201-18
परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥201॥
परंतु हे कर्म मी करीत आहे, अशी मनात आठवणही होवू देत नाही; तसेच फळाच्या आशेवर ही पाणी सोडतो.॥201॥
202-18
पैं अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायीं अर्जुना । केलिया दोनी पतना । कारण होती ॥202॥
अर्जुना, असे पहा कि, मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली, तर या दोन्ही गोष्टी नरक प्राप्तीस कारण होतात.
203-18
तरी दोनीं यें त्यजावीं । मग माताची ते भजावी । वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी? ॥203॥
तर या दोन्ही वर्ज्य करून मातेची सेवा करावी. गाईचे तोंड अपवित्र असले म्हणून गाईच्या सर्वांगाचा त्याग करावयाचा की काय?
204-18
आवडतियेही फळीं । असारें साली आंठोळीं । त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही? ॥204॥
आपल्यास आवडते जे फळ (आंबा) त्याची साल व कोय यामध्ये रस नाही, हे दोन दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत, म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल काय?
205-18
तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥205॥
त्याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोहोसच बंध असे नाव आहे.
206-18
तरी या दोहींच्या विखीं । जैसा बापु नातळे लेंकीं । तैसा हों न शके दुःखी । विहिता क्रिया ॥206॥
म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगत नाही, त्याप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोहोविषयी इच्छा करीत नाही, त्याला दुःख होऊ शकत नाही.
207-18
हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु । सात्विक ऐसा डगरु । यासींच जगीं ॥207॥
हा त्याग रूप वृक्ष सर्व वृक्षांत श्रेष्ठ असून, यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात म्हणून सर्व जगात सात्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे.
208-18
आतां जाळूनि बीज जैसें । झाडा कीजे निर्वंशें । फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें ॥208॥
आता, झाडाचे बीज जाळून झाडास जशी निर्वंश करावे, तसे फळाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो.
209-18
लोह लागतखेंवो परीसीं । धातूची गंधिकाळिमा जैसी । जाती रजतमें तैसीं । तुटलीं दोन्ही ॥209॥
ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताक्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात, त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोन गोष्टीचा त्याग केल्यावर रज व तम हे दोन्ही त्याग नाहीतसे होतात.
210-18
मग सत्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें ॥210॥
मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाच्या उजेड होउन जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहितसे होते,
211-18
तैसा बुद्ध्यादिकांपुढां । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडां । आकाश जैसें ॥211॥
किंवा आकाश (पोकळी) जसे कोणीकडे दिसत नाही, तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही.
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥18.10॥
212-18
म्हणौनि प्राचिनाचेनि बळें । अलंकृतें कुशलाकुशलें । तियें व्योमाआंगीं आभाळें । जिरालीं जैसीं ॥212॥
म्हणून पूर्वकर्मानुरोधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती, आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात.
213-18
तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरीटी । म्हणौनि सुखदुःखीं उठी । पडेना तो ॥213॥
तशी अर्जुना, त्याच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात. म्हणून त्यापासून होणार्या सुखदुःखांची उठाठेव तो करीत नाही.
214-18
तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षें करावें । कां अशुभालागीं होआवें । द्वेषिया ना ॥214॥
शुभ कर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही, किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही.
215-18
तरी इयाविषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं । जैसा स्वप्नाच्या ठायीं । जागिन्नलिया ॥215॥
ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीची कोणी सुखदुःख मानीत नाही, त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ याविषयी त्याच्या मनात शंकाच येत नाही
216-18
म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । नेणें तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥216॥
म्हणून अर्जुना, हे कर्म आणि कर्ता यात द्वैतभावाची वार्ता तो जाणतहि नाही, त्याला सात्त्विक त्याग असे म्हणतात.
217-18
ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा । अधिकें बांधिती अन्यथा । सांडिलीं तरी ॥217॥
पार्था, अशाप्रकारे कर्माचा त्याग केला तरच कर्माचा त्याग होतो; पण या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला, तर ती उलटी अधिकच बंधनात पाडतात.
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥18.11॥
218-18
आणि हां गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥218॥
आणि अर्जुना, जो देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते मूर्ख होत.॥18॥
219-18
मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु? । केउता ताथु पटु । सांडील तो? ॥219॥
मातीचा कंटाळा करून घट काय करील? आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल?॥19॥
220-18
तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी । कीं तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई? ॥220॥
तसेच अग्नीत्व अंगी असलेल्या आगीला उष्णतेचा कंटाळा करता येईल का? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय?॥220॥
221-18
हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी? । द्रवपण सांडूनि पाणी । कें राहे तें? ॥221॥
हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास आला तरी त्याने चांगला वास कुठून आणावा? किंवा पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार?॥21॥
222-18
तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे । तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी? ॥222॥
त्याप्रमाणे शरीराचे अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे, तोपर्यंत कर्म त्यागाचे वेड काय उपयोगी पडेल?॥22॥
223-18
आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसों ये वेळोवेळा । मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा? ॥223॥
आपण लावलेले गंध वाकडे लागले, तर ते वरचेवर पुसता येते; परंतु कपाळ जर वाकडे असेल, तर ते कसे नीट करता येईल?॥23॥
224-18
तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें । परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडील गा? ॥224॥
त्याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे, त्याचा त्याग करावयाचा म्हटले तर करिता येईल; पण त्यायोगे काही कर्मत्याग होणार नाही. कारण शरीर हे कर्म रूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार?॥24॥
225-18
जें श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी । कांहीं न करणेंयाचि परी । होती जयाची ॥225॥
का की, मनुष्य निजला असला तरी श्वासोश्वास रूपाने कर्म हे घडतेच, अर्थात आपण काही एक न करिता त्याची उभारणी होते,॥25॥
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण