सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , ,

326-6
आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥326॥
आम्ही हे जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले,ते स्वतः शरीराने जे करितात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात.
327-6
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥327॥
त्या योग्यांची शरीरे परब्रह्माच्या रसाने देहाकृतीच्या मुशींत ओतल्यासारखी सतेज दिसतात.
328-6
जरि हे प्रतीति हन अंतरी फाके । तरी विश्वचि हें अवघे झांके । तव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हे ॥328॥
जर हा अनुभव अंतर्यामी प्राप्त झाला, तर हे सर्व विश्व त्याला मावळते. तेव्हां अर्जुन म्हणाला ” देवा, आपण बोललां, तें सत्य आहे.
329-6
कां जें आपण आतां देवो । हा बोलिलो जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥329॥
देवा, आपण आतां जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणुनच त्या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कार होतो.
330-6
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥330
आपण जो हा मार्ग सांगितला, त्याचा दृढ अभ्यास करणारे खरोखर ब्रह्मपदाला पावतात, हे आपल्या सांगण्यावरून मला समजले.

331-6
देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केंवी ॥331॥
देवा, आपण सांगितलेली गोष्ट ऐकतानाच चित्तांत ज्ञान उत्पन्न होते, तर मग तिचा अनुभव घेणाराला तद्रूपता कशी बरे प्राप्त होणार नाही?
332-6
म्हणऊनि एथ कांही । अनारिसें नाहीं । परि नावभरी चित्त देई । बोला एका॥332॥
म्हणुन, हे जे आपण सांगितले, यात काही संशय नाही. परंतु क्षणभर मी जी विनंति करतो, तिकडे लक्ष द्यावे.
333-6
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शकें करुं पांगु । योग्यतेचा ॥333॥
कृष्णा, आतां तुम्हीं जो मला योग सांगितला, तो माझ्या मनाला फार आवडला; परंतु माझी योग्यता कमी असल्याकारणानें माझ्या हातून कांही तो होणार नाही.
334-6
सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये । तरी हाचि मार्ग सुखोपायें । अभ्यासीन ॥334॥
माझ्या हातून कांही तो होणार नाही. माझ्या अंगात जेवढी शक्ति आहे, तेवढी खर्च करूनही जरी हा शेवटाला जाईल, तरी देखील मी मोठ्या समाधानाने याचा अभ्यास करीन.
335-6
नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेचिं पुसों ॥335॥
किंवा, देवा, तुम्हीं जसे सांगता तसे माझ्याने जर न करवेल, तर आपल्या योग्यतेच्या मानानें आपल्या हातून जे होईल तेच आपण विचारावे,

336-6
जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥336॥
अशी माझ्या मनांत इच्छा उत्पन्न झाल्यामुळे आपल्याला विचारण्याचे कारण पडले.अर्जुन म्हणतो, ” तर मग देवा, आपण इकडे लक्ष द्यावे
337-6
हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरुपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ॥337॥
महाराज, आपण हे जे योगसाधन सांगितले ते ऐकले; परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ति होईल काय?
338-6
कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांही । तेथ कृष्णा म्हणती तरी काई । धनुर्धरा ॥338॥
किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे आहे की काय? तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे तूं काय विचारतोस?
339-6
हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांही साधारण । तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिध्दि जाय ॥339॥
हा योगाभ्यास जर म्हणशील तर खरोखर मोक्ष देणारा आहे; पण याशिवाय दुसरी साधारण जरी गोष्ट असली, तरी ती सुद्धा अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाईल काय?
340-6
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभी फळें ॥340॥
परंतु योग्यता म्हणून जिला म्हणतात, ती प्राप्तीचे पूर्वी समजत नाही. कारण, अधिकारी होऊन आरंभिलेले काम तत्काल फलद्रप होते.

341-6
तरी तैसी एथ कांही । सावियाचि केणी नाहीं । आणि योग्यांची काई । खाणी असे ॥341॥
तरी या ठिकाणी खरोखर तशी काही अडचण नाही; आणि दुसरे असे पहा की, योग्यतेची एखादी खाण आहे की काय?
342-6
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥342॥
जो थोडासा विरक्त किंवा विहित धर्म आचरण्यांत जो नियमित झाला आहे, इतकेच नव्हे, तर सामान्यतः व्यवस्थेशीर वागणारा जो आहे; तो देखील अधिकारी होतो.
343-6
येतुलालिये आयणीमाजि येवढें । योग्यपण तूतेंही जोडे । ऐसें प्रसंगे सांकडें । फेडिलें तयाचें ॥343॥
अशा युक्तीनें इतकी योग्यता तुझे ठिकाणींही आहे. याप्रमाणे अर्जुनाचा त्या समयाला संशय फेडला.
344-6
मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥344॥
मग श्रीकृष्ण म्हणाले :- पार्था, या योगप्राप्तीची अशी व्यवस्था आहे, परंतु अव्यवस्थित मनुष्याला त्याची प्राप्ति होण्याचा कधीही संभव नाही.
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन॥6.16॥

345-6
जो रसनेद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया॥345॥
या जिव्हेचा अंकित झाला, किंवा सर्वथैव झोपेच्या आधीन झाला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही.

346-6
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारुनियां ॥346॥
अथवा, दुराग्रहाच्या आवेशांत जो भूक आणि तहान मारतो, आणि जेवन कमी करतो,
347-6
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥347॥
आणि झोपेचें नांव देखील न घेतां बळकट अभिमान धरतो, त्याचें शरीर सुद्धा त्याच्या आधीन राहत नाही, मग त्याला योग कोठून साध्य होणार?
348-6
म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नव्हावा । कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ॥348॥
म्हणून विषयांचे अति सेवन करण्याची किंवा त्यांच्या अगदीच त्याग करण्याची इच्छा करुं नये, अर्थात् सर्व गोष्टी नियमित असाव्या.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥6.17॥

349-6
आहार तरी सेविजे । परि युक्तीचेनि मापें मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥349॥
अन्न ग्रहण तर करावे, पण ते युक्तियुक्तीनें परिमित करावे; त्याचप्रमाणे, जी जीं कामे करावयाची तीहीं सर्व युक्तीनेंच प्रमाणांत आणावी.
350-6
मपितलां बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥350॥
भाषण परिमित असावें, त्याचप्रमाणे व्यायामही माफक करावा; व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी.

, , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading