सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ५१ ते ७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

51-4
ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें । मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥51॥
त्या वेळी माझ्या भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतरतो; आणि मग हा अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो.
52-4
अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं॥52॥
अधर्माची मर्यादा तोडून टाकतो, दोषाने (उत्कर्षासंबंधी) लिहिलेले लिखाण फाडून टाकतो आणि सज्जनांकडून (त्यांच्या हातून) सुखाची ध्वजा उभारवितो.
53-4
दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानू गिंवशीं । धर्मासी नीतीशी । शेंज भरी॥53॥
दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुनः मिळवून देतो आणि धर्म व नीतीची सांगड घालतो.
54-4
मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥54॥
मी विवेक दिपाला आलेली अविचाराची काजळी नाहीशी करतो आणि विवेकदीप प्रज्वलित करतो. त्या वेळी योगी लोकांना अखंड आनंदाच्या दिवाळीचा अनुभव येतो.
55-4
स्वसुखे विश्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे । भक्तां निघती दोंदें । सात्विकाचीं ॥55॥
तेंव्हा सर्व जग हे आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदत असतो. भक्तांच्या हृदयात सात्विकतेचे भरते येते.


56-4
तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥56॥
हे अर्जुना, ज्या वेळी मी अवताररूपाने प्रकट होतो, त्यावेळी पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पहाट होते.
57-4
ऐसेया काजालागी । अवतरें मी युगीं युगीं । परि हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥57॥
अशा या कार्यासाठी मी प्रत्येक युुगांत अवतार घेतो, माझे हे कार्य जो जाणतो, तो या जगात खरा विवेकी होय.
जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥4.9॥

भावार्थ :- हे अर्जुना ! या प्रमाणे माझे दिव्य जन्म व कर्म जो यथार्थपणे जाणतो, तो पुरुष देहत्यागानंतर पुनः जन्मास येत नाही, तर मला येऊन मिळतो.
58-4
माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥
मी उत्पत्तीरहित असूनही माझे जन्म घेणे आणि निष्क्रिय असूनही कर्म करणे, हे अविकारस्वरूप जो जाणतो, तो परममुक्त आहे.(तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त आहे.)
59-4
तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥59॥
तो इंद्रियाने कर्म करीत असला, तरी कोणत्याही प्रकारच्या आसक्तीने बांधला जात नाही.(व्यवहारात वागला तरी आसक्तीने, अहंकार वृत्तीने वागत नाही असा तो)देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही. (देहभावाने बध्द होत नाही).त्याचा (असा जो आहे त्याचा) देह ज्यावेळी पंचतत्वांत विलीन होतो, त्या वेळी तो माझ्या स्वरूपी एकरूप होतो.(माझ्यात रूपांत येऊन मिळतो)
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः॥4.10॥

भावार्थ :- आसक्ती, भय व क्रोध ही ज्याच्यापासून निघून गेली आहेत, माझाच आश्रय घेतलेले, असे तप व ज्ञान यांनी पवित्र झालेले अनेक अनन्यभक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत.
60-4
एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळीं न वचती । क्रोधाचिया ॥60॥
एरव्ही जे आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल शोक करीत नाहीत, ज्यांचे मन वासनारहित झालेले असते, (त्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात). जे केंव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत.


61-4
जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले । कां आत्मबोधे तोषले । वीतराग जे ॥61॥
जे माझ्या भावनेने सदैव संपन्न असतात, माझ्या सेवेसाठी ज्यांचे जगणे असते, (माझ्या सेवेसाठीच जन्म झाला आहे असे मानुन जे जगतात), आत्मज्ञानाने जे संतुष्ट असतात; आणि ज्यांची विषय- आसक्ती नष्ट झालेली असते,
62-4
जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥62॥
जे तपरूपी तेज्याच्या राशी आहेत, जे ज्ञानाचे एकमेव ठिकाण आहे, जे तीर्थानादेखील पवित्र करणारे तिर्थरूपच आहेत,
63-4
ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तयां उरले । पदरु नाहीं ॥63॥
ते सहजच माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. जे मीच होऊन राहतात. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाचा पडदा राहत नाही.
64-4
सांगे पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय निःशेख । तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाईजे ॥64॥
सांग बरे, हिणकस सोन्यामधील असलेला पितळेचा गंज आणि काळेपणा हे दोन दोष पूर्णपणे नाहीसे झाले, तर शुद्ध असे सोने कांही वेगळे मिळवावे लागते काय??
65-4
तैसे यमनियमीं कडसले । ते तपोज्ञानीं चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ॥65॥
त्याप्रमाणे जे यम-नियमांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरण करतात, जे तपाने आणि ज्ञानाने शुद्ध झाले आहेत, ते आणि मी एकरूप झालो आहोत, यामध्ये संशय तो कसला??
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः॥4.11॥

भावार्थ :- हे अर्जुना ! जे लोक मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. हे तत्व जाणून ज्ञानी लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुकरण करतात.


66-4
एर्‍हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठाईं । भजती तया मीही । तैसाचि भजे ॥66॥
दुसरे असे पाहा की, जे लोक माझी अनन्य भावाने जशी भक्ती करतात, त्याप्रमाणे मीही त्यांच्यावर प्रेम करतो.
67-4
देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ । जाहलें असे केवळ । माझां ठायीं ॥67॥
पाहा, जेवढे म्हणून मनुष्यप्राणी आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो.
68-4
परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले । तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ॥68॥
परंतु ज्ञान नसल्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी अनेक भेद निर्माण होतात. वास्तविक मी जो एक आहे, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात.
69-4
म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती॥देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥69॥
म्हणून वास्तविक जे अभेद आहे तेथे ते भेद पाहतात. मी नामरहित असताना मला अनेक प्रकारची नावे देतात. मी चर्चेचा विषय नसताना मला देव-देवी म्हणतात.
70-4
जें सर्वत्र सदा सम । तेथे विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥70॥
भेदबुद्धीने संभ्रमित झालेले लोक, मी (परमात्मा) सर्वत्र सम प्रमाणात (सर्व ठिकाणी) सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला व वाईट असे भेद करतात.
काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा॥4.12॥

भावार्थ :- कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची उपासना करतात. कारण, या मनुष्यलोकात कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होत असते.


71-4
मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें । मानिलीं देवतांतरें । उपासिती 71॥
मग नाना प्रकारचे हेतू मनामध्ये धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देव-देवतांची योग्य उपचारांनी विधिपूर्वक उपासना करतात.
72-4
तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त । परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥72॥
मग जे जे (त्यांच्या) मनात असते, (ज्या फळाची अपेक्षा ठेऊन ते कार्य करतात), ते ते सगळे (फळे) त्यांना प्राप्त होतात; परंतु ही त्यांनी केलेल्या कर्माची फळे आहेत, हे तू निश्चितपूर्वक जाण.
73-4
वाचूंनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥73॥
खरे पाहता देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय दुसरा कोणीही नसून या मनुष्यलोकात कर्मापासूनच फलप्राप्ती होते.
74-4
जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे । कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥74॥
शेतामध्ये आपण जे पेरतो, तेच उगवत असते; त्याशिवाय दुसरे काहीं उगवत नाही. अथवा आरशात जे पाहावे, ते आरशाच्या उपाधीमुळेच दिसत असते.
75-4
ना तरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥75॥
किंवा अर्जुना ! पर्वताच्या कड्याच्या तळाशी आपण जे मोठयाने बोलतो, तेंव्हा त्या कड्याच्याच निमित्तमात्राने बोलण्याचा प्रतिध्वनी निर्माण होत असतो.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *