सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , ,

अध्याय दुसरा
संजय उवाच :
तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुव मधुसूदनः॥2.1॥
भावार्थ
:- संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले.॥1॥
1-2
मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥1॥
(अर्जुनाची शोक-अवस्था) मग संजय धृतराष्टरास म्हणाला, ऐका. महाराज तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला.
2-2
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥2॥
तो आपल्या कुळातील सर्वाना पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर,
3-2
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥3॥
ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्याने मेघ हालतात, (नाहीसे होतात) त्याप्रमाणे अर्जुन धैर्यवान,(खंबीर) असून देखील त्याचे ह्रदय त्या वेळी करुणेने द्रवले.
4-2
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥4॥
म्हणून व्याकुळ झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेला होता.
5-2
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरु । देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥5॥
पंडूचा पुत्र अर्जुन अतिमोहाने असा ग्रस्त झालेला पाहून शारंगधार (भगवान श्रीकृष्णा) काय म्हणाले, ते ऐका..
श्रीभगवानुवाच :
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥2.2॥

भावार्थ :- भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ” हे अर्जुना ! श्रेष्ठ लोकांनां अमान्य, स्वर्गप्राप्ती साठी विघ्न करणारा (आड येणारा), असलेली किर्ती नाहीशी (घालविणारा) हा मोह तुझ्या मनात यां युधाच्या वेळी कोठून उद्भवला. (निर्माण झाला)

6-2
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥6॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना !, ह्या ठिकाणी असे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस, आणि काय करीत आहेस, याचा आगोदर (प्रारंभी) विचार कर.
7-2
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिस ॥7॥
( हे पार्थ ! )सांग, तुला काय झाले आहे ? कोणता कमीपणा आला आहे (कमी पडले) ? तुझे काय करायचे राहिले ? एव्हडा खेद कशाकरिता ??
8-2
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी । तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे॥8॥
तु अनुचित गोष्टीकडे लक्ष देत नाहीस; कधीही आपले (धैर्य) धीर सोडत नाहीस; आणि केवळ (अर्जूना) तुझ्या नावाचा उच्चारानेच अपयश दाही दिशांच्या पलीकडे निघून जाते.
9-2
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥9॥
तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. आणि तूझ्या शौर्याचा डंका (दबदबा) तर तिन्ही लोकांत (त्रैलोक्यात) गाजत आहे.
10-2
तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥10॥
तू युद्धामध्ये श्रीशंकरांनाही जिंकले आहेस. निवातकवचांचा ठावठिकाणा नाहीसा केलास; गंधर्वांनी पोवाडे गायिले.

11-2
हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥11॥
हे अर्जुना ! तुझ्या पराक्रमाचा विचार केला असता, हे त्रैलोक्यही लहान वाटते. असा तुझा पराक्रम उत्कृष्ट आहे.
12-2
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥12॥
(पण) तोच तू, आज या ठिकाणी (रणांगणात) आपली वीरवृत्ती टाकून, खाली मान घालून रडत बसला आहेस. !!
13-2
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु । सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥13॥
विचार कर, अर्जुना ! करुणेने तुला दीन करून सोडावे ! तूच सांग बरें, अंधकाराने सूर्याला कधी गिळले आहे काय??
14-2
ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे । पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥14॥
वारा कधी मेघाला घाबरला आहे का?? अमृताला कधी मरण आहे का? अरे विचार कर, लाकडाने कधी अग्नीला गिळून टाकले आहे का?
15-2
की लवणेंचि जळ विरे। संसर्गें काळकूट मरे । सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥15॥
किंवा मिठाने पाणी कधी विरघळेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूठ वीष मरेल का? तूच सांग !! बेडूक कधी महासर्पाला गिळील का?

16-2
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥16॥
कोल्हा स्वतःहून सिंहा बरोबर झोंबी (लढाई, युद्ध) करील का?? अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाले आहेत का? पण तू मात्र (अघटित गोष्ट) अश्यक्य गोष्ट शक्य करून दाखविलास.
17-2
म्हणोनि अझुनि अर्जुना। झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥17॥
म्हणून हे अर्जूना ! अजून तरी या अनुचित (हीन) गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, तू लवकर मनाला धीर दे आणि सावध हो.
18-2
सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥18॥
आता हा वेडेपणा सोडून दे, उठ, धनुष्यबाण हाती घे, कारण या युद्धाच्या प्रसंगी (रणभूमीवर तुझ्या) करूणेचा काय उपयोग.?
19-2
हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता । सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी॥19॥
हे अर्जूना !!, तू जाणता आहेस; तर आत्ता विचार करून का पाहत नाहीस? युद्धप्रसंगी क्षत्रिया कारुण्य (दया करणे हा गुण) योग्य आहे का तूच सांग बरें?
20-2
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें॥20॥
भगवान श्रीकृष्ण(जगन्निवास) अर्जुनास म्हणाले, हे युद्धाच्या प्रसंगीचे (दयाळूपणा) कारुण्य तुझ्या आजपर्यंतच्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकाला मुकविणारे आहे.
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप॥2.3॥

भावार्थ ::-हे पार्था ! हा दुबळेपणा धरू नकोस; हे तुला शोभत नाही. असा मनाचा क्षुद्र ढिलेपणा (दुर्बलपणा) टाकून देऊन, हे अर्जुना, युद्धासाठी उठ. ॥3॥

21-2
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं । हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥21॥
म्हणून हे अर्जुना ! तू शोक करू नकोस.पूर्ण धीर धर. खेदाचा त्याग कर. ॥21॥
22-2
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥22॥
तुला असा खेद करणे शोभा देत नाही.आज पर्यंत जी मोठी किर्ती तू संपादित केलीस, त्याचा यामुळें नाश होईल. म्हणून अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर. ॥22॥
23-2
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज? ॥23॥
या युद्धप्रसंगी (संग्रमाच्या) प्रसंगी तुझा हा कृपाळूपणा (दयाळूपणा) काहींच कामाचा (उपयोगाचा)नाही. हे (कौरावांना उद्देशून) आत्ताच तुझे सोयरे(नातलग) झाले काय?? ॥23॥
24-2
तूं आधींचि काय नेणसी? । कीं हे गोत्रज नोळखसी? । वायांचि काय करिसी । अतिशो आतां? ॥24॥
(हे अर्जुना !), हे तुझे नातलग (आप्तजन,गोत्रज) आहेत, तू येथे येण्यापूर्वी जाणत नव्हतास काय? या भाऊबंधीची (संबंधाची) तुला ओळख नव्हती का? तर आताच या तुझ्या (दयाळू) करुणेचा अतिरेक का बरे करतोस? ॥24॥
25-2
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज? । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥25॥
आजचा हा युद्धप्रसंग तुला जन्मल्यापासून नवीनच आहे काय? कारण यापूर्वी देखील तुम्हां दोघांमध्ये (कौरव आणि पांडव) युद्ध करण्याची निमित्ते अनेक वेळा

, , , ,

निर्माण झाली आहेत. ॥25॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *