26-5
एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥26॥
एरव्ही तरी अर्जुना, जे विचाराने पूर्णपणे अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग व कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणू शकतील??
27-5
सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी दीपाप्रती काई अनान । प्रकाशु आहाती ॥27॥
ते स्वभावतः मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय वेगवेगळा असतो काय.??
28-5
पैं सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें । ते दोन्हीतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥28॥
परंतु दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाच्या साधनेत ज्यांनी परब्रह्मचा अनुभव घेतला आहे, ते लोक फलाच्या दृष्टीने दोन्ही मार्गांना एकच मानतात.
यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति॥5.5॥
भावार्थ :- सांख्यमार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते, तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्ययोग आणि कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय.
29-5
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें । इयापरी ॥29॥
सांख्ययोगापासून जे फल प्राप्त होते, तेच कर्मयोगापासून होते; म्हणून या दोघांची अशा प्रकारे सहजच एकरूपता आहे.
30-5
देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसे ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥30॥
असे पाहा की, आकाश आणि पोकळी यांत जसा भेद नाही, तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांमध्ये भेद नाही, हे ज्याला पटलेले असते,
31-5
तयासीचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥31॥
ज्याने सांख्ययोग आणि कर्मयोग यामध्ये काही भिन्न भाव नाही, हे जाणले, त्याला ह्या जगतामध्ये ज्ञानसुर्याचा प्रकाश दिसतो आणि त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिच्छति॥5.6॥
भावार्थ :- हे अर्जुना ! निष्काम कर्मयोगाखेरीज संन्यास घेणे म्हणजे मन, इंद्रिय व शरीर यांना होणाऱ्या सर्व कर्माच्या कर्तेपणाच्या त्याग करणे. हे कठीण आहे; परंतु ईश्वराच्या स्वरूपाचे सदैव मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रम्हाला त्वरित प्राप्त करून घेतो.
32-5
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥32॥
जो निष्काम कर्म करण्याच्या युक्तीने मोक्षरूपी पर्वतावर चढतो, तो आनंदरूपी शिखर त्वरेने प्राप्त करून घेतो.
33-5
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥33॥
जो आपले अंतःकरण शुद्ध न करता कर्मयोगाचा त्याग करतो, तो व्यर्थच संन्यासी बनण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधी होत नाही.
योगयुक्तो विशुध्दात्मा विजितात्मा जितेद्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते॥5.7॥
भावार्थ :- जो निष्काम कर्मयोगी आहे, ज्याचे चित्त पवित्र आहे, ज्याने मन ताब्यात ठेवले आहे, ज्याने इंद्रिय जिंकली आहेत आणि भूतमात्रांचा ठिकाणी समानरूप असणाऱ्या आत्मतत्वाशी ज्याच्या आत्म्याचे ऐक्य झाले आहे, असा पुरुष कर्म करीत असूनही त्या कर्माने बध्द होत नाही.
34-5
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरुपीं घातलें । हारौनियां ॥34॥
ज्याने सर्व प्रकारच्या भ्रमापासून हिरावून घेतलेले मन सद्गुरुंच्या उपदेशाने शुद्ध केले आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले,
35-5
जैसें समुद्रीं लवण न पडे । तवं वेगळे अल्प आवडे । मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥35॥
जोपर्यँत समुद्रात मीठ पडले नाही, तोपर्यन्त समुद्रपेक्षा भिन्न व अल्प वाटत असते. एकदा का ते मीठ समुद्रात पडले, की ते समुद्राएवढे होते.
36-5
तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परि व्यापिलें । लोकत्रय ॥36॥
त्याप्रमाणे ज्याने आपल्या मनातील सर्व प्रकारचे भ्रम काढले आहेत, ज्याचे मन चैतन्यस्वरूप झाले आहे, तो पुरुष देहाने परिच्छिन्न असला, तरी त्याने तिन्ही लोक व्यापलेले असतात.
37-5
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्ही अकर्ता तो ॥37॥
मी कर्ता आहे, मी कर्म करतो, हा त्याचा स्वभाव नाहीसा झालेला असतो आणि त्याने सर्व कर्मे जरी केली, तरी तो अकर्ता असतो.
नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्वचित् ।
पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्॥5.8॥
प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि ।
इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्॥5.9॥
भावार्थ :- पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांची उघडझाप करीत असता, विषयांची ठिकाणी इंद्रयांची प्रवृत्ती असते, असे लक्षात आणून खरे स्वरूप जाणणाऱ्या कर्मयोग्याने “मी काही करीत नाही” असे लक्षात ठेवावे. (असेच निःसंदेह मानत असतो). ॥8॥9॥
38-5
जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगे ॥38॥
त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या मनात/देहात मी पणाची आठवण नसते, तर मग कर्तृत्वाचा अहंकार कसा राहील, हे तूच सांग.
मी म्हणजे देह अशी आठवनच नसते, तर मग कर्तेपणा कसा बरे राहील?
39-5
ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥39॥
याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाच्या ठिकाणी अमूर्त ब्रम्हाचे सर्व गुण दिसून /अनुभवास येतात.
40-5
एऱ्हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥40॥
एरव्ही इतर सर्व सामान्य माणसाप्रमाणे तोही शरीरधारी दिसतो आणि सर्व व्यवहार करीत असलेला दिसतो.
41-5
तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥41॥
इतर सर्व लोकांप्रमाणे तोही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो; पण त्याकर्माचा मी कर्ता आहे, असे त्याला मुळीच वाटतं नाही, हे आश्चर्य आहे.
42-5
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥42॥
त्याला स्पर्श कळत असतो, नाकाने तो गंधाचा अनुभव घेत असतो, तसेच प्रसंगप्रमाणे तो बोलतही असतो.
43-5
आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरि । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥43॥
तो आहाराचे सेवन करत असतो, जे त्यागावयाचे आहे ते तो त्यागतो, झोपेच्या वेळी सुखाने शांत झोप घेतो
44-5
आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥44॥
तो आपल्या इच्छेप्रमाणे चालत असतो, अशा प्रकारे तो सर्व कर्मे करत असतो.
45-5
हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि ॥45॥
हे एकेक काय सांगावे? पाहा, श्वास घेणे व सोडणे आणि डोळ्यांची उघडझाप करणे वगैरे सर्व कर्मे करतो
46-5
पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं । परि तो कर्ता नव्हे कांही । प्रतीतिबळें ॥46॥
हे पार्था ! ही सर्वच कर्मे तो करत असतो; परंतु आत्मज्ञानमुळे या सर्व कर्माचा कर्ता मात्र तो होत नाही.
47-5
जैं भ्रांती सेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला । मग तो ज्ञानोदयी चेइला । म्हणोनियां ॥47॥
जेंव्हा तो भ्रमाचा शय्येवर (भ्रांतिरुपी अंथरून) झोपी गेलेला असतो, तेंव्हा स्वप्नांच्या सुखाने भुलला होता, परंतु आत्मज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो आपणास कर्माचा कर्ता मानत नाही.
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भ्सा॥5.10॥
भावार्थ :- जो ईश्वराच्या चरणी सर्व कर्मे अर्पण करून फळाची इच्छा न करता कर्म करीत राहतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो पापापासून अलिप्त असतो.
48-5
आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥48॥
अधिष्ठान म्हणजे देहाच्या संगतीने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात.
49-5
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे । देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥49॥
दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे, घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात, त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरला, तरी योगयुक्ताची सर्व कर्मे देहात सुरु असतात.
50-5
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिपें जळीं जळें । पद्मपत्र॥50॥
ज्याप्रमाणे कमळाचे पान सदैव पाण्यात असूनदेखील ते पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे सदैव करून देखील कर्मबंधाने बध्द होत नाही.
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्त्वात्मशुद्धये॥5.11॥
भावार्थ :- निष्काम कर्मयोगी आसक्तीचा त्याग करून केवळ इंद्रिय, शरीर, मन, आणि बुद्धीने अंतः करणाच्या शुद्धीसाठी कर्म करीत असतात.