चांगलं द्या, चांगलंच मिळेल

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

एकदा असं घडलं, श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो, मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे… त्यासाठी तू माझी मदत कर… श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की, तुला ते शक्य नाही… पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो… तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकच मागणी करतो की, मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे… श्रीकृष्ण म्हणतो ठीक आहे… मी तुला एक संधी देतो… पण माझी पण एक अट आहे… मी तुला जी संधी देईन तशीच संधी कर्णाला सुद्धा देईन… ह्या परीक्षेत तू कर्णापेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे… अर्जुन श्रीकृष्णाची ही अट मान्य करतो… श्रीकृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये करतो… अर्जुनाला म्हणतो, आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक… परंतु अट एकच… एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस… लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे… त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे…

लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले… पुढे अर्जुन छाती काढून चालत होता… मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते… दोन दिवस आणि दोन रात्री हे काम चालू होते… अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता… पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती… लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे… आता अर्जुन अगदी दमून गेला होता… पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता… शेवटी त्याने श्रीकृष्णाला सांगितले की, बास… आता यापुढे मी काम करू शकत नाही… मग श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत ना त्या तू लोकांना दान करून टाकायच्या… लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत… ज्याला जेवढे शक्य आहे, त्याने तेवढे सोने निःसंकोच घेऊन जावे… एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला… लोक सोने वाहून नेऊ लागले… अर्जुन चकित होऊन पाहत बसला… हा विचार आपल्या मनात का आला नाही… या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला… श्रीकृष्ण मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास…!

तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास…! जणू काही आपण उपकार करतो आहोत, अशा थाटात तू दान करत होतास…! कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते… त्याने दान केले आणि तो निघूनही गेला… आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय, हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही… व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे… देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते… कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे… म्हणून निसर्गाचा एक नियम आहे, जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार… कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही… त्यामुळे चांगलं द्या, पदरी चांगलंच मिळेल… “काय चुकलं” हे शोधायला हवं… पण आपण मात्र “कुणाचं चुकलं” हेच शोधत राहतो…

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *