सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५७६ ते ६०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

576-18
नाना उंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें । वन लागलें जैसें । साबरीचें ॥576॥
अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुंसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन, ही सर्व जशी निरुपयोगी आहेत; 576
577-18
नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन । अथवा गळास्तन । शेळियेचे ॥577॥
अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोरांनी चोरून आणलेली धन जसे त्याला राजरोस वापरता येत नाही, अथवा शेळीचे गळ्यात असणारी स्तन जसे निरुपयोगी असतात, 577
578-18
तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें । तयातें मी म्हणें । तामस ज्ञान ॥578॥
तसे ते निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. 578
579-18
तेंही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा कां जैसा । डोळा वाडु ॥579॥
त्यालाही ज्ञानाचा शब्दाने वर्णन करण्याचा अभिप्राय हाच कि, मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्यांचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत, असे विरुद्ध आर्थाने म्हणतो 579
580-18
कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसें आडनांव ज्ञान । तामसा तया ॥580॥
किंवा बहिऱ्याचे कान काय मोठे आहेत, असे त्यास ऐकू येत नसतानाही वाखाणतो अथवा न पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान (पिण्याची वस्तू) असे म्हणतो, तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय! 580

581-18
हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें । तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ॥581॥
हे असो; आणखी किती वर्णन करावे तर? तर असे हे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष डोळस तमोगुणच समजावे. 581
582-18
एवं तिहीं गुणीं । भेदलें यथालक्षणीं । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविलें तुज ॥582॥
याप्रमाणे, हे श्रोतृश्रेष्ठा, तीन गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान, त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली. 582
583-18
आतां याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशें होती गोचरा । कर्तयांच्या क्रिया ॥583॥
हे धनुर्धरा, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात. 583
584-18
म्हणौनि कर्म पैं गा । अनुसरे तिहीं भागां । मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥584॥
म्हणून पाण्याला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते, तसे कर्म हे ज्ञानाच्या तीन भागांनी निरनिराळे घडते. 584
585-18
तेंचि ज्ञानत्रयवशें । त्रिविध कर्म जें असे । तेथ सात्विक तंव ऐसें । परीसे आधीं ॥585॥
तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे तीन प्रकारचे कर्म होते, त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम ऐक. 585
नियतं सण्‌गरहितमरागद्वेषतः कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥18.23॥

586-18
तरी स्वाधिकाराचेनि मार्गें । आलें जें मानिलें आंगें । पतिव्रतेचेनि परीष्वंगें । प्रियातें जैसें ॥586॥
तर पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीस जसे आलिंगन देते, तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल, ते कर्म जो आचरण करितो; 586
587-18
सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनीं अंजन । तैसें अधिकारासी मंडण । नित्यपणें जें ॥587॥
सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते, तसेच अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय, 587
588-18
तें नित्य कर्म भलें । होय नैमित्तिकीं सावाइलें । सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें ॥588॥
ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली असता, सोन्याच्या दागिन्यांस सुगंधाने शोभा येते, त्याप्रमाणे होय 588
589-18
आणि आंगा जीवाची संपत्ती । वेंचूनि बाळाची करी पाळती । परी जीवें उबगणें हें स्थिती । न पाहे माय ॥589॥
जशी शरीराने, जीवन व संपत्ती ने माता आपल्या बालकाचे रक्षण करते, तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटत नाही, 589
590-18
तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मींचि करी ॥590॥
तसे सर्वपरि कर्माचे अनुष्ठान फळाची इच्छा न धरिता करितो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करितो; 590

591-18
आणि प्रिय आलिया स्वभावें । शंबळ उरे वेंचे ठाउवें । नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें । पारुषे जरी ॥591॥
आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाच्या समयी आपल्यास जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतीव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही, तसे कर्म करीत असता साधुजन घरी आल्यावर त्याचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले, 591
592-18
तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे । जालियाचेनि आनंदें । फुंजों नेणें ॥592॥
तरी तो कर्म करण्याचे राहिले, असा खेद मनास होऊ देत नाही व रागावत नाही, ते कर्म शेवटास गेले असतानाही जो आनंदाने गर्व मानीत नाही; 592
593-18
ऐस{ऐ}सिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया । जाण सात्विक हें तया । गुणनाम गा ॥593॥
या युक्तीने जे कर्म होते, त्याला अर्जुना, सात्विक कर्म म्हणतात, हे नाव त्यांच्या गुणामुळे त्यास प्राप्त होते, असे समज. 593
594-18
ययावरी राजसाचें । लक्षण सांगिजेल साचें । न करीं अवधानाचें । वाणेंपण ॥594॥
यापुढे राजस कर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो, ते ऐकण्यास हयगय करू नको.594
यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥18.24॥

595-18
तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥595॥
तर घरी मातापितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करत नाही, परंतु मुर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करितो;595

596-18
का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापें सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥596॥
किंवा तुळसीच्या झाडांस दुरून शिंतोडा पडू देत नाही, कारण त्यापासून फळ किंवा पुष्प यांची प्राप्ती नाही;परंतु द्राक्षाच्या झाडांस दुध घालतो, 596
597-18
तैसी नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें । तयांचेविषयीं न शके । बैसला उठूं ॥597॥
त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्यनैमित्तिक कर्मे, त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही,597
598-18
येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें । वेचितांही न मनवे । बहु ऐसें ॥598॥
एऱ्हवी काम्यकर्माविषयी सर्व देह जरी झिजला, तरी त्यास शीण येत नाही. (थोडकेच केले असे मानतो). 598
599-18
अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे । पेरितां पुरें न म्हणिजे । बीज जेवीं ॥599॥
अरे, वाढीदिढीच्या व्यापारांत पैसे करण्यास ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही; 599
600-18
कां परीसु आलिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ती । वेचितां ये उन्नती । साधकु जैसा ॥600॥
किंवा परीस हाती आल्यावर तो लोखंडाचे सोने करण्याकरीता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो, 600

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *