घट ह्या उपाधीच्या नाशाने, जसे घटाकाश जणू महाकाशांत प्रवेश करितें, त्याचप्रमाणे मला शरण येऊन माझ्याशी एकरूप हो. 99
1400-18
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥1400॥
सोन्याचा मणि जसा सोन्याशी व लाट जशी जलाशीं नित्य अनन्य असते, तसेच, अर्जुना, तुं मला शरण असावें.1400

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading