सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

126-18
यया कर्म फळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं त्याग संन्यास तूतें । परीसविले ॥126॥
अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्मांचे फळांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष ‘त्याग’ असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगतील. ॥126॥
127-18
हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे । निषिद्ध तंव स्वभावें । निषेधें गेलें ॥127॥
या प्रमाणे जेंव्हा संन्यास घडतो, तेंव्हा काम्य कार्मापासून बाधा होवू शकत नाही. आणि निषिद्ध कर्म तर निषेधांच्या योगे स्वभावत:च नाहीसे होते; ॥127॥
128-18
आणि नित्यादिक जें असे । तें येणें फलत्यागें नसे । शिर लोटलिया जैसें । येर आंग ॥128॥
आणि ज्याप्रमाणे शीर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होवून खाली पडते, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा आता सांगितल्या रीतीने त्याग केला असता, त्यापासून बाधा होत नाही. ॥128॥
129-18
मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसीत । अपैसें ये ॥129॥
मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते, तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होवून शोधीत येते. ॥129॥
130-18
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं । पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु ॥130॥
अश्या युक्तीने नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलांचा त्याग व काम्यकर्मांचा संन्यास जे करतात, ते आत्मज्ञानाचे प्राप्तीला योग्य होतात. ॥130॥

131-18
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें । तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवींचि पडे ॥131॥
किंवा हि युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील तर, कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. ॥131॥
132-18
जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख । कां अन्न न मानितां भूक । मारी ना काय? ॥132॥
रोगाची चिकित्सा न करिता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते, अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर मरणार नाही काय? ॥132॥
133-18
म्हणौनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें । त्याज्यालागीं नोहावें । लोभापर ॥133॥
म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे, तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे, तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. ॥133॥
134-18
चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझें । न देखती सर्वत्र दुजें । वीतराग ते ॥134॥
त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधांत सापडतो, म्हून वैराग्यसंपन्न जे आहेत, ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करीत नाहीत. ॥134॥
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥18.3॥

135-18
एकां फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधकें । जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे ॥135॥
कित्येकांस फालाभिलाषा सोडवत नाही, म्हणून ‘कर्म बंध आहे.’ असे ते म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो. ॥135॥


136-18
कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया । आंगा न रुसे कोढिया । मासियां कोपे ॥136॥
किंवा हे धनजंया, जिव्हेचा अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो, आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो, किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुसता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागावतो, ॥136॥
137-18
तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णयो देती केवळ । त्यजावें ऐसा ॥137॥
त्याप्रमाणे कर्मफळत्यागाविषयी अशक्त आहेत म्हणून कर्मच वाईट असे ते म्हणतात आणि मग कर्मत्याग करवा असा सिद्धांत ठरवितात. ॥137॥
138-18
एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक । जे यावांचूनि शोधक । आन नसे ॥138॥
कोणी असे म्हणतात कि, यज्ञयागादी हे अवश्य केलेच पाहिजे, कारण त्यावाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही. ॥138॥
139-18
मनशुद्धीच्या मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं । तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे ॥139॥
जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल, तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. ॥139॥
140-18
भांगार आथी शोधावें । तरी आगी जेवी नुबगावें । कां दर्पणालागीं सांचावें । अधिक रज ॥140॥
सोनी शुध्द करावयाचे असेल, तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये, किंवा आरशात पहावयाचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून तो साफ करावा लागतो; ॥140॥

141-18
नाना वस्त्रें चोख होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं । तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥141॥
अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल, तर ती परटाच्या गलिच्छ सतेल्यात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये; ॥141॥
142-18
तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणौनि न न्यावीं अव्हेरें । कां अन्नलाभें अरुवारें । रांधितिये उणें ॥142॥
किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत, म्हणून त्यांची हेळसांड करू नये. ॥142॥
143-18
इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधिती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला ॥143॥
याप्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात; अशा प्रकारे कर्म त्यागाविषयी वाद पडला आहे, ॥143॥
144-18
तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसें बोलों गोमटें । अवधान देईं ॥144॥
तर ह्या वादाचा निकाल करून, कर्मचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रितीने सांगतो तिकडे लक्ष दे. ॥144॥
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥18.4॥
145-18
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभाग करूं ॥145॥
तर अर्जुना, असे पहा की, हा त्याग तीन प्रकारचा आहे समजलास? आता तिन्ही प्रकार निट वर्णन करून सांगतो; ॥145॥

146-18
त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर । तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण ॥146॥
त्यागाचे तीन प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्याचे तात्पर्य एव्हढेच आहे असे तु समज. ॥146॥
147-18
मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जें अलोट माने त्रिशुद्धी । निश्चयतत्व तें आधीं । अवधारीं पां ॥147॥
मज सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते, आणि ज्याविषयी माझे मनाचा निश्चय ठरला आहे, तो निश्चय कोणता तो एक. ॥147॥
148-18
तरी आपुलिये सोडवणें । जो मुमुक्षु जागों म्हणे । तया सर्वस्वें करणें । हेंचि एक ॥148॥
संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षु दक्ष असतो, त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे; त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा. ॥148॥
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥18.5॥
149-18
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्यकें । तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं ॥149॥
पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे (मार्ग चालण्याचे) सोडता कामा नये, त्याप्रमाणे, यज्ञ, दान व तप हि जी आवश्यक कर्मे ती सोडू नये. ॥149॥
150-18
हारपलें न देखिजे । तंव तयाचा मागु न सांडिजे । कां तृप्त न होतां न लोटिजे । भाणें जेवीं ॥150॥
हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा मार्ग सोडता येत नाही; अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही. ॥150॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading