सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०२६ ते १०५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

1026-18
अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥1026॥
जठराग्नि शांत असला (क्षधा निवारण झाली) म्हणजे प्राणांचे रक्षण किंवा समाधान असतें इतक्याच बेताने त्याचा आहार असतो. 26
1027-18
आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या न मोकली । आसन तैसें ॥1027॥
(यतवाक्कायमानसः) आणि परपुरुषाने इच्छा दर्शविली असतां कुलवधू जशी त्यास केव्हांही वश होत नाही, तसें ज्याचें आसन (बैठक) निद्रा व आलस्य यांच्या केव्हांही ताब्यांत जात नाही. 27
1028-18
दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे । वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥1028॥
नमस्कार करण्याच्या प्रसंगींच (साष्टांग) ज्याचे शरीर भुईला लागतें; एऱ्हवी वाटेल त्या प्रसंगी अविचारानें जो कधीही आडवा होत नाही. 28
1029-18
देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें । किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ॥1029॥
देहधारण अथवा निर्वाह ह्यांना आवश्यक इतकाच हातापायांचा करितो किंबहुना कमेंद्रिये, मन आदि सर्व त्याने स्वाधीन ठेविली आहेत. 29
1030-18
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा । तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे? ॥1030॥
आणि अर्जुना, ज्याच्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतही (हद्दीपर्यंतही) येण्याची बोली नाही, (सोय) तेथे बोलणे चालणे वगैरे व्यापारांन अवकाश कोठचा असणार? 1030

1031-18
ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश । आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ॥1031॥
(ध्यान) अशाप्रकारें शरीर, वाचा व मन ह्यांच्या बाह्य व्यापारांस जिंकून ज्यानें ध्यान आपल्या स्वाधीन करून घेतले. 31
1032-18
गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला । न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा ॥1032॥
गुरुवाक्योपदेशाने झालेला आत्मनिश्चय, आरशांत मुख पहावें त्याप्रमाणे, त्यांच्याच बोधवाक्यरूप आरशांत पडताळून पहातो. 32
1033-18
पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं । ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ॥1033॥
ध्यान करणारा आपणच असूनही आपल्या ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येयत्वाने आपल्याच पुढे घेतो, असा त्याच्या ध्यानाचा प्रकार असतो. 33
1034-18
तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता । होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ॥1034॥
तें ध्यान अर्जुना, ध्याता, ध्यान आणि ध्येय ह्या त्रिपुटीचा लय होऊन त्यांना एकरूपता येईतोपर्यंत ते करावें लागत. 34
1035-18
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु । परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥1035॥
(योगपरः) म्हणून (अशाप्रकारच्या ध्यानसिद्धीसाठीं) तो आत्मज्ञाना विषयीं दक्ष असणारा मुमुक्षु योगाभ्यासाचा आश्रय करितो. 35

1036-18
अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया । पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ ॥1036॥
अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य, टांचेने दाबून मूळबंध करितो. 36
1037-18
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायुभेदी ॥1037॥
अधोभाग आकुंचन करून, व मूळबंधादि तिन्हीं बध देऊन, आणि प्राणापानादि निरनिराळे वायु एकत्र करून, 37
1038-18
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥1038॥
कुंडलिनी जागी करून, सुषुम्ना नाडीचा विकास करून, आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून ऊर्ध्व जातो 38
1039-18
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनियां ॥1039॥
मग ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलरूपी मेघांपासून अमृतवृष्टि होते, तो अमृतवर्षाव मूलाधारचक्रापर्यंत आणून, 39
1040-18
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं । मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां ॥1040॥
आज्ञाचक्ररूपी पर्वतावर संचार करणाच्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रांत मन व प्राण ह्यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून. 1040

1041-18
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां । ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ॥1041॥
अशाप्रकारे हा योगसाधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्यायोगे ध्यान निश्चित करितो. 41
1042-18
आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्वज्ञानीं । पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ॥1042॥
(वैराग्य) आणि ध्यान योग हे दोन्ही निविघ्नपणें आत्मतत्त्वज्ञानाच्या ठिकाणीं प्राप्त होण्याच्या अगोदर, 42
1034-18
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले ॥1043॥
जो वैराग्यासारखा मित्र जोडून ठेविला असतो तो सर्व भूमिकांवर साधकाचा सांगाती असतो. 43
1044-18
पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी । तरी कें आहे अवसरी । देखावया ॥1044॥
पहावयाची असलेली वस्तु दिसेपर्यंत जर दिव्याचे सहाय्य असेल तर ती वस्तु प्राप्त होण्यास कितीसा अवकाश लागणार? 44
1045-18
तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया । तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥1045॥
त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करणाच्या साधकाची वृत्ति ब्रह्मवस्तूमध्ये लय पावेपर्यंत तिला वैराग्याची जोड असेल, तर त्याच्या मोक्षप्राप्तीला प्रतिबंध कसला? 45

1046-18
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥1046॥
म्हणून, जो भाग्यवान् वैराग्यासह ज्ञानाभ्यासाला लागला, तो आत्मलाभाला योग्य होतो. 46
1047-18
ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं । राजयोगतुरंगीं । आरूढला ॥1047॥
असें वैराग्याचे मजबूत कवच अंगावर घेऊन जो राजयोगरूपी अश्वावर आरोहण करितो. 47
1048-18
वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी । तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ॥1048॥
शिवाय, जें दृश्य दृष्टीस पडेल, त्यांतील लहान,थोर असा भेद निवारण करण्यासाठी विवेकरूप मुष्टींत ध्यानरूप तीक्ष्ण खड्ग घेतो. 48
1049-18
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु । मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं ॥1049॥
ह्याप्रमाणे, अंधकारांत जसा सूर्याने प्रवेश करावा, तसा मोक्षरूपी विजयश्रीला माळ घालण्यासाठी हा साधक संसाररूपी रणांगणांत (निःशंक) प्रवेश करितो. 49
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥18.53॥

1050-18
तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले । तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु ॥1050॥
(अहंकार) तो अशा विश्वासाने चालला असतां, त्याला अडविण्यासाठी जे दोषरूप शत्रू मध्ये आले, त्यांचा त्याने समाचार घेतला; त्यांतील पहिला वैरी देहाहंकार हा होय. 1050

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading