मंगळवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

मंगळवार अभंग प्रारंभ

  1. चौक भरियेला आसनीं पाचारिली
  2. रंगा येई वो ये रंगा येई वो ये
  3. कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही
  4. अनादी निर्गुण प्रगटली भवानी
  5. अनादि अंबिका भगवती
  6. माझे कुळीची कुळस्वामिनी

1 चौक भरियेला आसनीं पाचारिली

चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी ।
वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे ।
तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥धृ.॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।
अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥
मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी ।
भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥
डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे ।
आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥

2 रंगा येई वो ये रंगा येई वो

रंगा येई वो ये रंगा येई वो ये ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
वैकुंठवासिनी, विठाई जगत्र जननी ।
तुझा वेधु माझे मनी, रंगा येई वो ये ॥२॥
कटी कर विराजित । मुगूट रत्न जडित ।
पीतांबरु कासिला, तैसा येई का धांवत ॥३॥
विश्र्वरुप विश्र्वंभरे । कमळ नयनें कमळाकरे ।
वो तुझे ध्यान लागो । बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥

3. कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही ।

कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही ।
गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१॥

पांडुरंगे ये वो पांडुरंगे ।
जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ ध्रु ॥

भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले ।
आंबॠषीकारणें जन्म दहा घेतले ॥२॥

प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला ।
विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥

उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं ।
पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥


कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली ।
वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी झाली माउली ॥५॥

दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं ।
धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥

कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार ।
करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥ ७ ॥

4. अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।

अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारुनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेद रहित वारीसी जाईन ॥२॥

नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।
करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा ।
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा ॥३॥

पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी ।
अमृत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आतां साजणी झाले मी निःसंग ।
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग ।
काम क्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥

ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाउनि नवस महाद्वारी फेडिला ।
एकपणे जनार्दनीं देखियेला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥

आज नाथांनी जोगवा मागीतलाय आई भवानी कड़े …आणि तो ही सर्वांसाठी. ते म्हणतात की..हे आई भवानी विठाइ …तुझा गोंधळ घातला आई..तू प्रसन्न झालिस आई. तू प्रकट झालिस आई. आता तू ह्या भक्तांना पाव आई…आणि तू अशीच पावली स तर ना… आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन

या भक्तांचा मोह रूपी महिषासुर मारून टाक आई.. त्यांच्यातील तीन ताप ( रज तम सत्व)या गुणांची झाड़नी करून टाक आई आणि तुझ्या नगरात जाण्यासाठी जे योग्य आहे तेव्हडेच ठेव आई अस जर् केलस् ना आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन.


त्या साठी आई मी भेदा भेद करणार नाही.द्वयेत् करणार नाही ते सांडून टाकिन आई… त्यासाठी समर्थ सद्गुरु कडून तुझ्या नामाच्या बोधाचा झेंडा हाती घेइन्. आणि तुझी वारी करीन आई. तुझी नवविध् भक्ती करीन. आणि माझ्या पोटी ज्ञानवान संतान मागेन आई .ज्ञान मिळाल तरी उतून मातून नाही जानार आई…हृदयात नेहमी सद्भाव ठेवीन. दंभ अहंकारा चा वाराही लागून घेणार नाही.त्रास देणाऱ्या सासऱ्या सारखा त्याचा नाश करीन आई अस जर् तू केलस् ना आई…

तर आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
तुझ्या नामाची समर्थ सद्गुरु कडून पूर्ण बोधाची परडीच् मागून घेइन्..आशा तृष्णा इच्छया यांना खोल दरडीत ढ़कलुन देईन आई.. मनाला भरकटवुन देणाऱ्या विकारांची कुरवण्डी करीन आई.. आणि यासाठी तू मदत केलिस् ना आई……. तर आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन.

हे आई तू आता पावलिस् आई.. तुझ्या गोड नामानी हृदयात हृद्यतामृत (भातुक) पाझरणार आहे आई त्याच्या दुरडया च्या दुरडया भरून घेइन् आता मी निसंग झालीय आई.. विकल्प नावाचा नवरा मी सोडून दिलाय आई तो की नाही खुप वेग वेगळे विकल्प तैयार करून मनाला भरकटुन टाकत असे म्हणून त्याला सोडून दील आई.. काम क्रोध ह्यांना तर झोडून मारून टाकल आई आणि अशारीतीन आई मार्ग तूच मोकळा केलायस म्हणून आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन

शेवटी नाथ बाबा म्हणतात की… अरे बाबानो असा मार्ग शोधून ठेवलाय. की ज्याच्यात जन्म मृत्यु च्या पलीकडे नेणारा मार्ग मिळतो की जो मार्ग चालल्यावर जन्म मरणा चा फेरा चुकवता येतो तो मी चुकवलाय आणि त्याचाच नवस फेडायला आलोय म्हणून हे आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन

5. अनादि अंबिका भगवती

अनादि अंबिका भगवती ।
बोध परडी घेउनी हातीं ।
पोत ज्ञानाचा पाजळती ।
उदो उदो भक्त नाचती ॥१॥

गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥धृ०॥
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी ।
नाचताती सोहंमेळीं ।
द्वैतभाव विसरूनी बळी ।
खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥

मुगुटमणी पुंडलीक ।
तेहतीस कोटी देव नायक ।
गोंधळ घालतील कौतुक ।
एका जनार्दनीं नाचे देख ॥३॥

6. माझे कुळीची कुळस्वामिनी

माझे कुळीची कुळस्वामिनी ।
विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासिनि ।
ठेवीले दोन्ही कर जघनी ।
उभी सखी सजनी ॥१॥

येई पुंडलिक वरदायिनी ।
विश्वजननी रंगा येई वो ॥ धृ ॥

मध्ये सिंहासन घातले ।
प्रमाण चौक हे साधिले ।
ज्ञान कळस वर ठेविले ।
पूर्ण भरियले । धूप दाविले ।
सुवासे करूनि ॥२॥

सभामंडप शोभला ।
भक्ती चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला ।
रंग माजला । वेद बोलिला । मूळची ध्वनि ॥३॥

शुक सनकादिक गोंधळी ।
जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी मातले बळी ।
प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥४॥

ऐसा गोंधळ घातिला ।
भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला ।
ऐक्य साधिला । ठाव आपुला ।
लाभ त्रिभुवनी ॥५॥

मंगळवार चे अभंग समाप्त

सात वाराचे अभंग पहा

संपूर्ण भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *