सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

376-6
हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवितांसी ॥376॥
विषय लय पावले असे या संकल्पाने ऐकले, व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहीले, म्हणजे त्याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो.
377-6
ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धी नांदे ॥377॥
अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात, आणि धैर्याच्या मंदीरांत बुद्धिही सुखाने वास करते.
शनैः शनैरुपरमेत् बुध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत्॥6.25॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्॥6.26॥

378-6
बुद्धी धैया होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥378॥
बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला, म्हणजे मग ती मनाला हळू हळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते.
379-6
याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥379॥
या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते, आणि हेहीं घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो तो ऐक.
380-6
आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे ॥380॥
साधकाने आपला एक नियम करावा की, एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही.

381-6
जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें । नाही तरी घालावें । मोकलुनी ॥381॥
अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले, तर अनायासेंच काम झाले; पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वर्तू द्यावे.
382-6
मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल । ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे ययां ॥382॥
मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथुन निश्चय त्याला परत घेऊन येईल, आणि अशा रितीने ते तत्काल स्थिर होऊन राहील.
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम्॥6.27॥

383-6
पाठीं केतुलेनि एके वेळी । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें ॥383॥
नंतर अशा प्रकारे अनेक वेळां स्थिर राहण्यानें तें सहज आत्मस्वरुपाजवळ येईल.
384-6
तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥384॥
आणि त्या आत्मस्वरुपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल, आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. (त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसूं लागेल.)
385-6
आकाशीं दिसे दुसरें । ते अभ्र जैं विरे । तै गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥385॥
आकाशांत उत्पन्न झालेली अभ्रें ज्या वेळेस नाहीतशी होतात, त्या वेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते;

386-6
तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥386॥
त्याचप्रमाणे, चित्त लयाला जाऊन जीवात्मा ब्रह्मस्वरुप होणे ही प्राप्ति या उपायापासून सहज होते.
युञ्जन्नेवं सदात्मनं योगीविगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते॥6.28॥

387-6
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां॥387॥
मनांतील संकल्पविकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले
388-6
तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडु नेणे ॥388॥
ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन पोहोचले. मिठ पाण्यांत मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडूं शकत नाही,
389-6
तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरसाचिया राऊळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥389॥
त्याप्रमाणे, जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्यांची स्थिती होते; आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे तो सर्व जग पहातो.
390-6
ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥390॥
याप्रमाणे आपलेच पाय आपले पाठीवर घेऊन योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल, तर आणखी दुसरा उपाय सांगतो
सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः॥6.29॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति॥6.30॥

391-6
तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं । आणि तैसेंति माझ्या ठायीं । सकळ असे ॥391॥
मी सर्वांच्या देहांत आहे याविषयी शंका नाही; आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व आहे. अशा रीतीने जग व ईश्वर हीं एकमेकांत मिसळलेली आहेत.
392-6
हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें । बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥392॥
अशा रीतीने जग व ईश्वर हीं एकमेकांत मिसळलेली आहेत. परंतु साधकाने आपल्या बुद्धीचा निश्चय मात्र करावा.
393-6
एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥393॥
अर्जुना, येरवी तरी, जो एकत्वभावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून मला भजतो,
394-6
भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें । केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥394॥
व्यक्तीमात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतःकरणांत अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो,
395-6
मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां । एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें ॥395॥
तो आणि मी एक असे बोलनेच व्यर्थ होय. येरवी धनंजया, बोलून दाखविले नाही, तरी तो आणि मी एक आहो.

396-6
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा । तो माझ्या ठायी तैसा । मी तयामाजीं ॥396॥
ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्या एकत्वाची योग्यता असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याचे ठिकाणी आहे.
397-6
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि माने अवकाशु । तैसा माझेनि रुपें रुपसु । पुरुष तो गा ॥397॥
जसे पाण्याचे योगाने गोडी किंवा गगनाच्या योगाने पोकळी यांचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो.
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते॥6.31॥

398-6
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥398॥
अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रांत तंतु एक असतात, त्याप्रमाणे ज्याने ऐक्याचे दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले,
399-6
कां स्वरुपें तरी बहुतें आहाती । परि तैसी सोनीं बहुवें न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥399॥
किंवा पुष्कळ जरी अलंकार घातले तरी अनेकत्व नसणाऱ्या सोन्याप्रमाणे ज्याने ऐक्यरुप पर्वताची स्थिती बनविली आहे,
400-6
ना तरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥400॥
अथवा, जितकी झाडाची पाने तितकी रोपे लाविलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञानरात्र उजाडली आहे,

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *