सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४७६ ते १५०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1476-18
पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें । सुरां असुरां केवढें । मथितां जालें ॥1476॥
क्षीरसागराएवढं न विरजले जाणाऱ्या दुधाच्या भांडयाच्या मंथनाने देवांना व दैत्यांना कितीतरी श्रम पडले 76
1477-18
तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें । परी वरिचिली चुकलें । जतनेतें ॥1477॥
त्या श्रमांनाही फल आले; त्यांतून निघालेले अमृतही दृष्टीने पाहिले; पण ते जतन करण्याची दैत्यांची हातोटी चुकली. 77
1478-18
तेथ अमरत्वा वोगरिलें । तें मरणाचिलागीं जालें । भोगों नेणतां जोडलें । ऐसें आहे ॥1478॥
ज्याची अमर व्हावे म्हणून प्राप्ति करून घेतली तेच त्यांच्या मरणाला कारण झाले. भोग कसा घ्यावा हे ज्ञान नसलें म्हणजे असा विपरीत परिणाम होतो,78
1479-18
नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटीं भांबावला । तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी? ॥1479॥
नहुष स्वर्गाचा राजा झाला, पण राजेपणाची रहाटी माहित नसल्यामुळे तेथून च्युत होऊन सर्पत्व पावला, हें तुला माहीत नाही काय? 79
1480-18
म्हणौनि बहुत पुण्य तुवां । केलें तेणें धनंजया । आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥1480॥
अर्जुना, तुझी मागली फार मोठी पुण्याई! म्हणूनच सर्व शास्त्रांचा राजा जे गीताशास्त्र त्याचा तू आज अधिकारी झालास. 1480

1481-18
तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदायें पांघुरौनि । शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठीं हो ॥1481॥
तरी ह्याच शास्त्राचे संप्रदायपूर्वक निष्ठेने अनुष्ठान (विचार) कर हो ! 81
1482-18
येऱ्हवीं अमृतमंथना- । सारिखें होईल अर्जुना । जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेंवीण ॥1482॥
एऱ्हवी, अर्जुना, संप्रदाय सोडून जर तू अनुष्ठान करशील तरअमृतमंथनाची गति होईल हो ! 82
1483-18
गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी । जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥1483॥
अर्जुना, चांगली दुभती गाय मिळाली आहे खरी, पण तिचे दोहन करण्याची कला माहीत असेल तेव्हांच दुधाची प्राप्ति होणार. 83
1484-18
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे । परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ॥1484॥
त्याप्रमाणे श्रीगुरु प्रसन्न झाले. शिष्याला विद्याही प्राप्त झाली, तरी संप्रदायपूर्वक तिची उपासना घडेल तेव्हांच ती फलदायी होईल. 84
1485-18
म्हणौनि शास्त्रीं जो इये । उचितु संप्रदायो आहे । तो ऐक आतां बहुवें । आदरेंसीं ॥1485॥
म्हणून ह्या शास्त्राचा जो उचित संप्रदाय आहे, तो आतां बहुत आदरपूर्वक श्रवण कर. 85
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥18.67॥

1486-18
तरी तुवां हें जें पार्था । गीताशास्त्र लाधलें आस्था । तें तपोहीना सर्वथा । सांगावें ना हो ॥1486॥
तरी, पार्थ, तुझ्या आस्थेमुळे तुला प्राप्त झालेलें हें गीताशास्त्र, तें तपोहीन पुरुषाला तू मुळींच सांगू नको हो ! 86
1487-18
अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्तीं जो ढिला । तो वेदीं अंत्यजु वाळिळा । तैसा वाळीं ॥1487॥
अथवा एखादा तपी असूनही जर त्याची गुरुनिष्ठा यथातथाच असेल, तरीही, वेदानें अंत्यजाला अस्पृश्य म्हणून गणिलें आहे तसा तूही त्याला ह्या शास्त्रापुरता बाजूस सार. 87
1488-18
नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा । गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥1488॥
अथवा, कावळा वृद्ध असला तरीही त्याला जसा पुरोडाश (यज्ञाचा अवशिष्ट भाग) घालीत नाहीत, याप्रमाणे, तापसी असूनही गुरुभक्तिहीन असेल अशाला गीताशास्त्र सांगू नको 88
1489-18
कां तपही जोडे देहीं । भजे गुरुदेवांच्या ठायीं । परी आकर्णनीं नाहीं । चाड जरी ॥1489॥
किंवा देहने तपही चालू गुरु देवतांचेही जो भजन करितो, परंतु ज्याला श्रवणाची चाड म्हणजे भक्ति किंवा इच्छा नाहीं. 89
1490-18
तरी मागील दोन्हीं आंगीं । उत्तम होय कीर जगीं । परी या श्रवणालागीं । योग्यु नोहे ॥1490॥
तरीही आहे वरील दोन गोष्टींच्या दृष्टीने तो लोकांत उत्तम म्हणून गणला असला तरी, तो गीता श्रवणाचा अधिकारी नाही.1490

1491-18
मुक्ताफळ भलतैसें । हो परी मुख नसे । तंव गुण प्रवेशे । तेथ कायी? ॥1491॥
मोती वाटेल तितके चांगलें असो, पण जर त्याला वेज नसेल तर हे सूत्र ओवण्याच्या लायकीचे आहे काय? 91
1492-18
सागरु गंभीरु होये । हें कोण ना म्हणत आहे । परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ ॥1492॥
समुद्र गंभीर असतो, हें कोण नाकबूल करितो? त्यांत होणारी वृष्टि ही व्यर्थ आहे तरीही, असेच म्हणावे लागते. 92
1493-18
धालिया दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें । तें आर्तीं कां न करावें । उदारपण ॥1493॥
तृप्त असलेल्यांना आग्रहानें उत्तम अन्न वाढून फुकट दवडण्यापेक्षा ते क्षुधार्ताना (भुकेल्याला) देण्याचे औदार्य कां न करावें? 93
1494-18
म्हणौनि योग्य भलतैसें । होतु परी चाड नसे । तरी झणें वानिवसें । देसी हें तयां ॥1494॥
म्हणून इतर गोष्टींनी वाटेल तितके योग्य असोत, पण श्रवणाची चाड नसेल तर चुकून अगर कौतुकानेही त्यांना हे, गीतशास्त्र देऊ नको हो! 94
1495-18
रूपाचा सुजाणु डोळा । वोढवूं ये कायि परिमळा? । जेथ जें माने ते फळा । तेथचि ते गा ॥1495॥
डोळयाचा रूपविषयांत पूर्ण अधिकार असला म्हणून तो काय परिमळाच्या परीक्षेच्या कामी येईल? म्हणून जें जेथे योग्य तेथेच त्याला फल प्राप्ति होते 95

1496-18
म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती । परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती । वाळावेचि ते ॥1496॥
म्हणून, हे सुभद्रापते, ज्यांना गीता,सांगावयाची ते तपी, निष्ठावान भक्त आहेत किंवा कसे हे, तर पहावेंच, पण, तरीही, शास्त्रश्रवणाविषयीं ते अनासक्त किंवा उदासीन असतील तर ते वजं करावेच.96
1497-18
नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणीं आर्ति । आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥1497॥
अथवा तप, भक्ति यांनी युक्त असून श्रवणाविषयीही तीव्र इच्छां आहे अशी व्यक्ति जरी आढळली 97
1498-18
तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता । तया मातें सामान्यता । बोलेल जो ॥1498॥
तरी, गीताशास्त्राचा निर्मात व सकललोकांचा शास्ता असा जो मी, त्या मला जो सामान्य मनुष्याप्रमाणे लेखील,98
1499-18
माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें । येक आहाती तयांतें । योग्य न म्हण ॥1499॥
किंवा माझ्या सज्जनांची (भक्तांची) व माझी दुष्ट वचनांनीं निंदा करणारे जे कोणी असतील तेही या शास्त्राला योग्य असे समजू नको. 99
1500-18
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी । दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥1500॥
त्यांची इतर सर्व सामग्री म्हणजे रात्री ज्योतीवांचून नुसती तेल व वातीची तयारी करून ठेवलेल्या ठाणदिवीप्रमाणे व्यर्थ होय असे समज.1500

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *