126-3
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे॥126॥
हे अर्जुना ! अशा या नियमाशिवाय (वागण्याखेरीज) दुसऱ्या तऱ्हेने वागू नये (अन्य आचरण करू नये). अशी ही पुरातन काळापासूनची कथा भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. (किंवा सांगितली आहे)
127-3
जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांते भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांही ॥127॥
आपण म्हणजे देह आहोत असे जे मानतात आणि विषयांना हे भोग्य समजतात आणि ज्यांस यापलीकडे दुसरी काहींचं कल्पना नसते (काहीच जाणत नाहीत),
128-3
हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥128॥
ते बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असें न समजता, त्या सर्व संपत्तीचा केवळ (देहाच्या ठिकाणी अहंकार बुद्धी ठेऊन) स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात,
129-3
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥129॥
इंद्रियांना आवडणारे चविष्ट पदार्थ तयार करतात आणि त्याचे सेवन करतात, ते पापी लोक जणू काही (वस्तुतः या पदार्थाच्या रूपाने) पातकांचेच सेवन करत असतात.असे समज.
130-3
जे संपत्तिजात आघवें । हे हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषी ॥130॥
वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे, असे समजावे. मग ती संपत्ती स्वधर्मयज्ञाने आदिपुरुषाला अनासक्त भावनेने अर्पण करावी.
131-3
हें सांडोनिया मूर्ख । आपणपेयांलागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥131॥
हे सर्व न जाणता अज्ञानी लोक स्वतःच्या भोगाकरिता नाना प्रकारचे अन्नाचे पदार्थ निर्माण करतात.
131-3
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥132॥
ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीस जातो आणि परमेश्वरही संतोष पावतो, ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही. म्हणून,
132-3
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥133॥
या अन्नाला साधारण, सामान्य समजू नये. अन्न हे ब्रम्हरूप आहे असें समज; कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे.
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः ।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः॥3.14॥
भावार्थ :- अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि तो यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे.
133-3
अन्नास्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें । मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥134॥
अन्नपासून सर्व प्राणिमात्रांची वाढ होत असते आणि पावसापासून सर्व ठिकाणी अन्न निर्माण होत असते.
134-3
त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥135॥
त्यापावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते. तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो; कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रम्हापासून होते.
कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं॥3.15॥
भावार्थ :- कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे, हे जाण. वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत; म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्टीत असतो.
135-3
मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर । म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥136॥
ह्या वेदांची उत्पत्ती अविनाशी अशा ब्रह्मपासून होते; म्हणून हे चराचर विश्व ब्रह्ममध्ये सामावलेले आहे.
136-3
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती । ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥137॥
हे सुभद्रापती अर्जुना ! ऐक. कर्माचे मूर्त स्वरूप जो यज्ञ, या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्यरूपाने निरंतर राहत असतात.
137-3
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती॥3.16॥
भावार्थ :- हे अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या त्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. तो विषयांच्या ठिकाणी रममाण होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवितो.
138-3
ऐशीं आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥138॥
हे धनुर्धरा ! याप्रमाणे ही मुळातील कार्यकारण परंपरा तुला या स्वधर्म- यज्ञाकरता संक्षेपाने सांगितली.
139-3
म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥139॥
म्हणून जो उन्मत्त असलेला मनुष्य या लोकांमध्ये उचित अशा या स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही,
140-3
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी॥जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥
जो वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियांचे लाड पुरवितो, तो केवळ पापांच्या राशी असून भूमीला केवळ भार आहे, असे समज.
141-3
तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसे कां अभ्रपटळ । अकाळींचे ॥141॥
जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी (आकाशात जमलेले ढग) निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे हे अर्जुना ! त्या उन्मत्त मनुष्याचे जन्म व कर्म सर्व निष्फळ असतात.
142-3
कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥142॥
किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे (स्वधर्माचे) आचरण होत नाही त्याचे जगणे म्हणजे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज.
143-3
म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥143॥
म्हणून पांडवा ! ऐक. हा स्वधर्म कोणीही सोडू नये. सर्व भावाने (भावाने :- काया,वाचा,मना पासून) स्वधर्माचे आचरण करावे.
144-3
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आले । मग उचित कां आपुले । वोसंडावे ॥144॥
असे पाहा की, शरीर जरी आपणास मिळाले आहे, तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे (म्हणजेच त्यामागे कर्तव्यकर्म आलेच असा अर्थ), तर मग आपणास विहित असलेले कर्म आपण का बरे त्यागावे??
145-3
परिस पां सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥145॥
हे अर्जुना ! मनुष्यशरीर प्राप्त झाले असता, जे लोक कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते लोक अज्ञानी आहेत.
146-3
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते॥3.17॥
भावार्थ :- परंतु जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेला असतो, तो आत्मनंदाने तृप्त व संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही.
देखें असतेनि देहकर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥146॥
जो आत्मस्वरूपामध्ये (निरंतर आपल्या स्वरूपामध्ये गढलेला) अखंड रममाण असतो, तो आपल्या देह-इंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालू असताना देखील त्यामध्ये लिप्त होत नाही.
147-3
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला । म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु ॥147॥
कारण कि, पाहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो; म्हणून त्याचा कर्माशी संबंध सुटलेला असतो.
148-3
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः॥3.18॥
भावार्थ :- या लोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधवयाचा नसतो.
तृप्ती झालिया जैसीं । साधने सरती आपैसीं । देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्मे नाही ॥148॥
पाहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप आपोआप संपतो, त्याप्रमाणे आनंदस्वरूप आत्मतत्वाशी एकरूप झाल्यावर कर्म करण्याचे प्रयोजनच शिल्लक राहत नाही.
149-3
जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना । तंवचि यया साधनां । भजावें लागे ॥149॥
हे अर्जुना ! जोपर्यँत आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तो पर्यंत कर्मादी साधने करावी लागतात.
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः॥3.19॥
भावार्थ :- म्हणून कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर. अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो.(मोक्षपद मिळवितो)
150-3
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥150॥
म्हणून सदैव फळाची आशा त्यागून तू उचित अशा आपल्या स्वधर्माचे आचरण कर.