76-2
(दुसरे उदाहरणं देऊन माऊली सांगत आहेत)
तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥76॥
किंवा कडक उन्हाळ्यात (तीव्र उन्हामुळे जंगलात लागलेली आग) मोठा पर्वत वणव्याने व्यापला जावा. तसा तो धूनर्धारी अर्जून दुःखाने अगदी जर्जर (पिडीत) झाला होता.
77-2
म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥77॥
म्हणून जो सहजच नीलवर्ण आहे आणि स्वभावाने कृपामृताने भरलेला असा श्रीगोपाळ रुपी (महामेघ कृपेचा वर्षाव करण्यासाठी) अर्जूनाकडे वळला.
78-2
तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥78॥
त्याठिकाणी (श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी) शुभ्र दातांची कांती हिच जणूं कांही चमकणारीं वीज होती.आणि त्याचे गंभीर बोलणे हाच मेघ गर्जनेचा (गडगडाटाचा) थाट होता.
79-2
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणे अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ॥79॥
आता तो श्रीकृष्णरूपी कृपाळु (उदार)मेघ कसा वर्षाव (शब्दांचा) वर्षाव करेल आणि दुःखाने पेटलेला अर्जून रूपी (मोठा) पर्वत कसा शांत होईल,आणि ब्रम्हज्ञानाचा नवीन अंकूर त्याच्या ठिकाणी कसा फूटेल,
80-2
ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥80॥
ती कथा समाधान वृत्तीने, (शांत चित्ताने, मन हळुवार असायला हवं) श्रवण करा. आणि पुढे काय घडते ते पाहा, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्रीज्ञानदेव म्हणाले.
। अध्याय पहिला ।
श्रीज्ञानदेव म्हणतात,
57-1
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळूवारपण चित्ता । अणुनियां ॥57॥
त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. ॥57॥
श्रीज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून इथं म्हणतात गीता त्यांनी कशी ऐकावी हे ते सांगत आहेत. ते श्रोत्यांना विश्वासात घेतात त्यांच्या रासिकतेला आवाहन करतात, ते म्हणतात, “हा मोठा आल्हाद देणारा विषय आहे, तो ऐकण्यात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे, सौंदर्याचं आगळंवेगळं दर्शन तुम्हाला घडणार आहे. सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मन हळुवार असायला हवं, कस हळुवार हवं? तर ज्ञानदेव खूप सुंदर उत्तर देतात, ते म्हणतात, शरद ऋतूतील रात्र आहे. स्वच्छ अशा आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशमान झाला आहे. त्या चंद्राचे शीतल किरण पृथ्वीवर बरसत आहेत. सगळीकडं टिपूर चांदण पडलेल आहे. चकोर पक्षी चांदण पिऊन जगतो म्हणतात. चकोरची छोटीछोटी पिलं चंद्ररकिरणांचे जणू अमृताचे असावेत असे कोवळे कण जमिनीवरून अलगदपणे टिपून घेतात. तसं आपलं मन श्रोत्यांनी अगदी हळुवार करावं आणि या गीतासंवादरूप कथेत भगवान श्रीकृष्णा जे काहीं सांगत आहेत त्याचा अनुभव घ्यावा..
संजय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप ।
न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णीं बभूव ह॥2.9॥
भावार्थ :- संजय म्हणाला, “हे राजा धृतराष्टरा, अर्जुन अंतर्यामी श्रीकृष्णाला असे बोलून पुनः त्या श्रीगोविंदला ‘मी युद्ध करणार नाही’ असे स्पष्ट सांगून स्तब्ध राहिला.
81-2
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥81॥
याप्रमाणे संजयाने धृतराष्टरास सांगितले. तो म्हणाला, हे राजा, तो अर्जुन पुनः शोकाकुल होऊन काय म्हणाला. ते ऐका !!
82-2
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥82॥
तो खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णास म्हणाला, आत्ता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका, काहीही झाले तरी यावेळी मी युद्ध करणार नाही, हे निश्चित !!
83-2
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥83॥
याप्रमाणे एकदम बोलला, पुढे कांही न बोलता तो स्तब्ध (मौन) राहिला. ही त्याची अवस्था पाहून श्रीकृष्णास आश्चर्य वाटले.
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः॥2.10॥
भावार्थ :- हे भरतवंशी धृतराष्टरा ! दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करत बसलेल्या (अर्जुनास) त्याला श्रीकृष्ण प्रसन्न मुखाने असे म्हणाले की..
84-2
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥84॥
भगवान मनात म्हणाले, अर्जुनाने याप्रसंगी हे भलतेच काय सुरु केले आहे? याला मुळीच काही कळत नाही. काय करावे??
85-2
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥85॥
आता याला कोणत्या उपायाने (काय केल्याने) समजेल? कशाने धीर धरील? जसा एखादा मांत्रिक (भूतबाधा घालविताना) विचार करतो;
86-2
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥86॥
किंवा असाध्य रोग झाले असता, वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृतासमान दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो,
87-2
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥87॥
त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने आपले शोक टाकील?(भ्रम कसा सोडून देईल) याचा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, भगवान श्रीकृष्ण विचार करत होते.
88-2
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥88॥
तो मोह, भ्रम कसा नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि अर्जुनास रागाने बोलण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे आई रागाने बोलली तरी तिच्या मनात प्रेम असते.
याआधी अर्जुनास समजावण्याचा प्रयत्न श्रीकृष्णांनी अनेक प्रकारे केला पण गोड शब्दांनी अर्जुन ऐकत नाही, हे भगवंताच्या ध्यानी आले म्हणून रागावण्याचं नाटक त्यांना करावं लागलं. (किंवा अर्जुनाच्या मनातील अविचार घालवण्यासाठी भगवंतांनी केलेली युक्ती समजावी)
89-2
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥89॥
किंवा औषधाची चव कडू असली तरी त्यामध्ये अमृताचा साठा असतो; हे वरून पहिले तर दिसत नाही, पण (त्याचे सेवन केल्यानंतर) गुणांच्या रुपाने ते नंतर स्पष्ट होते,
90-2
तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं॥90॥
त्याप्रमाणे श्रीकृष्णाची वाणी वरकरणी कठोर, पण आत हितकर (हिताचा उपदेश देणारे शब्द) असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले.
श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः॥2.11॥
भावार्थ ::- श्रीभगवान म्हणाले, ” शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टीबद्दल तू शोक करत आहेस. आणि पांडित्याच्या गोष्टी बोलत आहेस.पण(विद्वान) विवेकी लोक (मृत्यू)मेलेल्या बद्दल किंवा न मेलेल्या बद्दल (जिवंत) शोक करत नाहीत.
91-2
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें । जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥91॥
श्रीकृष्ण म्हणाले, ” तू युद्ध करण्याचे सोडून हे जे तू मधेच आरंभिले (सुरु केले) आहेस, हे आश्चर्य आम्ही पाहत आहोत.
92-2
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥92॥
तू स्वतःला ज्ञानी (विद्वान) तर म्हणवितोस, पण अज्ञानाच्या (मूर्खपणा) गोष्टी मात्र सोडत नाहीस. बरें तुला काहीं शिकवायचे म्हंटले की, मोठमोठ्या (पांडित्याच्या) गोष्टी सांगतोस.!!
93-2
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥93॥
जन्मांधाला वेड लागले म्हणजे, ते जसे सैरावैरा धावते, तसे तुझे हे शहाणपण (बोलणे) दिसते आहे.
94-2
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥94॥
तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु या कौरवाबद्दल शोक करतोस, याचा मला वारंवार(विस्मय)आश्चर्य वाटत आहे.
95-2
तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना? । हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी? ॥95॥
हे अर्जुना ! मला सांग, तुझ्यामूळे या त्रिभूवनाचे अस्तित्व आहे काय.?या विश्वाची रचना अनादि आहे, ते खोटे आहे काय.?
96-2
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं? ॥96॥
या विश्वाला चालविणारा सर्वज्ञानी, सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून पंचमहाभूते, प्राणी उत्पन्न होतात, असे जे हे साधू संत (बोलतात) सांगतात, ते खोटे आहे काय.?
97-2
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥97॥
आज यामध्ये काहीं बदल झाला आहे काय.? या विश्वातील जन्म-मृत्यू चे चक्र तू निर्माण केले आहेस काय? आणि तू मारले, तरच त्यांचा नाश होणार आहे काय.?
98-2
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥98॥
तू (अज्ञानाने) अहंकारामुळे झालेल्या भ्रमाणे तू कौरवांचा नाश करण्याचा मनात आणले नाहीस, तर मला सांग, ते चिरंजीव होतील का.?
99-2
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥99॥
किंवा तू एक मारणारा आणि बाकी सगळे लोक मरणारे, असा भ्रम कदाचित तुझ्या चित्ताला होईल, त ते होऊ देऊ नकोस.
100-2
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥100॥
हे सगळे आपोआप होतें व जातें. असा हा क्रम अनादि कालापासून असाच अव्यहात चालू आहे, तर मग तू शोक का कारावास? मला सांग.
