सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

251-0
साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥251॥
या काम क्रोधाने पतिव्रता असलेल्या शांती हिला वस्त्रहीन केले; आणि मायारूपी स्त्रीला वस्त्रे अलंकारांनी सजविले. मग अशा या मायेने साधूंचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीनी भ्रष्ट करून टाकला.
252-3
इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥252॥
यांनी विवेकाचे बळ नाहीसे केले, वैराग्याचा विचार नाहीसा केला; आणि शम-दमांची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली.
253-3
इहीं संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥253॥
यांनी मनातील संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले व आनंदरूपी कोवळी रोपे उपटून टाकली.
254-3
इहीं बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥254॥
यांनी ज्ञानाची (बोधरूपी) रोपे खुडून टाकली, सुखाची सर्व अक्षरेच पुसून टाकली; आणि माणसाच्या हृदयात विविध तापांचे निखारे प्रज्वलित केले.
255-3
हे आंगा तव घडले । जीवींचि आथी जडले । परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिकां ॥255॥
काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. ते जिवाबरोबरच (चिकटून) जडलेले आहेत. या काम क्रोधाचा आतमध्ये (अंतःकरनात) शोध केला, तर ब्रह्मदिकांना देखील ते सापडत नाहीत.


256-3
हें चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचां एका हारीं । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥256॥
हे काम क्रोध जिवात्म्याच्या जवळ असतात. ज्ञानाच्या पंक्तीला ते राहत असतात. याच्या लहरी हल्ला करायला उसळल्या, की त्या कोणालाही सावरता येत नाहीत.
257-3
हें जळेंवीण बुडविती । आगीविण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियांते ॥257॥
हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात, अग्नीशिवाय हे जाळून टाकतात आणि मानवाला काही समजू न देता ग्रासून टाकतात.
258-3
हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि॥258॥
कोणत्याही शस्त्रावाचून ठार करतात. दोरावाचून बांधतात आणि स्वतःला ज्ञानी म्हणणाऱ्या व्यक्तीला तर पैजेचा विडा उचलून ते ठार करतात
259-3
चिखलेंवीण रोविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें ॥259॥
हे चिखलाशिवाय माणसाला पुरून टाकतात. कोणत्याही जाळ्यावाचून अडकवून टाकतात. हे शरीरात सूक्ष्मरूपाने राहत असल्यामुळे सर्वसाधारणपणे कोणाच्या अधीन होत नाहीत.(आटोक्यात येत नाहीत)
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥3.38॥

भावार्थ :- ज्याप्रमाणे धुरानें अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टित असतो, त्याप्रमाणे कामाने हे ज्ञान आच्छदिलेलें आहे.
260-3
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं । ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥260॥
जसे चंदनाच्या मुळीला सर्प वेढे घालून बसलेले असतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते. (काम क्रोध जिवात्म्याला ग्रासलेले असतात.)


261-3
कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥261॥
जसा सूर्य कधी प्रकाशवाचून नसतो, धुरावाचून अग्नी असत नाही किंवा मळाशिवाय आरसा असू शकत नाही.(धुळीच्या कणांवाचून),
262-3
तैसें इहीविण एकलें । आम्हीं ज्ञान नाही देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥262॥
ज्याप्रमाणे बी कोंड्याने आच्छादलेले असते (बी कोंड्यासकट उत्पन्न होते), त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेस आले नाही.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥3.39॥

भावार्थ :- अर्जुना ! ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा जो कामरूपी अग्नी त्याने ज्ञान आच्छादिले आहे.
263-3
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें ॥263॥
वस्तुतः ज्ञान हे शुद्धच आहे; परंतु या काम-क्रोधाने हे झाकले गेले आहे. म्हणून ते प्राप्त होण्यास कठीण झाले आहे.
264-3
आधी यांते जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥264॥
प्रारंभी साधनेने काम-क्रोधानां जिंकावे, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु सामान्य माणसाकडून या काम क्रोधाचा पराभव होऊ शकत नाही
265-3.
यांते साधावयालागी । जें बळ जाणिजे अंगी । तें इंधन जैसें आगी । सावावो होय ॥265॥
काम-क्रोधानां जिकण्यासाठी अंगामध्ये बळ (सामर्थ्य) आणावे, तर अग्नीला इंधन पुरवावे, तसे अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अंगातील बळ काम क्रोधानां उलट साहाय्य करणारे होते.
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥3.40॥

भावार्थ :- इंद्रिये, मन व बुद्धी ही (काम, क्रोध) यांचे निवासस्थान आहे असे म्हणतात. आणि मन, बुद्धी, इंद्रिये यांचे द्वारा हा काम ज्ञाना
आच्छादित करतो आणि जिवात्म्याला मोहात गुंतवितो.


266-3
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियांते जिणिजे । इहींचि जगीं ॥266॥
अशा रीतीने जे जे उपाय करावेत, ते सर्व उपाय ह्या काम – क्रोधांनाच साहाय्य करीत असतात; म्हणून या जगामध्ये ते हठयोग्यानां सुद्धा जिंकतात.
267-3
ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥267॥
असे हे काम-क्रोध जिंकण्याला कठीण जरी असले/म्हंटले, असें बोलले जरी जात असले, तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे; तो उपाय तुझ्याकडून होणार असेल,तर तुला सांगतो.
तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥3.41॥

भावार्थ :- हे भरतश्रेष्ठ अर्जुना ! तू प्रारंभी इंद्रियांचे नियमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर.
268-3
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें । आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव ॥268॥
या काम क्रोधांचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आहे इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते; म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळवं.
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥3.42॥

भावार्थ :- स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे, असे ज्ञानी म्हणतात.
269-3
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥269॥
असे झाले असता, मनाची विषयांकडे धावण्याची क्रिया बंद पडेल आणि बुद्धितील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील.(बुद्धी मोकळी होईल). यामुळे या पाप्यांचा आश्रय नाहीसा होईल.
एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥3.43॥

भावार्थ :- अशा प्रकारे बुद्धीतून श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वराला जाणून, बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो ! दुर्जन अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥3॥
270-3
हें अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मीवीण उरले । मृगजळ नाही ॥270॥
हे काम क्रोध अंतःकरणातून नष्ट झाले, तर निःसंशय गेले असे जण. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही;


271-3
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥271॥
हे काम क्रोध जर नाहीसे झाले, तर ब्रम्हरूपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंतःकरणामुळे सुखाच्या राशींचा अनुभव स्वतःच घेऊ शकतो.
272-3
जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं ॥272॥
हीच सद्गुरू आणि शिष्यांची गुह्य अशी गोष्ट आहे, हे जीव – ब्रम्हचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर राहून तेथून तो कधीही ढळत नाही.
273-3
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥273॥
संजय म्हणाला, “हे धृतराष्ट्रा राजा ! ऐक.असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती, देवांचा देव जो श्रीकृष्ण तो याप्रमाणे म्हणाला.
274-3
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥274॥
आता भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती कथा ऐकून अर्जुन कांही प्रश्न विचारील.
275-3
तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥275॥
या अनमोल बोलण्याची योग्यता,(भगवंताच्या बोलण्यातून स्पष्ट अनुभवास येणारे शांतादि रस) त्यातील रसवृत्ती या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवनसुखाची समृद्धी होईल.
276-3
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥276॥
निवृत्ती महाराजांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर महाराज श्रोत्यानां म्हणतात, शुद्ध बुद्धीने प्रतिभेचा चंद्र प्रकाशित करून श्रीकृष्ण-अर्जुनाचा हा सुखसंवाद श्रवण करा.


॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – कर्मयोगोनाम्
तृतीयोऽध्यायः॥3॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 43 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 276 ॥

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *